भारत : अब्जाधिशांचा गरीब देश

गेल्या आठवड्यात परस्परभिन्न अहवाल वाचण्यात आले. यात भारतातील अब्जाधिश... भारतातील कोणत्याही उद्योगापेक्षा किंवा व्यक्तीपेक्षा श्रीमंत असणारी देवस्थाने... जगातील आनंदी देश...भारतातील गरीबी... यांचा प्रामुख्याने समावेश होता. यात भन्नट माहितीचा खजाना हाती लागला. मात्र माहितीरुपी मिळालेले सर्व मणी एका माळेत गुंफल्यानंतर डोकं हँग झाले. यामुळे आपला देश श्रीमंत आहे की गरीब आहे याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

भारत हा विकसनशील देश आहे हे आपण स्वातंत्र्य मिळाल्यापासून सांगत आलो आहोत. सन १९७२ च्या दरम्यान तत्कालीन पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांनी केलेल्या ‘गरिबी हटाव’ घोषणे पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘अच्छे दिन’ पर्यंत अनेक घोेषणांचा पाऊस भारतीयांवर पडला. या घोषणांवर सर्वच नेत्यांनी निवडणुका जिंकल्या आणि सत्ता मिळवली. पण गरिबी जैसे थे आहे. गरिबांचे प्रश्नही कायम आहेत.

आज मितीस भारताचा आर्थिक विकास जरी वेगाने होत असला तरी भारतातील बहुसंख्य लोक अजूनही अतिशय दारिद्रयात राहतात. आपल्या देशाची लोकसंख्या सुमारे १२८ कोटींच्या वर पोहचली आहे. त्याचा २९ टक्के म्हणजे ३७ कोटी इतकी लोकसंख्या दारिद्र रेषेखाली आहे. जगाच्या एक तृतीयांश गरीब लोक भारतात असून अवघ्या ६५ रुपयांत आपला गुजारा करणार्‍या गरीबांची सर्वाधिक संख्या भारतात असल्याचे जागतिक बँकेने नुकताच प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केले आहे. यामुळे देशातील १२८ कोटी जनतेपैकी ८१ कोटी म्हणजे ६५ टक्के जनतेला भूक शमविण्यासाठी दरमहा प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य नाममात्र किमतीत पुरविण्यासाठी ‘अन्नसुरक्षा कायदा’ करण्याची वेळ आली! याची अगदी विरुध्द बाजू म्हणजे, जगातील अतिश्रीमंत व्यक्तींच्या यादीत चीन आणि अमेरिकेनंतर भारताचा तिसरा क्रमांक लागतो. चीनच्या हुरन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या हुरन ग्लोबल रिच लिस्ट २०१६ नुसार, भारतातील अब्जाधीशांची संख्या १११ झाली आहे. भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मिळविला आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे एकूण १.७८ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. फॉर्च्युन मासिकाच्या जगभरातील आघाडीच्या ५०० कंपन्यांच्या यादीत यंदा सात भारतीय कंपन्यांना स्थान प्राप्त झाले आहे. यामध्ये इंडियन ऑईल, भारतीय स्टेट बँक, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम या चार सरकारी कंपन्यांचा समावेश आहे. खासगी क्षेत्रातील रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स व राजेश एक्सपोर्ट्सदेखील यादीमध्ये सामील आहेत. अतिश्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी, दिलीप शांघवी, अझीम प्रेमजी, शिव नाडर, लक्ष्मी मित्तल, सुनील मित्तल, गौतम अदानी, राहुल बजाज, एन. आर. नारायण मूर्ती या लक्ष्मीपुत्रांचे नाव अग्रभागी आहे. न्यु वर्ल्ड हेल्थ संस्थेच्या ‘एशिया पॅसिफिक २०१६ वेल्थ रिपोर्ट’ नुसार, भारतात तब्बल २ लाख ३६ हजार कोट्यधीश आहेत. (ज्या व्यक्तीकडे १० लाख डॉलरपेक्षा जास्त संपत्ती आहे त्यांना हाय नेट वर्थ इंडिविज्युअल्स अर्थातच कोट्याधीश मानले जाते.) भारतातील उद्योगपतीच नव्हे तर मंदिरेही गर्भश्रीमंत आहे. केरळचं पद्मनाभस्वामी मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे. या मंदिराकडे एकूण १ लाख ३३ हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. श्रीमंत मंदिरांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे तिरुमाला तिरुपती वेंकटेश्वर मंदिर. आंध्र प्रदेशातील या मंदिराकडे तब्बल ५२ हजार कोटींची संपत्ती आहे. महाराष्ट्रातील शिर्डीच्या साई मंदिर देवस्थानाकडे तब्बल ५४० कोटी रुपये संपत्ती आहे. वैष्णो देवी मंदिराकडे एकूण ५०० कोटींची संपत्ती आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर श्रीमंत मंदिरांच्या यादीत पाचव्या स्थानावर असून, या मंदिराकडे तब्बल १२५ कोटींची संपत्ती आहे. ज्या देशात २ लाख ३६ हजार अब्जाधिश आहेत. मंदिरांकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. तो देश गरीब कसा राहू शकतो?

पैसा म्हणजे आनंद नाही!

आता अजून गंमत म्हणजे, जगातील सर्वाधिक आनंदी देशांची यादी देखील जाहीर झाली असून यामध्ये भारत ११८ व्या स्थानी आहे, तर जगातील सर्वात बलाढ्य देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या अमेरिकेलाही १३ वा क्रमांक मिळाला आहे. पहिल्या पाच क्रमांकांवर अनुक्रमे डेन्मार्क, स्वित्झर्लंड, आईसलँड, नॉर्वे आणि फिनलंड या देशांनी स्थान पटकावले आहे. याचाच अर्थ आर्थिक विकास किंवा अन्य बाबींचा आनंदाशी फारसा संबंध नाही असेही म्हणता येईल.

श्रीमंतांचा गरीब देश

भारत देश श्रीमंत असला तरी भारतातले लोक मात्र गरीब आहेत. कारण सरासरी उत्पन्नाच्या आकड्याकडे बघायला लागलो की भारताच्या या श्रीमंतीचे रहस्य उघडे होते. एकूण उत्पन्न जास्त असले तरी भारताचे दरडोई उत्पन्न फारच कमी येते. एकूण उत्पन्नाला १२८ कोटीने भागले तर दरडोई उत्पन्नाचा आकडा कळतो आणि तो कमी येतो. असा सरासरी दरडोई उत्पन्नाचा आकडा काढण्याचा प्रयत्न केला तर भारताचा जगात १५० वा क्रमांक येतो. मग आपल्या देशात श्रीमंताचा गरीब देश असे म्हटल्यास चुकिचे ठरणारा नाही!


Post a Comment

Designed By Blogger