जन्माला येण्यासाठी अल्ट्रासाऊंड मशिनला चकमा द्यावा लागणार्‍या देशात मुलींनीच राखली १३० कोटी भारतवासियांची लाज

प्राचीन काळापासून भारत हा पुरुषप्रधान देश म्हणून ओळखला जातो. त्याही आधी इतिहासात डोकावल्यास हजारो वर्षापूर्वी रामायणात सितामातेलाही अग्निदिव्यातून जावे लागले होते. आजही देशातील परिस्थिती फारशी बदललेली नाही. १३० कोटीच्यावर लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात हजारो ‘निर्भयां’वर दररोज अत्याचार होत आहेत. दुसरीकडे वंशाचा दिवा पाहिजे म्हणून मुलींना गर्भातच मारण्यास आपला देश मागे नाही. २१ व्या शतकात समानतेची भाषा वापरणार्‍या देशात स्त्रीभ्रुणहत्या रोखण्यासाठी कायदा करावा लागतो ही शरमेची बाब आहे. चालू आकडेवारीनुसार १ हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण केवळ ९२७ इतके आहे. हे प्रमाण वाढवण्यासाठी केंद्र शासनाला ‘बेटी बचाव...बेटी पढावो’अभियान सुरू करावे लागले आहे. त्यासह महाराष्ट्रात ‘सुकन्या’,‘माझी कन्या भाग्यश्री’सारख्या योजना राबवाव्या लागत आहे. याबद्दल आनंद व्यक्त करावा का खेद हे कळत नाही!

महाभारतात द्रोपदीवर संकट ओढावल्यानंतर भगवान श्रीकृष्ण मदतीला धावून आले होते. मात्र २१ व्या शतकात देश, समाज संकटात असतांना महिला व मुलीच धावून आल्या आहेत. अनेक क्षेत्रामध्ये महिलांनी पुरुषांना लाजवेल अशी कामगिरी केली आहे. यामध्ये कल्पना चावला, सुनिता विल्यम्स, सानिया मिर्झा, सानिया नेहवाल, अंजु जॉर्ज, मेरी कॉम, चंदा कोचर, मीरा बोरवणकर, किरण बेदी यांची नावे आवर्जुन घ्यावी लागतील. याच पंगतीत आता रिओ ऑलम्पिकच्या निमित्ताने साक्षी मलिक, पी.व्ही.सिंधू, दीपा करमारकर, या ‘भारत की बेटीं’चे नाव घ्यावे लागेल. विचार करा आपण पुरूषप्रधान संस्कृतीचे बिरुद मिरवतो मात्र धनुष्यबाणाने फिरत्या माशाचा डोळा केवळ प्रतिबिंब पाहून फोडणार्‍या अर्जुनाच्या देशात तिरंदाजीमध्ये आपल्याला एकही पदक मिळवता आले नाही, महाबली भिमाच्या आपल्या देशात कुस्तीमध्ये एकही पुरुषाला पद नाही. द्रोणागिरी पर्वत उचलणार्‍या हनुमानाच्या देशात लिप्टिंंगमध्येही आपल्याला पदक नाही. नदीच्या डोहात जावून सर्पमर्दन करणार्‍या श्रीकृष्णाच्या देशामध्ये पोहण्याच्या स्पर्धेमध्येही आपल्याला पदक मिळाले नाही. मात्र ज्या देशात जन्माला येण्यासाठीच मुलींना अल्ट्रासाऊंड मशिनला चकमा देवून आईच्या कुशीत शिरावे लागते. अशा देशात साक्षी मलिक व पी.व्ही.सिंधू सारख्या मुलींनी १३० कोटी भारतवासियांची जगभरात लाज राखली, हेच त्रिकालबाधीत सत्य आहे.


Post a Comment

Designed By Blogger