या सर्व घडामोडींच्या पार्श्वभुमीवर इतिहासात डोकावणे महत्वाचे ठरेल. सध्याचे बलूचिस्तान म्हणजे अखंड भारतातील मीर अहमद यांचे ‘कलात’ संस्थान होय. फाळणीच्या वेळी तेथे ब्रिटिशांच्या आधिपत्य होते. ‘कलात’ ने पाकिस्तानात सामील होण्यास नकार दिल्यानंतर. मार्च १९४८ मध्ये पाकने लष्कर पाठवून विलीनीकरणाच्या करारावर तत्कालीन शासक यार खानची सही घेतली होती, पण त्यांच्या भावांनी संघर्ष सुरूच ठेवला होता. सध्याच्या बलूच आंदोलनाची मुळे तेव्हांपासूनची आहेत. ती १९६६ मध्ये अधिकच घट्ट झाली. भौगोलिकदृष्ट्याही बलुचिस्तानला प्रचंड महत्व आहे कारण पाकिस्तानच्या ४४ टक्के भागात पसरलेल्या बलुचिस्तानची लोकसंख्या तब्बल १३ लाख इतकी आहे. या बलुचिस्तानचा भारताशी विशेषत: महाराष्ट्राशी फार जुना संबध आहे. दुसर्या पानिपतच्या युध्दानंतर अहमदशहा अब्दाली अफगणिस्तानला जाण्यासाठी निघाल्यानंतर त्याने सोबत २२ हजार मराठी युध्दकैदींना सोबत घेतले होते. वाटेत लागणार्या बलुचिस्तानच्या डेरा बुगटी प्रांताच्या शासकांना अनेक मराठा युध्दकैदी सोपविण्यात आल्याची इतीहासात नोंद आहे. यावेळी मीर नासीर खान या शासकाने मराठा युद्धकैदींना काल्पर, मसोरी, शांबानी, नोथानी, पिरोजानी आणि रहेजा या बुगटी जमातींमध्ये विभागून दिले होते आजही हा समाज काल्पर मराठा, नोथानी मराठा, शांबानी मराठा या बुगटी जमातीच्या नावाने ओळखला जातो.
बलुचिस्तानच्या मुद्यावरुन पाकिस्तानचा एवढा तिळपापड होण्याचे दुसरे कारण म्हणजे, बलुचिस्तानमध्ये गॅस, युरेनियम, तांबे, सोने आणि इतर धातूंचा मोठा साठा आहे. त्याच्या वायू साठ्यांतून अर्ध्या पाकिस्तानची गरज भागते. मध्य आशियात प्रवेशासाठी चीन ज्या ग्वादर बंदराची निर्मिती करत आहे ते येथेच आहे. इराण-पाकिस्तान गॅस पाइपलाइनही येथूनच जाते. शांतता असली तरच हे प्रकल्प शक्य आहेत. बलुचिस्तान प्रांतातल्या ग्वादार बंदराच्या विकासासाठी पाकिस्तानने चीनशी करार केल्यामुळे भारताच्या बंगालच्या उपसागरातल्या वर्चस्वाला धोका निर्माण झाला असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चाबहार बंदराचा विकास करण्यासह तेथून अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंत रस्ते आणि रेल्वे मार्ग बांधण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. या प्रकल्पासाठी भारत ५०० दशलक्ष डॉलर्सची मदत करणार आहे. हा देखील एका कुटनितीचा भाग आहे. भारताचे हे आक्रमक डावपेच आपल्याला परवडणार नाहीत. याची जाण पाकिस्तानला आहे. चहूबाजूने होणार्या कोंडीमुळे पाकिस्तानला धडकी भरली आहे. यामुळे दिवा विझण्यापुर्वी जसा वात जास्त फडफडते तशीची अवस्था पाकिस्तानची झाली आहे.
Post a Comment