विधानपरिषद, राज्यसभा बिनविरोध मात्र बाहेरच्यांच्या उमेदवारीमुळे अंतर्गत खदखद


विधानपरिषद, राज्यसभा बिनविरोध मात्र 
बाहेरच्यांच्या उमेदवारीमुळे अंतर्गत खदखद


राज्यसभा काय किंवा विधानपरिषद काय ही राजकारणात बाजूला पडलेल्या लोकांची सोय करण्याची ठिकाणे बनली आहेत हा समज आता पक्का रुजला आहे. लोकांतून निवडून यायची ज्यांची क्षमता नाही अशा लोकांना मागच्या दाराने विधिमंडळात किंवा संसदेत पाठवण्यासाठी या नियुक्त्या केल्या जातात, अशी पक्की समजूत आता सर्वसामान्यांची झाली आहे. तर लोकशाहीच्या दरबारात सर्वसामान्यांचे प्रश्‍न मांडण्यासाठी अभ्यासू लोकांची आवश्यकता असते म्हणूनच अशांना राज्यसभा किंवा विधानपरिषदेवर पाठविण्यात येते, अशी भुमिका प्रत्येक राजकिय पक्ष मांडत असतो.
‘नेहमीच येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे यंदाही राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणूका नेहमीप्रमाणे चर्चेत आहेत. या निवडणूका म्हणजे घोडेबाजार! असे एक समीकरणच झाले आहे. अनेकवेळा निवडणूक बिनविरोध करुन घोडेबाजार रोखण्याचा प्रयत्न केला जातो. तसा स्तुत्य प्रयत्न यंदाही करत विधान परिषदेच्या जागा बिनविरोध करण्यात सर्वच पक्षांना यश आले आहे. मात्र मागच्या दरवाज्याच्या या निवडणूका यंदा भुमीपुत्रांना डावलून बाहेरच्यांना संधी दिल्यामुळे चर्चेत आहे. यात पक्षांतर्गत धुसफूस रोखण्याचे बडे आव्हान भाजपासह कॉंगेे्रससमोर देखील राहणार आहे. 
भाजपाकडून प्रसाद लाड आणि अपक्ष मनोज कोटक यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. विधान परिषदेवर सुजितसिंह ठाकूर (भाजप), प्रविण दरेकर (भाजप), आर. एन. सिंह (भाजप), सदाभाऊ खोत (स्वाभिमानी, भाजप पुरस्कृत), विनायक मेटे (शिवसंग्राम, भाजप पुरस्कृत), सुभाष देसाई (शिवसेना), दिवाकर रावते (शिवसेना),नारायण राणे (कॉंग्रेस), रामराजे नाईक निंबाळकर (राष्ट्रवादी), धनंजय मुंडे (राष्ट्रवादी) हे बिनविरोध निवडून गेले आहेत. तर राज्यसभेवर महाराष्ट्रातून विनय सहस्त्रबुद्धे (भाजप), डॉ. विकास महात्मे (भाजप), पीयूष गोयल (भाजप), पी. चिदंबरम (कॉंग्रेस), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), संजय राऊत (शिवसेना) हे बिनविरोध गेले आहेत. बिनविरोधचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलल्यानंतर भाजपा व कॉंगे्रेसला आता नाराजांकडे लक्ष द्यावे लागणार आहेत. कारण, भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला राज्यसभेच्या सहापैकी तीन जागा आल्या, त्यामुळे ते कोणाला उमेदवारी देणार याविषयी कमालीची उत्सुकता होती. भाजपने पियुष गोयल यांची उमेदवारी पहिल्या टप्प्यात जाहीर केली; पण दोन उमेदवार अगदी ऐनवेळी घोषित करण्यात आले, त्यात विनय सहस्रबुद्धे आणि डॉ. विकास सुखात्मे यांचे नंबर लागले; पण सुरेश प्रभुंना मात्र बाहेरील राज्याचा आधार घ्यावा लागला. त्यांना महाराष्ट्रातून उमेदवारी देण्यास शिवसेनेने विरोध केल्याची बाब समोर आली. त्यामुळे जागा उपलब्ध असूनही सुरेश प्रभु यांच्यासारख्या कर्तबगार मंत्र्याला त्यांच्या स्वतःच्या राज्यातून उमेदवारी मिळू शकली नाही. भाजपने विधान परिषदेसाठी सदाभाऊ खोत, विनायक मेटे आणि प्रवीण दरेकर यांना उमेदवारी दिली, त्यामुळे पक्षाबाहेरील लोकांना संधी दिल्याने भाजपमध्ये सध्या अंतर्गत वादंग सुरू आहेत. गेले अनेक दिवस उमेदवारीच्या प्रतीक्षेत असलेले पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांना मात्र यावेळीही संधी नाकारण्यात आल्याने तेही नाराज असल्याचे सांगण्यात येते. भाजपच्या वतीने उमेदवारी देण्यात आलेले प्रवीण दरेकर यांच्या निवडीबद्दलही पक्षात खदखद आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि भाजपनेच त्यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली असताना त्यांनाच उमेदवारी देण्याची वेळ पक्षावर यावी, हे दुर्दव्य आहे. भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी कॉंग्रेसचे मावळते राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनीही गडकरी यांची भेट घेऊन भाजपकडून राज्यसभेसाठी प्रयत्न केल्याची बातमीही मध्यंतरी गाजली. मात्र गडकरींच्या वाढदिवसाच्या निमित्त घेतलेली ती ‘शुभेच्छा भेट’ असल्याचे सांगत वेळ निभवून घेण्यात आली.  
राज्यसभा सदस्यत्वाच्या निवडीवरून कॉंग्रेसमध्येही बरेच नाट्य रंगले. ंयंदा महाराष्ट्रातल्याच उमेदवाराला संधी द्या, अशी स्पष्ट मागणी पक्षाच्या आमदारांनी कॉंग्रेस निरीक्षकांकडे केली होती; मात्र कॉंग्रेसनेही महाराष्ट्रावर बाहेरचाच उमेदवार लादला. परंतु हा उमेदवार इतका तगडा होता की त्याच्या विरोधात बोलण्याचेही धाडस कोणत्याही कॉंग्रेस आमदाराने दाखवले नाही. कॉंग्रेसने महाराष्ट्रातून माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना उमेदवारी घोषित केली आहे. चिदंबरम यांना राज्यसभेत पाठवणे ही पक्षाची सध्याची गरज आहे. कारण संसदेत अरुण जेटलींना तोडीस तोड उमेदवार म्हणून केवळ चिदंबरम यांच्याकडे पाहिले जाते. कॉंग्रेसच्या वाट्याला विधानपरिषदेची एकच जागा आली होती व त्या जागेवर नारायण राणे यांना उमेदवारी देऊन युती सरकारला विधिमंडळात एक मोठे आव्हान निर्माण करण्याचे काम कॉंग्रेस श्रेष्ठींनी केले आहे. चिदंबरम आणि राणे या दोघांच्या निवडीचे राजकीय महत्त्व कॉंग्रेस आमदार ओळखून असल्याने कॉंग्रेसमध्ये नाराजी नाट्य निर्माण झाले नाही. दुसर्‍या कोणाचीही उमेदवारी महाराष्ट्रावर लादली गेली असती तर कॉंग्रेसमधील अंतर्गत कुरघोडीचे राजकारण श्रेष्टींची डोकंदुखी ठरली असती. भाजपच्या तुलनेत कॉंगे्रसने हुकमी एक्के मैदानात उतरवल्याने अंतर्गत वाद चव्हाटाच्या येण्यापासून रोखण्यास पक्षश्रेष्टी निश्‍चितच यशस्वी ठरले आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. त्या तुलनेत यंदा भाजपाच्या भुमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजप श्रेष्टींच्या या गुगली भुमिकेमुळे बाहेरच्या चेहर्‍यांना अच्छे दिन आहे आहे. अशी उपरोधात्मक टिका आत पक्षातुनच होवू लागली आहे. यामुळे भविष्यात भाजपाची डोकंदुखी वाढण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. 

Post a Comment

Designed By Blogger