नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणूकांचे गणित बदलणार!

नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणूकांचे गणित बदलणार!

भाजपाचे ज्येष्टनेते एकनाथराव खडसे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर संपुर्ण राज्यात राजकिय भुकंप झाला आहे. याचे सर्वाधिक हादरे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणाही बसणार आहेत. हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज भासणार नाही! जिल्ह्याचे राजकारण शिवसेना नेते सुरेशदादा जैन व भाजपानेते एकनाथराव खडसे यांच्या पलीकडे गेले नाही. जळगाव शहर वगळता जिल्हाभरात नाथाभाऊंचीच चलती राहिली आहे. व गेल्या तिन वर्षात तर ‘सबकुछ नाथाभाऊ’ असे चित्र राहिले आहे. जिल्ह्यात भाजपाचे क्र.२ चे नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीषभाऊ महाजन असले तरी जिल्हा परिषद वगळता त्यांचा अन्य ठिकाणी फारसा हस्तक्षेप नसायचा! मात्र आता नाथाभाऊंनी राजीनामा दिल्यानंतर जिल्ह्याची राजकीय गणिते बदलण्यास सुरुवात होईल, असा अंदाज वर्तविण्यास सुरुवात देखील झाली आहे. व याचा सर्वाधिक फायदा शिवसेना आणि राष्ट्रवादीला होईल तसेच भाजपाचे मोठे नुकसान होईल, असे देखील बोलले जावू लागले आहे. 
मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी ना.महाजन यांच्या समर्थक ना.प्रयागताई कोळी विराजमान असल्या तरी जि.प.त नाथाभाऊंच्या परवानगी विना पानही हलत नाही, असे म्हटल्यास चुकिचे ठरणार नाही. (अधिक खुलासा माजी अध्यक्ष तथा अभ्यासू जि.प.सदस्य अशोक कांडेलकर करु शकतील). आज जिल्हा भाजपात ना.खडसे व ना.महाजन समर्थक असे दोन गट असले तरी ना. महाजन हे जामनेर तालुका व आता जळगाव महानगरपालिका (खान्देश विकास आघाडी व मनसेच्या भरवशावर) राजकारणापलीकडे फारसे गेलेले नाही. यामुळे सहाजिकच संपुर्ण जिल्हा नाथाभाऊंच्या मुठीत राहीला आहे. आता त्यांच्या राजीनाम्यामुळे जिल्ह्याचा ‘पालक’ कोण राहिल? हा प्रश्‍न कार्यकर्त्यांना पडला आहे. अशातच आगामी काळात १२ नगरपालिकांसह जिल्हा परिषदेची निवडणूक होवू घातली आहे. ना.खडसे यांच्या राजीनाम्याचे पडसाद या दोन्ही निवडणूकांवर पडतील व त्यात भाजपाचे नुकसान होईल, असे मतही राजकिय तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मुळात नगरपलिका निवडणूका आघाड्यांच्या कुबड्यांवर लढवल्या जातात व अशात सर्वच पक्षांमध्ये वजनदार शब्द म्हणून नाथाभाऊंकडे पाहिले जाते. परंतु दुसर्‍या बाजूला ना.महाजन यांचे सगळ्यांना सोबत घेवून चालण्याचे राजकारण पक्षासाठी फायदेशिर ठरु शकते, असा दावा देखील महाजन गटाकडून केला जात आहे. त्यानंतर होणार्‍या जिल्हा परिषद निवडणूका मात्र भाजपासाठी आव्हानात्मक ठरु शकतात कारण जि.प.निवडणूका आधी स्वबळावर लढविल्या जातात व नंतर सोईचे राजकारण करत युती-आघाडी केली जाते. आतापर्यंत सर्व निवडणूकांचे सेनापती म्हणून ना.खडसे यांनी कमान सांभाळली आहे. परंतु ते आता ‘वॉररुम’ मध्ये राहतील का? ंयाची चिंता खडसे समर्थकांना सतावू लागली आहे. जिल्हा परिषदेवर भगवा झेंडा फडकविण्याचे बिगूल शिवसेनेने आधीच वाजवले आहे. आजमितीत जि.प.त भाजपाचे सर्वधिक २३ तर शिवसेनेचे १५ सदस्य आहेत दुसरीकडे राष्ट्रवादीचे २० व कॉंग्रेसचे १० सदस्य आहेत. हा फरक फारसा नसल्याने आगामी निवडणूका चुरशिच्या ठरतील यात तिळमात्र शंका नाही.

Post a Comment

Designed By Blogger