राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जूनला निवडणूक होणार आहे. राज्यात भाजपा व महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता भाजप दोन, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. त्यातच छत्रपती संभाजीराजे हे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याने शिवसेनेने सहाव्या जागेसाठी उमेदवार जाहीर केला आहे. या खेळीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचा हात असल्याचा आरोप संभाजीराजे समर्थकांनी केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र राज्यसभेची निवडणूक कशी होते, हे आपणास माहित आहे का?
असे असते राज्यसभेचे गणित
राज्यसभेचे एकूण सदस्य २४५ असतात. ज्यामध्ये १२ खासदार हे राष्ट्रपती नियुक्त सदस्य असतात. त्यांच्या व्यतिरिक्त उरलेले २३३ खासदार निवडणुकीने राज्यसभेवर निवडून जातात. कोणत्या राज्यातून किती खासदार राज्यसभेवर जाणार हे त्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असते. राज्यसभेच्या निवडणुकीत केवळ विधानसभेच्या सदस्यांनाच मतदान करता येते. विधान परिषदेचे आमदार मतदान करू शकत नाही. राज्यसभेत प्रत्येक राज्याचा कोटा ठरलेला असतो. यापैकी एक तृतीयांश जागांसाठी दर दोन वर्षांनी निवडणुका होतात.
जागा जिंकण्यासाठी उमेदवाराला निश्चित केल्या मतांच्या आकड्यापेक्षा जास्त मते मिळवावी लागतात. त्याचे सूत्र पुढील प्रमाणे असते.
एकूण मते/(राज्यसभेच्या निवडणूक होत असलेल्या जागांची संख्या+१)+१ = विजय
हा किचकट विषय अजून सोप्या पद्धतीने समजून सांगायचा म्हटल्यास, महाराष्ट्रात विधानसभेचे एकूण आमदार २८८ आहेत. आता राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होत आहे. यामुळे ६+१ म्हणजे झाले ७ आता २८८ भागिले ७ केल्यानंतर त्यात १ अॅड करायचा म्हणजे झाले ४१.१४ याचा अर्थ जिंकण्यासाठी ४२ मतांची आवश्यकता आहे.
जेव्हा मतदान होते तेव्हा या आमदारांना त्यांचे प्राधान्य देता येते. म्हणजे - ए, बी, सी असे ३ उमेदवार असतील तर पहिले प्राधान्य ए ला दुसरे प्राधान्य - बी आणि तिसरे प्राधान्य सी ला असे देता येते. ज्याला पहिल्या पसंतीची सर्वाधिक मते मिळतील तो विजेता मानला जातो. यातही जर कोणत्याच उमेदवाराला निर्धारित केलेले मत मिळाली नाही तर सगळ्यात कमी मते असलेली व्यक्ती बाद होते. उदाहरणाखातर सी ला सगळ्यात कमी मते मिळाली, तर ती बाद होणार आणि तिच्यासाठी मतदान केलेल्यांनी ए आणि बी ला जे प्राधान्य दिले होते ते पुढे पकडले जाते. त्यानुसार ए आणि बी मध्ये ज्याला निर्धारित केलेली मते मिळतील ती व्यक्ती राज्यसभेची खासदार म्हणून निवडली जाते.
भाजपा व महाविकास आघाडीचे संख्याबळ
भाजपकडे सध्या ११३ आमदारांचे संख्याबळ आहे. भाजपचे १०६ आमदार, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष पाच आमदार असे एकूण ११३ आमदार भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी ४२ मतांची गरज आहे. त्यामुळे भाजपला तिसरी जागा निवडून आणायची असेल तर फक्त १३ मतांची गरज आहे. महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आणि भाजपकडे ११३ आमदार आहेत. संख्याबळानुसार भाजप दोन, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतात.
कोणत्या राज्यात किती राज्यसभा जागा आहेत?
आंध्र प्रदेश-१८, अरुणाचल प्रदेश-१, असम-७, बिहार-१६, छत्तीसगड-५, गोवा-१, गुजरात-११, हरियाणा-५, हिमाचल प्रदेश- ३, जम्मू आणि कश्मीर-४, झारखंड-६, कर्नाटक- १२, केरळ-९, मध्य प्रदेश-११, महाराष्ट्र-१९, मणिपूर-१, मेघालय-१, मिजोरम-१, नगालँड-१, दिल्ली -३, नॉमिनेटेड-१२, ओडिशा-१०, पुडुचेरी-१, पंजाब-७, राजस्थान-१०, सिक्किम-१, तमिळनाडू-१८, त्रिपुरा-१, उत्तर प्रदेश-३१, उत्तराखंड-३ आणि पश्चिम बंगाल-१६.
Post a Comment