जळगावकरांना सुरेशदादांची आठवण पुन्हा येतेय; व्यक्तीप्रेम नव्हे शहराच्या विकासाशी आहे थेट संबंध...

जळगाव शहराचे नाव ज्या दोन-चार नावांच्या अवतीभोवती फिरते त्यात सुरेशदादा जैन यांचे नाव आजही आघाडीवर आहे. सुरेशदादा राजकारणापासून चार हात लांब गेले असले तरी गेल्या काही दिवसांपासून दादा समर्थकांनाच नव्हे तर दादांचे राजकीय विरोधक मानल्या जाणार्‍या अनेकांना सुरेशदादांची आठवण येवू लागली आहे. याचा संबंध व्यक्ती प्रेमाशी नसून शहराच्या विकासाशी आहे. आता येथे अनेकजण म्हणतील सुरेशदादा व जळगाव शहराच्या विकासाचा आत्ता काय संबंध? मात्र येथेच त्याचे गुपित दडलेले आहे.



जळगावच्या राजकारणातील दादा म्हणवणारे सुरेशदादा जैन यांनी अनेकदा पक्ष बदलूनही निवडणुका जिंकल्या. यामुळे जळगाव शहर व सुरेशदादा हे गेल्या ४०-५० वर्षांपासूनचे अतूट समीकरण राहिले. महापालिका व जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे राजकारण जैन कुटुंबियांभोवती सतत फिरत राहिले. सुरेशदादा जैन यांचे वडील भिकमचंद जैन नगरपालिकेच्या राजकारणात होते. त्यानंतर सुरेशदादा हे जळगाव नगरपालिकेच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. सुरेशदादांनी अनेकदा पक्ष बदलले, पण त्यांच्या भूमिकेचे जळगावकरांनी नेहमीच स्वागत केले. सुरेशदादांनी तब्बल आठ वेळा विधानसभेवर प्रतिनिधीत्व केले. १९८० मध्ये जैन पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकीटावर आमदारपदी विराजमान झाले. पुढे १९८५ आणि १९९० मध्ये समाजवादी काँग्रेसच्या तिकीटावर, १९९५ मध्ये काँग्रेस तर १९९९ मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर जैन आमदार झाले. २००४ मध्ये पुन्हा पक्ष बदलत जैन राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. तर २००९ मध्ये पुन्हा शिवसेनेच्या तिकीटावर ते आमदार झाले. २००८ मध्ये त्यांनी खान्देश विकास आघाडीची स्थापना करत त्यांचे लहान बंधू रमेशदादा जैन यांना राजकारणात आणले. 

महापालिका व शहरात ठराविक राजकारण्यांची छोटीछोटी संस्थाने

या दरम्यान २०१३ मध्ये महापालिकेची निवडणूक झाली. सुरेशदादा तुरुंगात असतानाही त्यांच्या खान्देश विकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकत शहर विकास आघाडी, मनसे व जनक्रांतीच्या सहकार्याने सत्ता स्थापन केली. अल्पमतात असतानाही त्यांनी पूर्ण पाच वर्षे सत्ता उपभोगली. २०१४ मध्ये शिवसेनेने आपला माणूस अशी भावनिक साद देत तुरुंगात असलेल्या सुरेशदादांना पुन्हा विधानसभा निवडणुकीत संधी दिली. मात्र त्यावेळी खडसेंनी तत्कालिन नगरसेवक राजूमामा भोळे यांना भाजपतर्फे उमेदवारी देत निवडूनही आणले. साडेचार वर्षांनंतर जामिनावर बाहेर आल्यानंतर जैन यांनी राजकीय संन्यास घेण्याची घोषणा करत भविष्यात केवळ सामाजिक कार्यात सक्रिय राहण्याचे स्पष्ट केले. तेंव्हापासून ते सक्रिय राजकारणापासून चार हात लांबच आहेत. घरकुल घोटाळाप्रकरणी अटक झाल्यानंतर २०१३ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या वर्चस्वाला खिंडार पडले. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाल्याने जळगावमधील दादापर्व संपण्यास सुरुवात झाली. राज्याचे माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पालिका निवडणुकीत सुरेशदादांची सद्दी संपुष्टात आणून जैन यांचे संस्थान खालसा केल्याचे मानले जात असले तरी सध्याचे चित्र वेगळेच आहे. जळगाव महापालिका व शहरात ठराविक राजकारण्यांची छोटीछोटी संस्थाने तयार झाली आहेत. त्याचा रिमोट कंट्रोल ना आमदार गिरिश महाजनांकडे आहे ना आमदार राजूमामा भोळेंकडे.

जळगावला गुंडगिरी व टोळीयुध्दातून मुक्त करण्याचे श्रेय सुरेशदादांच 

सुरेशदादा यांचे जळगावच्या विकासाशी असलेले नाते थोडेसे वेगळेच आहे. आताच्या पिढीला ते समजून घ्यायचे असल्यास आपल्याला ७०च्या दशकापासून सुरुवात करावी लागेल. ७० ते ९० च्या दशकात जळगावचे नाव गुंडगिरीने बदनाम झाले होते. स्थानिक गुंडांच्या तिन ते चार टोळ्या येथे कमालीच्या सक्रिय होत्या. त्यांचे वर्चस्व व प्रस्थ इतके वाढले होते की, संपूर्ण शहरात गुंडाराज व बेरोजगारीचे प्रमाण वाढत होते. याच काळात सुरेशदादा जैन नावाचा तरुण सामाजिक व राजकीय जीवनात सक्रिय झाला. सुरुवातील अनेकांना वाटले की, भल्याभल्या मातब्बरांनी जेथे हात टेकले तेथे हा एकटा तरुण काय करेल? मात्र अल्पवधीतच सुरेशदादांनी जळगावकरांचा विश्‍वास जिंकला. त्यांनी सर्वप्रथम शहरातील गुंडगिरीचा बंदोबस्त करण्याचा विडा उचलला. त्यावेळी बदनाम असलेल्या काहींना त्यांनी खादीचे कपडे देत राजकारणाच्या प्रवाहात आणले. त्यांचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. यामुळे जळगाव शहराला गुंडगिरी व टोळीयुध्दातून मुक्त करण्याचे श्रेय सुरेशदादांच जाते, हे कुणीही नाकारु शकणार नाही.

जळगावचा विकास खुंटला अन् गुन्हेगारी वाढतेय

आज अनेक वर्षांनी जळगावकरांना सुरेशदादांची पुन्हा आठवण येवू लागली आहे. आता पूर्वी प्रमाणे जळगाव शहरात गुंडांची सद्दी नसली तरी सोईस्कर राजकारण करणार्‍यांची मक्तेदारी वाढली आहे. गेल्या ८-१० वर्षांपासून शहराचा विकास किती झाला? असा प्रश्‍न कुणी विचारल्यास एकाही राजकारणी ठोस उत्तर देवू शकणार नाही. येथे पक्षिय राजकारणाचा विषय मुळीच नाहीए (जळगावकरांच्या भाषेत बोलयचे म्हटल्यास, राजकारण गय चुल्हाम्हा/राजकारण जावू दे भो खड्ड्यात) येथे मुळ प्रश्‍न आहे, शहराच्या विकासाचा! कोणत्याही शहराच्या विकासाचे मोजमाप करायचे असल्यास, सर्वप्रथम त्या शहरात सर्वसामान्य नागरिकांना मिळणार्‍या मुलभुत सोईसुविधांचे मुल्यमापन करावे लागते. त्यानंतर त्या शहरातील रोजगार, सुविधा आदींचा समावेश होतो. जर आपण राजकारणाचा चष्मा बाजूला काढून पाहिले तर कुणाच्याही लक्षात येईल की, जळगावचा विकास कुठेतरी खुंटला आहे. गुंडगिरी हळूहळू डोकं वर काढत आहे.

सुरेशदादा असते तर असे झाले असते का? 

जळगावच्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विषयाचा इतका चोथा झाला आहे की, त्यातील गांभीर्य नाहीसे होवून त्याची जागा जोक किंवा मिम्स्ने घेतली आहे. महापालिकेतील काही नेते म्हणू शकतात की, शहरात रस्त्यांची कामे सुरु आहेत. मात्र हा देखील एक मोठा मुद्दा आहे. शहरातील काही गल्लीबोळांमध्ये मोठंमोठे रस्ते झाले आहे, व ज्या भागांना खर्‍या अर्थाने चांगल्या रस्त्यांची गरज आहे, त्यांच्या नशिबी खड्डेच आहेत! यामुळे अनेक जळगावकरांना प्रश्‍न पडतोय, सुरेशदादा असते तर असे झाले असते का? आज जळगाव महापालिकेत नेकमं कोण कुणाच्या बाजूने आहे व कोण कुणाच्या विरोधात हा स्वतंत्र संशोधनाचा प्रश्‍न आहे. सत्ताधार्‍यांवर वचक ठेवण्याचे काम विरोधी पक्षाचे असते, असा आजवर जळगावकरांचा समज होता मात्र आता तर महापौर व विरोधीपक्षनेते पद एकाच घरात आहे, ही लोकशाहीची चेष्टा नव्हे का? सुरेशदादा असते तर असे झाले असते का? महापालिका केवळ मोजके नगरसेवक व अधिकारी चालवत आहेत. त्यात त्यांचा विकास निश्‍चित होतोय मग जळगावचा विकास का होत नाहीये? सुरेशदादा असते तर असे झाले असते का? असे अनेक प्रश्‍न आहेत. शहराच्या विकासाचा प्रश्‍न जेंव्हा येतो तेंव्हा व्यक्ती किंवा राजकीय पक्षांमधील मतभेद बाजूला ठेवणे आवश्यक असते. त्यासोबत विकासाची दूरदृष्टी असणे आवश्यक असते. मात्र नेमक्या याच दूरदूष्टीचा अभाव दिसून येत आहे. तूर्त ऐवढेच...

Post a Comment

Designed By Blogger