पूर्व लडाख भागात स्थित असलेल्या गलवान खोर्यात जून २०२० मध्ये भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये हिंसक झडप घडून आली होती. या हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या चिनी सैनिकांच्या संख्येवरुन चीनने नेहमीच खोटारडेपणा केला. चीनकडून तथ्यांत बदल करून अनेक खोटे दावे करण्यात आले. यासाठी दोन वेगवेगळ्या घटनांना एकत्र करून प्रोपोगंडा फैलावण्यात आला. चीनने कधीही गलवान खोर्यात ठार झालेल्या सैनिकांची संख्या अधिकृतरित्या जाहीर केली नाही परंतु, गेल्या वर्षी या हिंसक झडपेत ठार झालेल्या चार सैनिकांना पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. या प्रकरणातील चीनचा खोटारडापणा पुन्हा उघड झाला आहे. बहुचर्चित गलवान हिंसाचारावर ऑस्ट्रेलियाकडून चीनची पोलखोल करण्यात आली आहे. या हिंसक झडपेत चीनच्या ३८ सैनिकांचा मृत्यू झाल्याचा खुलासा करत ऑस्ट्रेलियाने चीनचा प्रोपोगंडा उजेडात आणला आहे. उल्लेखनीय म्हणजे, या हिंसाचारात केवळ चार चिनी सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा चीनने त्यावेळी करत आपल्याच शहिदांच्या सर्वोच्च त्यागाचा अपमान केल्याचे यामुळे जगासमोर उघड झाले आहे. ऑस्ट्रेलियाचे वृत्तपत्र ‘द क्लॅक्सन’ने चीनचा खोटारडेपणा समोर आणला आहे. चीनकडून मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांच्या संख्येहून ९ पटींनी अधिक सैनिकांचा मृत्यू भारतीय सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झडपेत झाल्याचे ‘द क्लॅक्सन’ने म्हटले आहे. तब्बल दीड वर्षांच्या संशोधनानंतर हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र सोशल मीडिया संशोधकांची टीम गठीत केली होती. या टीमकडून ‘गलवान डीकोडेड’ नावाने आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. अँथनी क्लान यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या या विशेष अहवालामुळे चीनच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे.
चीन सर्वच आघाड्यांवर चीतपट
गलवान घाटीत भारतीय लष्कराच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात २० जवान शहिद झाले होते. मात्र ‘फैसला ऑन द स्पॉट’ करत भारतीय जवानांनी ४३ चीनी सैनिकांना यमसदनी धाडले होते. हा वाद होण्याचे मुख्य कारण म्हणजे, एप्रिल २०२० च्या सुमारास, चिनी सैन्याने गलवान खोर्यात बांधकामाला गती दिली. परंतु १५ जून रोजी एका तात्पुरत्या पुलावरून वादाला सुरूवात झाली. मे २०२० च्या सुरुवातीला तिबेटमधील पँगॉन्ग सरोवराजवळ भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये चकमक झाली. चिनी सरकारी माध्यमे चकमकी आणि त्यानंतरच्या घटना कव्हर करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्या. त्यांनी बरीच तथ्ये लपवून ठेवली. त्यानंतर जगासमोर जे दावे करण्यात आले त्यातील बहुतेक गोष्टी कल्पोकल्पित होत्या. मुजोर व सैन्य शक्तिमध्येही बलवान असलेल्या चीन सारख्या देशाला धोबीपछाड देत भारतीय लष्कराने आपले सामर्थ्य केल्यानंतरही चीनने ते वारंवार नाकारले होते. मुळात चीन हा विस्तारवादी देश अर्थात भूमाफिया म्हणून कुख्यात आले. त्यांच्या या धोरणाला जपान, व्हिएतनाम, तैवानसारखे देश वैतागलेले आहेत. फक्त भारतच नाही तर शेजारच्या सर्व देशांबरोबर चीनचे सीमावाद आहेत. आर्थिक प्रगतीच्या बळावर कमावलेली प्रचंड लष्करी ताकत दाखवून समोरच्याचा आवाज दडपून टाकायचा या नीतीचा वापर चीन गेल्या अनेक वर्षांपासून करत आला आहे. यातही प्रत्यक्ष युद्ध लढण्यापेक्षा युद्धनितीच्या जोरावर अन्य देशांना नामोहरम करायचे दबाव टाकून त्याला तह करण्यासाठी भाग पाडायचे आणि आपला फायदा करुन घ्यायचा, ही चीनची आजवरची रणनिती राहीली आहे. सीमेवर सैन्याची जमवाजमव करणे, त्यांच्या देशाचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधून धमक्या देणे, सैन्य शक्तीचे प्रदर्शन करणे, चर्चा झाल्यानंतर त्याचे लगेच उल्लंघन करणे हा सर्व त्यांच्या युद्धनितीचा एक भाग आहे. भारताविरोधात चीनने याच आयुधांचा वापर केला. मात्र गत काही वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली लडाखमध्ये कुरघोड्या करून सीमेवरील तणाव वाढवणार्या चीनला भारताने सर्वच आघाड्यांवर चीतपट केले. लष्करी, सामरिक, आर्थिक, कूटनीती अशा सर्वच क्षेत्रांमध्ये भारताने चीनला जोरदार धक्के दिले. त्याचा परिणाम म्हणून चीनने गलवान खोर्यातून आपले सैन्य दोन किलोमीटर माघारी बोलावले. प्रत्यक्ष युध्द न करता चीनचा मुकाबला कसा करता येवू शकतो, हे भारताने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे.
भारतीय सैन्याचे अतुलनिय शौर्यदेखील पुन्हा एकदा अधोरेखीत
गलवान खोर्यातील घुसखोरीच्या वादात भारताची मुत्सद्दीगिरी चीनवर भारी पडली. यात प्रामुख्याने भारताने तडजोडीची भाषा न वापरता चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी सीमेवर मोठ्या प्रमाणावर आपले सैन्य वाढवत भारताने चीनला लागून असलेल्या सीमारेषेवर सैन्य आणून ठेवले. चीनला लागून असलेल्या फॉरवर्ड बेसजवळील एअर फोर्सचे सर्व तळ अॅक्टिव्ह केले. गलवान खोर्यासारख्या १४ हजार फूट उंचीवरील प्रतिकुल क्षेत्रात रणगाडे तयार ठेवले. सुखाई-३० एमकेआय, मिग-२९, हॉवित्झर, अपाची, चिनूक, ही सर्व अत्याधुनिक शस्त्रे चीनच्या दिशेने तैनात केली. खास डोंगराळ युद्ध लढण्यात पारंगत असलेली माऊंटन फोर्स सज्ज ठेवली. भारताने आपल्या हद्दीत सुरु असलेले इन्फ्रास्ट्रक्चरचे काम थांबवावे यासाठी चीनच्या दबावापुढे न झुकता भारताने उलट गलवान खोर्याच्या दिशेने जाणार्या ब्रिजची वेगाने उभारणी केली. डीबीओ रोडच्या कामाला गती दिली. एकूणच चीनची दादागिरी खपवून घ्यायची नाही, हाच चंग भारताने बांधला होता. ५९ चिनी अॅपवर बंदी, रस्ते प्रकल्पातून चिनी कंपन्यांची हद्दपारी असे आर्थिक आघाडीवर चीनला दणके देणारे निर्णय घेतले. आता पुन्हा एकदा गलवान हिंसाचाराचा मुद्दा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, ऑस्ट्रेलियाकडून झालेली पोलखोल! ‘गलवान डीकोडेड’या मोहिमेवर काम करणार्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, १५-१६ जून २०२० च्या रात्री झिरो अंशाच्याही खाली गेलेल्या तापमानात वाहून गेल्याने अनेक चिनी सैनिकांचा मृत्यू झाला होता. चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘वीबो’च्या अनेक वापरकर्त्यांच्या ब्लॉगच्या आधारे त्या रात्री ३८ चिनी सैनिक नदीत वाहून गेल्याचा दावा ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने केला आहे. मात्र, चिनी अधिकार्यांकडून या सर्व सोशल मीडिया पोस्ट हटवण्यात आल्या होत्या. मृत्युमुखी पडलेल्या ३८ जणांत चीनकडून पदक जाहीर करण्यात आलेल्या ज्युनियर सार्जंट वांग झुओरान यांचाही समावेश होता. आताही चीनची शेपटी वाकडीच आहे. कारण गलवान खोर्यातील संघर्षात सहभागी असलेल्या लष्करी कमांडरला प्रतिष्ठित खेळाचा मशाल वाहक बनवून सन्मानित करण्यात आले. या घटनेचा निषेध भारताकडून करण्यात आला. बीजिंगमधील भारतीय दूतावास २०२२ हिवाळी ऑलिंपिकच्या उद्घाटन किंवा समारोप समारंभास उपस्थित राहणार नसल्याची घोषणा भारताकडून करण्यात आली होती. मात्र या सर्वप्रकारामुळे चीनचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर आलेला तर आहेच मात्र त्याचवेळी भारतीय सैन्याचे अतुलनिय शौर्यदेखील पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.
Post a Comment