शाळांमध्ये हिजाब घालण्याचा वाद आता संपूर्ण कर्नाटकात पसरला आहे. रस्त्यावरून हिजाब घालून जाणार्या विद्यार्थीनीला ‘जय श्रीराम’ असे म्हणत काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आव्हान दिले. त्यानंतर ‘अल्लाहू अकबर’चा नारा देत उत्तर दिले. हे असे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता कर्नाटकात वातावरण चांगलेच तापले आहे. उडुपीमधील काही विद्यार्थ्यांना हिजाब परिधान केल्यामुळे वर्गात प्रवेश नाकारण्यात आला. त्याविरोधात मुलींनी हायकोर्टात याचिका दाखल केली. हिजाब घालू न देणे हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या वादाला हिंदू विरुध्द मुस्लिम अशी किनार असल्याने हा विषय थेट देशातील शांततेसाठी निगडीत विषय आहे. भारतात अशा प्रकारच्या वादांमुळे देशाला किती मोठी किंमत चुकवावी लागली आहे, हे सर्वांनाच ठावूक आहे. असे असतांना राजकीय पक्षांकडून या वादाला अनावश्यक हवा दिली जात आहे. हा वाद म्हणजे केवळ ठिणगी आहे. तीला वेळीच विझवायला हवी, त्याचे रुपांतर वणव्यात झाले तर त्यामुळे देशाची शांतता धोक्यात येवू शकते.
लहानसहान वादांवरुन मोठे वादंग उभे राहण्याची फॅशन
अलीकडच्या काही वर्षात लहानसहान वादांवरुन मोठे वादंग उभे राहण्याची जणू फॅशनच झाली आहे. अशा वादांसाठी विद्यार्थ्यांचा वापर करणे सोपे असल्याने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वारंवार आंदोलने उभी करण्याचे प्रकार देखील वाढत आहेत. कोरोनापूर्व काळात जेएनयूमध्ये मोठे आंदोलन उभे राहिले होते. कॉलेज कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या प्रश्नात राजकारण्यांनी उडी घेतल्याने या आंदोलनाचे लोण संपूर्ण भारतभर कधी पसरले? हे कळलेच नाही. मात्र त्यामुळे विद्यार्थी वर्गात भयाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर एमपीएससीच्या परीक्षांमधील गोंधळामुळे राज्यभर आंदोलन उभे राहिले होते. नुकतेच दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या निर्णयावरुनही हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. आता कर्नाटकात शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब विरुद्ध भगवा असा वाद निर्माण झाला आहे. शाळांमध्ये हिजाब घालण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. काही ठिकाणी तर बजरंग दलाने विद्यार्थीनींनी भगवा स्कार्फ घालण्याची सक्ती केली आहे. तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये जय श्रीरामचे नारेही दिले जात आहेत. कुंदापुरातील शाळा-महाविद्यालयात जय श्रीरामचे नारे दिल्याने वातावरण तंग झालं आहे. या वादामुळे कर्नाटक सरकार कर्नाटक एज्युकेशन अॅक्ट १९८३चे कलम १३३ लागू केले आहे. त्यामुळे सर्वांना समान ड्रेस घालावा लागणार आहे. खासगी शाळा स्वत:चा ड्रेस कोड निवडू शकणार आहेत. तर सरकारी शाळांमध्ये ठरलेला ड्रेसच घालून यावे लागणार आहे. या आदेशामुळे हिजाबचा वाद अधिकच वाढला आहे. मुस्लिम विद्यार्थीनींच्या मते त्या पूर्वी हिजाब घालूनच शाळा-महाविद्यालयात यायचो. त्यावर पूर्वी कधी वाद झाला नाही. कुणी आक्षेप घेतला नाही. मात्र आता हिजाबवर वाद केला जात आहे, दुसरीकडे एका वर्गाला ड्रेसचा आणि शिक्षणाचे काही घेणे देणे नसल्याचे वाटते. मात्र, सर्व शाळेत एक समान नियम असावेत असे या वर्गाचे म्हणणे आहे. हिजाब बंदीचे प्रकरण न्यायलयात गेले असून, याप्रकरणी न्यायालयाने बुधवारपर्यंत सुनावणी तहकूब केली.
अन्यथा पुढची पिढी राजकारण्यांना कधीच माफ करणार नाही
दरम्यान, कॉलेज परसरात एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. जिथे मुस्कान नावाची एक तरुणी हिजाब घालून कॉलेजमध्ये येते. तेव्हा तिथे असलेला जमाव तरुणीच्या दिशेने येतो. त्यानंतर या तरुणीच्या समोर घोषणा दिल्या जातात. तेव्हा ही तरुणीही प्रत्युत्तरदाखल घोषणा देताना दिसते. या तरुणीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या वादावर तिने मत व्यक्त केले आहे. मुस्कान म्हणते की, मी आणि माझ्या इतर मुस्लीम मैत्रिणीहिंदू मित्रांमध्ये स्वत:ला सुरक्षित समजतो. आमच्यामध्ये कधीही धर्माच्या गोष्टी होत नाहीत. हे सगळे बाहेरचे लोक करत असल्याचे तिने म्हटले आहे. यावरुन या वादाचे मुळ वेगळेच असल्याचे स्पष्ट होते. हिंदू मुस्लिम वाद देशासाठी नवे नाही १९४७ पासून किंबहूना त्या आधीपासून यावादाची मोठी किंमत देशाला चुकवावी लागली आहे. जगातील सर्वात जास्त मुस्लीम लोकसंख्या असलेल्या पहिल्या १० देशांच्या यादीत इंडोनेशिया हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. इंडोनेशियामध्ये सध्या २१ कोटी मुस्लीम नागरिक आहेत. त्यानंतर दुसर्या क्रमांकावर भारत आहे. भारतात सुमारे १९ कोटी ४८ लाख मुस्लीम नागरिक आहेत. तिसर्या क्रमांकावर पाकिस्तान आहे. पाकिस्तान हा मुस्लीम बहुलदेश असुनही त्या देशातील मुस्लीम नागरिकांची संख्या भारतापेक्षा कमी आहे. पाकिस्तानात १८ कोटी ४० लाख मुस्लीम नागरिक आहेत. या यादीत चौथ्या क्रमांकावर बांगलादेश आहे तर पाचव्या क्रमांकावर नायजेरिया आहे. पाकिस्तानसह जगभरात अनेक ठिकाणी मुस्लिमांवरील कथित अत्याचारावर नेहमी चर्चा होते मात्र भारतामधील मुस्लीम हे जगातील इतर कोणत्याही इस्लामिक देशामध्ये राहणार्या मुस्लिमांपेक्षा जास्त सुरक्षित मानले जातात. कारण ते ‘भारतीय’ आहेत. भारतात सर्व धर्मिय समभाव मानला जातो हेच भारतिय एकत्मतेचे प्रतिक आहे. मुस्लिमांच्या प्रश्नांवरुन भारतात राजकीय वाक्युध्द बर्याचदा रंगते मात्र भारताच्या एकात्मतेला तडा जावू दिला जात नाही. सीएए, एनआरसी, राम मंदीरसारख्या विषयांवरुन मुस्लिमांच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न परकिय शक्तींकडून करण्यात आला. मात्र भारतात केवळ भारतीयच राहतात, हे पुन्हा एकदा सर्वांनी जगाला दाखवून दिले. हिंदू मुस्लिमांच्या एकतेत विष कालविण्याच्या कोणत्याच प्रयत्नात यश येत नसल्याने प्रत्येकवेळी नवे वाद समोर येतात. आता कर्नाटकात सुरु असलेला हिजाब विरुध्द भगवा त्याच पंग्तीत मोडणारा आहे. या वादावर तातडीने पडदा पडायला हवा, अन्यथा पुढची पिढी आजच्या राजकारण्यांना कधीच माफ करणार नाही.
Post a Comment