क्रिकेटमधील स्टार वॉर

राजकारणातील सत्तासंघर्ष हा विषय देशासाठी आता नवा राहिलेला नाही. मात्र जेंव्हा भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात जेंव्हा खेळाडूंमधील वादाचा विषय येतो तेंव्हा तो उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय ठरल्याशिवाय राहत नाही. असाच एक विषय गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तो म्हणजे टीम इंडियाचे दोन स्टार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील सत्तासंघर्ष! विराटला वन-डे टीमच्या कर्णधार पदावर हटविल्यानंतर सुरु असलेला वाद आता वेगळ्याच वळणावर येवून ठेपला आहे. टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर जाणार आहे. या दौर्‍यामध्ये टेस्ट आणि वन-डे सामने खेळले जाणार आहेत; पण रोहितने अचानक आपण कसोटी मालिका खेळू शकत नाही अशी भूमिका जाहीर केली, तर आपण एकदिवसीय सामने खेळणार नाही, अशी घोषणा विराट कोहली याने केली होती. यासाठी दोघांनी वेगवेगळी कारणे दिली असली तरी विराटला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळायची इच्छा नाही, तर रोहितला विराटच्या नेतृत्वाखाली खेळायची इच्छा नाही, असेच दिसून येते. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर आता हा वाद केवळ विराट व रोहित यांच्यातील वैयक्तीक वाद राहिला नसून यात बीबीसीआय व टीम इंडियाचा माजी कर्णधार तथा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांचीही एन्ट्री झाली आहे.क्रिकेट जगतात खळबळ

काही महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने आपण टी-२० क्रिकेटचे कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर या क्रीडा प्रकाराचे कर्णधारपद रोहित शर्मा याच्याकडे जाणार हे निश्चित झाले होते आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याचप्रमाणे टी २० चे कर्णधारपद रोहित शर्माला बहाल केले. जेव्हा विराट कोहलीने टी-२० चे कर्णधारपद सोडले होते तेव्हा आपण एकदिवसीय क्रिकेटचे कर्णधारपद कायम ठेवणार असल्याचे त्याला सूचित करायचे होते; पण क्रिकेट नियामक मंडळाने काही दिवसांपूर्वी निर्णय घेऊन विराट कोहली यांच्याकडील एकदिवसीय क्रिकेटचे कर्णधारपदही काढून घेतले आणि ती जबाबदारीही रोहितकडे देण्यात आली. विराट कोहलीला खरे तर एकदिवसीय क्रिकेटचे नेतृत्व सोडायची इच्छा नव्हती; पण विनाकारण एकाच प्रकारच्या क्रिकेटमध्ये दोन संघनायक नकोत म्हणून भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी विराट कोहलीकडून या क्रिकेटचे नेतृत्व काढून घेतले. यावर गांगुली म्हणाले की, बोर्डाने सप्टेंबरमध्येच त्याला सांगितले होते की, जर त्याने टी-२० कर्णधारपद सोडले तर त्याला वनडेमध्ये कायम ठेवणे कठीण होईल. त्यामुळे तो टी-२० मध्ये कर्णधार पदी कायम राहिला. गांगुली यांच्या म्हणण्यानुसार, विराटने तसे करण्यास नकार दिला आणि त्यानंतर बीसीसीआयकडे विराटकडून एकदिवसीय कर्णधारपद घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. गांगुलीच्या मते, वनडे आणि टी २० मध्ये दोन कर्णधार असू शकत नाहीत. यातील नवा पैलू विराटच्या पत्रकार परिषदेनंतर समोर आला. विराट कोहलीने बुधवारी पत्रकार परिषद घेऊन बीसीसीआय आणि मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. त्यानंतर क्रिकेट जगतात खळबळ निर्माण झाली. दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी टेस्ट टीमची घोषणा व्हायच्या दीड तास आधी मला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्याचे सांगण्यात आले, असे विराट म्हणाला. टी-२० टीमची कॅप्टन्सी सोडण्याआधी आपण बीसीसीआयला याबाबत माहिती दिली, पण याबाबत बीसीसीआयसोबत काहीच बोलणे झाले नाही, असा दावा विराटने केला. दरम्यान, बीसीसीआयच्या एका अधिकार्‍याने केलेल्या दाव्यानुसार, विराट कोहलीसोबत टी-२० च्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याच्या मुद्द्यावर ८ लोकांच्या उपस्थितीत चर्चा झाली होती. बैठकीत विराटला स्पष्टपणे विचारण्यात आले की, टी-२० चे कर्णधारपद सोडणे योग्य आहे का? त्या बैठकीला विराटशिवाय आठ जण उपस्थित होते. त्यात पाच निवड समितीचे सदस्य तसेच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा आणि रोहित शर्मा यांचा समावेश होता. यामुळे हा विषय वरकणी जितका साधा सरळ वाटतो तसा तो निश्‍चितच नाही. 

भारतीय क्रिकेटचे मोठे नुकसान होवू शकते

भारतीय क्रिकेटमध्ये सुरू असलेल्या स्टार वॉरचे आता सत्तासंघर्षात रूपांतर होत आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी कसोटी कर्णधार विराट कोहलीला बोर्डाच्या ताकदीची जाणीव करून देण्यासाठी तयारी केली आहे. याचे संकेत देताना त्यांनी म्हटले आहे की, बोर्ड विराट कोहलीचे प्रकरण आपल्या पद्धतीने हाताळेल. तसे पाहिल्यास विराट आणि रोहित यांच्यातील अंतर्गत वादाची चर्चा खूप दिवसांपासून सुरु आहे. दोन्ही खेळाडूंनी यास नकार दिला असला तरी नेमकं खरं काय आहे? याची माहिती बीसीसीआयला नसेल, हे मान्य करता येणार नाही. या वादाला काही प्रमाणात बीसीसीआय देखील जबाबदार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने मोठ्या प्रमाणावर प्रगती केली असूनही आयसीसीने पुरस्कृत केलेल्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला विजेतेपद पटकावता न आल्याने त्याचा ठपका विराटवर ठेवण्यात आला आणि त्याच्याकडून एकेक कर्णधारपद काढून घेण्यात आले. काही महिन्यांपूर्वी इंग्लंडमध्ये खेळविण्यात आलेल्या कसोटी विजेतेपद अजिंक्यपद स्पर्धेमध्येही भारताला न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली होती. यामुळे विराट बीसीसीआयच्या निशाण्यावर होताच, असे स्पष्टपणे दिसून येते. मुळात टीम इंडिया आता फुल्ल फॉर्मात आहे. अशा परिस्थितीत दोन दिग्गज खेळाडूंमधील वादाचा फटका भारतीय क्रिकेटला बसू शकतो. भारतीय क्रिकेटला अशा प्रकारचे राजकारण आणि सत्तासंघर्ष जरी नवीन नसला तरी जागतिक क्रिकेटमध्ये ज्यांच्याकडे आदराने पाहिले जाते ते विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासारख्या खेळाडूंबाबत या गोष्टी घडत असल्याने त्यांच्या वैयक्तिक कामगिरीवर परिणाम झाला, तर त्यामुळे भारतीय क्रिकेटचे मोठे नुकसान होवू शकते. यामुळे यात आता बीसीसीआय आणि सौरभ गांगुली यांची भुमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे.

Post a Comment

Designed By Blogger