पुन्हा किलबिलाट

कोरोना संक्रमणामुळे गेली दीड वर्षाहून अधिक काळ शाळा न पाहिलेल्या चिमुकल्यांना आता शाळेत जाता येणार आहे. पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्यानंतर आता इयत्ता पहिली ते चौथीचे वर्गही ऑफलाइन सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे शाळांमध्ये पुन्हा एकदा किलबिलाट होणार आहे. उर्वरित इयत्ता म्हणजे ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवीच्या शाळा येत्या १ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याचा निर्णय मात्र तूर्त ऐच्छिक असणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती केली जाणार नाही. कोविड-१९ संबंधित खबरदारीचे उपाय आणि एसओपी लवकरच जारी करण्यात येणार आहेत. दीर्घ काळापासून शाळा बंद असल्याने मुले घरीच कोंडून राहत असून, टीव्ही आणि मोबाइल एवढेच त्यांचे भावविश्व बनून राहिल्याने पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमुळे विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून घरी बसावे लागले असल्यामुळे शाळा सुरु होणे ही विद्यार्थी आणि पालकांची मानसिक गरज होती. आता ती पूर्ण होणार आहे.शिक्षणक्षेत्राचे जे नुकसान झाले  ते कधीच निघणार नाही

२३ मार्चपासून देशातील सर्व शाळा-महाविद्यालयांना टाळे लागले. मध्यंतरी काही दिवस शाळा सुरु करण्यात आल्या मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने त्या पुन्हा बंद करण्यात आल्या. आता गत दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर, ऑक्टोबरपासून शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे आणि ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. आता तब्बल वीस महिन्यानंतर शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवीचे आणि ग्रामीण भागात इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी शाळेत जाणार आहेत. गेल्या वर्षी इयत्ता पहिलीत असणारे आणि सध्या इयत्ता दुसरीत असणारे विद्यार्थी शाळा प्रवेश होऊनही तब्बल दोन शैक्षणिक वर्षांनंतर आता शाळेत जाणार आहेत. राज्यातील इयत्ता पहिली आणि दुसरीत असणारे तब्बल ३६ लाख ४८ हजार ४७५ विद्यार्थी एक डिसेंबरपासून पहिल्यांदाच शाळेत पाऊल ठेवणार आहेत. राज्यात सध्या १७ लाख ७० हजार ३९१ विद्यार्थी पहिलीत, तर १८ लाख ७८ हजार ८४ विद्यार्थी दुसरीमध्ये आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेत बसून शिक्षण घेण्याचा आनंद डिसेंबरपासून घेता येणार आहे.कोरोनामुळे अनेक क्षेत्रांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान भविष्यात भरुन निघणारे आहे मात्र शिक्षणक्षेत्राचे जे नुकसान झाले आहे ते कधीच निघणार नाही. कोरोना आणि त्यातून निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीत सध्या सर्वात मोठा प्रश्न चर्चिला जात आहे, तो म्हणजे शिक्षणाचा. राज्यात लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या भवितव्याचे काय, हा शिक्षक आणि पालकांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न ऑनलाईन साधनाने तात्पुरता का होईना सोडविला. मागील वर्षापासून पासून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारावा लागला असला तरी ही व्यवस्था शहरांमधील मोठ्या शाळांपुरती मर्यादित आहे. ग्रामीण भागात सर्वत्र इंटरनेट उपलब्ध नसल्याने शालेय शिक्षण रखडले आहे. हे देखील तितकेच सत्य आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातील माहितीनुसार, राज्यात असलेल्या १ लाख ६ हजार २३७ पैकी ६ हजार ६०० प्राथमिकच्या आणि माध्यमिकच्या ५७० शाळांमध्ये वीज नाही, तर सुमारे ३००० हून अधिक शाळांचे वीज कनेक्शन बिल न भरल्याने कापले गेलेले आहे. ३१.७६ टक्के विद्यार्थ्यार्ंकडे मोबाईल नाही. तर राज्यभरात अद्याप ३५ टक्के विद्यार्थ्यांकडे टीव्ही उपलब्ध नाही. ग्रामीण, आदिवासी पट्ट्यात असलेल्या तब्बल दहा टक्के विद्यार्थ्यांकडे अजूनही टीव्ही, मोबाईल, रेडिओ आणि ऑनलाईन शिक्षणासाठी इतर कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. 

येणार्‍या काळात गाफिल राहून चालणार नाही

या सर्व समस्यांच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले, हे सत्य कुणीही नाकारु शकणार नाही. दुसर्‍या बाजूला ऑनलाईन शिक्षणाने केवळ विवेचन झाले. परंतु; अनेक विद्यार्थ्यांना विषयांचा आशयच समजलेला नाही. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना काहीप्रमाणात मदत नक्कीच झाली. पण विद्यार्थ्यांना या शिक्षणात गोडी निर्माण झाली का, विषयाचे आकलन होते का, त्यांच्या डोळ्यांवर काही परिणाम तर होत नाही ना, असे एक ना अनेक प्रश्न  डोळ्यांसमोर उभे राहिले. ऑनलाईन शिक्षणात अनेक मर्यादा आल्या. नेटवर्क नसणे, आवाज नीट न येणे, मुलांचा गोंधळ, शिकवलेले नीट आकलन न होणे अशा कितीतरी समस्यांचा सामना करावा लागला. ऑनलाईन शिक्षण पर्याय म्हणून ठिक. परंतु; तोच शिक्षणाचा मुख्य पर्याय होऊ नये यासाठी शिक्षणाची ही कोंडी फोडण्याचे आव्हान मानले जात असतांना त्यावरील एकमेव उपाय म्हणजे प्रत्यक्षात शाळा सुरु करणे! राज्यासह देशात कोरोनाचा अंत जवळ येतांना दिसत असल्याने शाळा सुरु करण्याची मागणी विद्यार्थी, पालक व शिक्षणतज्ञांकडून होत होती. आता त्यास राज्य शासनाने मंजूरी दिली असल्याने राज्यातील सर्व शाळांमध्ये १ डिसेंबर पासून पुन्हा एकदा किलबिलाट दिसणार आहे. शाळा सुरु होणार ही जरी आनंदाची बाब असली तरी येणार्‍या काळात गाफिल राहून चालणार नाही. अमेरिका, युरोपसह अनेक देशांमध्ये कोरोनाच्या चौथ्या व पाचव्या लाटेने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. यापार्श्वभूमीवर आपल्यालाही जास्त काळजी घ्यावी लागणारच आहे. देशात लसीकरण मोहिमेने वेग घेतला असला, तरी शालेय विद्यार्थ्यांसाठी लस अद्याप बाजारात उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे लसीकरण न होता बाहेर फिरणार्‍या व्यक्ती इतकीच काळजी विद्यार्थ्यांना घ्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर राहणे, शाळांचे सॅनिटायझेशन, घरापासून शाळेपर्यंत पोहोचण्याचे आणि परत घरी येण्यासाठी वाहनाचे नियोजन, स्वच्छतागृहांचे नियोजन यासारख्या सर्व बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता, शाळा सुरू करण्याचे सुयोग्य मापदंड पाळून, पूर्वतयारी करून, काही पथ्ये पाळून अंगणवाड्या व शाळा विनाविलंब सुरू करून, तेथे मुलांना पूरक आहार दिला जावा. शाळा सुरू करताना आणि चालवताना घ्यायची काळजी घ्यावी. एवढीच माफक अपेक्षा आहे. कारण येथे लाखों विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न अधिक महत्वाचा आहे.

Post a Comment

Designed By Blogger