काँग्रेसला अच्छे दिन!

महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष असणार्‍या काँग्रेसने पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. राज्यात आगामी काळात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाने स्थानिक पातळीवर कोणत्याही इतर पक्षांशी तडजोड करू नये, असे स्पष्ट आदेश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वांना दिला आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेस महापालिका निवडणुकांसह, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका या एकट्याने लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या इतर अनेक नेत्यांनी या अगोदर स्वबळाचा नारा दिला होता. परंतु काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र आता पुन्हा एकदा काँग्रेसने स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष काय करणार, यावर चर्चा होणे स्वाभाविकच आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांमध्ये आघाडी होणार का याचीही चर्चा रंगत आहे. पक्षातील सहकार्‍यांना कोंडीत पकडले

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या भिन्न विचारसरणीच्या पक्षांनी एकत्र येत राज्यात महाविकास आघाडीची मोट बांधली आहे. महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून संपूर्ण श्रेय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाच जाते. मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असल्याने सेेनेचे पारडेही जड राहते. यात मात्र सर्वात जास्त कुचंबना काँग्रेसपक्षाची होते. देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस सन २०१४ पासून सातत्याने अडचणीत असल्याचे चित्र केंद्रीय पातळीवर दिसून येते. महाराष्ट्रात तर काँग्रेसची अवस्था आधीच बिकट झाली असतांना आता राष्ट्रवादी व शिवसेनेच्या डावपेचात काँग्रेसलाच धक्के खावे लागत असल्याने पक्षाच्या जुन्या नेत्यांसह तरुण पिढीतही नाराजीची धुसफुस वाढत आहे. राष्ट्रावादी आणि शिवसेनेच्या गाड्याखाली किती दिवस चालायचे? असा उद्ग्नि सवाल आता पक्षातूनच होवू लागला आहे. काँग्रेसला शरद पवारांसारख्या मुत्सद्दी नेत्यांशी लढायचे असेल तर राज्याचे नेतृत्व आक्रमक असावे, याची जाणीव दिल्लीश्वरांना असल्याने प्रदेशाध्यक्षांची जबाबदारी नाना पटोले यांच्याकडे सोपविण्यात आली. नाना पटोले सातत्याने स्वबळाचा नारा देत राष्ट्रवादी व शिवसेनेला डिवचत असले तरी त्यामुळे काँग्रेसमध्ये जोश येतांना दिसत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गेल्या कित्येक दिवसांपासून स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी ठाम आहेत. त्यांनी वारंवार घटक पक्षातील सहकार्‍यांना कोंडीत पकडले होते. टीकाही केली होती. आता त्यांनी आक्रमक होत पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. आगामी विधानसभा व लोकसभेची रंगित तालीम म्हणून फेब्रुवारीमध्ये होणार्‍या महापालिका निवडणुकांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा किल्लाही काँग्रेस एकट्याने लढून स्वबळ आजमवणार आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवा, असे पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षांना दिले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत स्थानिक पातळीवर परस्पर निर्णय घेऊ नयेत. कसल्याही तडजोडी करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात होणार्‍या महापालिका निवडणुका रंगतदार होणार आहेत. 

काँग्रेसमधील मरगळ दूर होण्यास सुरुवात 

राज्यात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुका आणि इतर निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे काँग्रेसने आगामी सर्व निवडणुका या स्वबळावर लढवाव्यात, असे काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे मत आहे. त्याच दृष्टिकोनातून काँग्रेस नेत्यांची एक बैठकदेखील नुकतीच पार पडली होती. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पटोले यांनी सर्व जिल्हाध्यक्षांना हे पत्र लिहिले आहे. याआधी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी काँग्रेस महापालिकेच्या सर्वच्या सर्व २२७ जागांवर उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेसला प्रतिउत्तर देणार नाही ती राष्ट्रवादी काय? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने गोव्यात काँग्रेस पक्षाला मोठा झटका देण्याची तयारी केली आहे. एनसीपी नेत्यांच्या एक वर्ग ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी यांच्यासोबत गोव्यात तिसर्‍या आघाडीसाठी चर्चेचा सल्ला देत आहेत. एनसीपीचे सरचिटणीस आणि गोवा प्रभारी प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसवर निशाणा साधत काँग्रेसचा काळ संपत चालला आहे, असे म्हटले आहे. गोवामध्ये शरद पवार भाजपविरोधी आणि बिगर काँग्रेस तिसरी आघाडी करण्याची शक्यता आहे. यामुळे गोवा विधानसभा निवडणुकीत आतापासून रंगत येतांना दिसत आहे. उत्तर प्रदेशातही काँग्रेसने एकला चालो रे ची भुमिका घेतली आहे. काँग्रेसच्या या भुमिकेचा कितपत फायदा होतो? याचे उत्तर येणार्‍या काळात मिळणार असले तरी दीर्घ काळानंतर काँग्रेसमध्ये मरगळाऐवजी उत्साह दिसून येत आहे. काँग्रेसमधील हा उत्साह व जोश येणार्‍या काळात पक्षाला अच्छे दिन आणण्यात मोठा फायदेशीर ठरु शकतो, हे सांगायला कुण्या ज्योतिषाची आवश्यकता नाही. मात्र लोकसभेसह महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अजून दिल्ली दूर असल्याने काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होवू शकतो. काँग्रेसच्या भूमिकेमुळे येणार्‍या काळात भाजप-शिवसेना युती होणार का, या चर्चेलाही हवा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, दोन्ही पक्षात तूर्तास वाढलेला दुरावा पाहता, हे एवढे सहज आणि सोपे नाही. त्यामुळे युतीची शक्यता तशी धुसरच आहे, पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतिच भेट घेतली. हे पाहता आगामी निवडणुकीत या दोन पक्षांमध्ये युती होण्याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. मात्र, त्यासाठीही भाजप राज ठाकरे यांची उत्तर भारतीयांप्रती असलेली भूमिका कशी असेल, यावर निर्णय घेऊ शकते. कोण कुणासोबत युती करतो याचे चित्र अद्याप स्पष्ट नसले तरी सध्याच्या राजकीय उलथापालथीचा अंदाज लक्षात घेता येत नसला तरी नाना पटोले यांच्या भुमिकेमुळे काँग्रेसमधील मरगळ दूर होण्यास सुरुवात झाली आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही!

Post a Comment

Designed By Blogger