कडक गांजा

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीच्या गत वर्षभरापासून धडाकेबाज कारवाया सुरु आहेत. एनसीबीची सर्वाधिक चर्चा झाली ती बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर! सुशांतच्या मृत्यूची चौकशी बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा बॉलीवूडचे ड्रग्ज कनेक्शन चर्चेत आहे. मुंबईजवळच्या समुद्रात क्रुझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने छापेमारी करत कारवाई केली. यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक करण्यात आली आहे. आर्यनला अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीच्या विरोधात मोठी आघाडी उघडली आहे. एनसीबीच्या या कारवाईवर नवाब मलिक यांनी प्रश्‍न चिन्ह निर्माण करत थेट एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांच्या फैरी सुरू केल्या आहेत. एनसीबीच्या तपास प्रक्रियेवर आक्षेप समजू शकतो. मात्र, नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना वैयक्तिक स्वरूपात लक्ष्य करीत आहेत. विशेष म्हणजे, नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना देखील ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. मात्र तेंव्हा शांत असणारे मलिक आर्यनवरील कारवाईने इकते का चवताळले आहेत? हेच समजत नाही.



नवाब मलिक इकते का चवताळले आहेत?

मलिकांनी वानखेडेंवर बोगस जात प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे. त्याचसोबत बॉलिवूड कलाकारांमध्ये दहशत पसरवून त्यांच्याकडून वसुली करत असल्याचा भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. सध्या वानखेडे आणि मलिक यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. छापा टाकून आर्यन खानसह इतर आरोपींना अटक करणे हा बनाव असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. फक्त महाराष्ट्र सरकारला आणि चित्रपटसृष्टीला बदनाम करण्यासाठी एनसीबी या कारवाया करत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे. वानखेडे दुबई व मालदीवला जाऊन बॉलिवूड कलाकारांकडून हप्ता वसुली करत होते, असा गंभीर आरोप वानखेडे यांनी केला आहे. भाजप, एनसीबी आणि काही गुन्हेगार मिळून या मुंबईत दहशत माजवत असल्याचा खळबळजनक आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक एवढ्यावरच थांबले नाहीत, तर समीर वानखेडे यांची नोकरी एका वर्षात जाईल. त्यांच्याविरोधात माझ्याकडे पुरावे आहेत. त्यांना जेलमध्ये जावे लागेल, असा दावा करेपर्यंत मलिक यांची मजल गेली. वानखेडे यांच्या जन्म दाखल्यावर वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचे दर्शवणारी दाखल्याची प्रत मलिक यांनी सादर केली. समीर यांचे आई-वडिल मुस्लीम होते मग त्यांनी राखीव कोट्यातून भारतीय महसूल सेवेत प्रवेश कसा मिळविला, असा सवालही मलिक यांनी केला. मलिक यांनी वानखेडेंच्या पहिल्या लग्नाची छायाचित्रेही प्रसारित केली. त्यानंतर आता पुन्हा नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडेंवर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांचे आरोप फक्त फेटाळलेच नाहीत, तर खोडूनही काढले. मी एक साधा सरकारी अधिकारी आहे. ड्रग्जचे सेवन तसेच त्याची विक्री करणार्‍यांवर कारवाई मी करतो. यावरून जेलमध्ये टाकत असतील, तर मी त्यांचे स्वागत करतो, असे सडेतोड उत्तरही त्यांनी दिले आहे. या सर्व प्रकरणात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील नेत्यांनी सावध भुमिका घेतली असली तरी नवाब मलिक दररोज अकालतांडव करतांना दिसत आहेत. एनसीबीने त्यांच्या जावायाला ड्रग्ज प्रकरणी अटक करुन तुरुंगात टाकल्याने त्यांचा संताप समजू शकतो. मात्र त्यावेळी त्यांनी इतकी आक्रमक भुमिका का घेतली नाही? सुशांतसिंह मृत्यूप्रकरणानंतर झालेल्या चौकशीवेळी मलिक का शांत होते? जर त्यांच्याकडे समीर वानखेडेंविरोधात पुरावे आहेत तर त्यांनी त्याची तक्रार केली नाही? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे अनुत्तरित आहेत. 

स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसर्‍याचे पहायचे वाकून

राष्ट्रवादीचा एक दिग्गज नेता, माजी गृहमंत्री गेल्या काही दिवसांपासून फरार आहे. १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे पोलीस अधिकार्‍यांना टार्गेट दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या नेत्याबद्दल नवाब मलिक एक शब्दही बोलत नाहीत. हा प्रकार म्हणजे स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसर्‍याचे पहायचे वाकून... असा आहे. मलिक यांच्यामुळे आता हे प्रकरण एनसीबी आणि आर्यन खान राहिले नसून मलिक व वानखेडे असे झाले आहे. मलिक खुलेआम धमक्या देत आहेत. जर वानखेडेंनी खरंच काही चुकीचं केले असेल तर मलिक यांनी पोलीसात जावे, स्वत:च्या पक्षाचे नेतेच गृहमंत्री आहेत. जर स्वत:च्या गृहमंत्र्यांवर विश्‍वास नसेल तर ते न्यायालयात देखील जावू शकतात. मग दररोज पत्रकार परिषदा घेवून मुख्य विषयाकडून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न कशाला? विशेष म्हणजे, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचा अन्य कोणताही नेता अवाक्षर देखील काढत नाही. ना मलिक यांचे समर्थन करत, ना समीर वानखेडेला लक्ष्य करत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी तर, मलिक आणि वानखेडेंचे प्रश्न मला विचारू नका. ते त्यांना विचारा, असे सांगून थेट हात झटकले. मला तेवढाच उद्योग नाही. इतरही भरपूर कामे आहेत, अशी टिप्पणी अजित पवार यांनी केली होती. यामुळे यावादापासून राष्ट्रवादीला चार हाताचे अंतर राखायचे आहे, हे स्पष्ट होते. आजमितीला पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत, माजी गृहमंत्री व माजी पोलीस आयुक्त फरार आहेत. असे असतांना. आर्यन खानच्या प्रकरणाचा एवढा धुराळा उडविण्यामागचा उद्देश काय असेल? असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही. याप्रकरणात वानखेडेंवर आरोप झाल्याने त्यांची चौकशी होईल कदाचित बदलीही होईल, मात्र या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढल्यानंतर जे काही समोर येईल, त्याचे परिणाम देखील भोगण्याची तयारी संबंधितांनी ठेवायला हवी. हे प्रकरण संवेदनशिल आहे, ते कधीही बुमरँग होवू शकते, याची जाणीव अन्य नेत्यांना असल्यामुळेच कदाचित त्यांनी या वादापासून स्वत:ला व पक्षाला दूर ठेवले असावे!

Post a Comment

Designed By Blogger