दहशतवाद्यांची बदलती कार्यपध्दती

जम्मू -काश्मीरच्या पूंछमध्ये सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कराच्या एका अधिकार्‍यासह ५ जवान शहीद झाले. हल्लेखोर दहशतवादी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. गेल्या दीड वर्षांपासून थंडावलेल्या दहशतवाद्यांच्या कारवाया गत दोन - तिन महिन्यांपासून वाढल्या आहेत. गेल्या आठवड्यात जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी येथे दहशतवादी आणि सैनिकांमध्ये धुमश्चक्री उडाली. काश्मीरात पूंछमध्ये सुद्धा दहशतवादी आणि सैनिकांमध्ये चकमक उडाली. याच प्रकारे बांदीपुरा येथे सुद्धा चकमक घडली. त्यात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव इम्तियाज अहमद डार होते. लश्कर-ए-तोयबाचा सदस्य होता. अनंतनागमध्ये सुद्धा चकमक घडून आली होती. या दहशतवादी हल्ल्यांमध्ये एक नवी पध्दती समोर आली. यावेळी अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या सैनिकांना नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांवर हल्ले चढविले. केवळ हिंदूच नव्हे तर शीखांनाही लक्ष्य केले जेणेकरून त्यांच्यामध्ये दहशत पसरेल. नागरिक हे दहशतवाद्यांचे सॉफ्ट टार्गेट असल्याने या हल्ल्यांवरुन दिसून येते. दहशतवाद्यांनी त्यांची पध्दती का बदलली? हा मोठा प्रश्न आहे.



....हेच दहशतवाद्यांच्या रागाचे कारण 

अफगाणिस्तानावर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर भारताने संयुक्त राष्ट्रात जागतिक दहशतवादाचा संघटितपणे मुकबला केला पाहिजे, असे सांगत जगाला परिस्थितीतील गांभीर्य लक्षात आणून दिले होते. पाकप्रणीत दहशतवाद पुन्हा डोके वर काढेल आणि भारताची डोकेदुखी वाढेल, ही व्यक्त केलेली भीती अनाठायी नसल्याचे आता हळूहळू स्पष्ट होवू लागले आहे. देशात आणि देशाच्या सीमेवर दहशतवादी हल्ल्याचे कट शिजू लागले आहेत. देशभरात सणासुदीची धामधुम सुरू आहे. नवरात्रौत्सव सुरू असतानाच दिवाळीच्या तयारीचीही सुरुवात झाली आहे. याच दरम्यान, राजधानी दिल्लीत मोठा घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एका दहशतवाद्याला अटक केली असून त्या दहशतवाद्याकडून ग्रेनेड, एके ४७ रायफल, अतिरिक्त बंदूक मॅगझीन आणि ६० राऊंड्स, एका हातगोळा तसंच ५० राऊंडसोबत दोन अत्याधुनिक पिस्तूल पप्त करण्यात आल्या आहेत. दुसर्‍या एका घटनेत जम्मू काश्मीर - भारतात उरीसारखा हल्ला पुन्हा करण्याचा दहशतवाद्यांचा कट लष्कराच्या सतर्कतेमुळे उधळण्यात आला आहे. लष्कराने ९ दिवस राबवलेल्या ऑपरेशनमध्ये एक दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला तर एकाने आत्मसमर्पण केले आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यात आले. तेव्हापासून ५ ऑगस्ट २०२१ पर्यंत एकही हिंदू कुटुंब विस्थापित झाले नाही. एलओसीवरील कठोरपणामुळे सैन्याला घुसखोरी रोखण्यात यश आले आहे. दुसरीकडे, घाटीमध्ये, लष्कराने, संशयित तरुणांच्या कुटुंबासह, नवीन दहशतवाद्यांच्या भरतीवरही जवळपास नियंत्रण मिळवले आहे. अनेक तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे. ही गोष्ट सतत दहशतवाद्यांना त्रास देत होती. त्यामुळे त्यांनी बिगर मुस्लिमांवर हल्ले सुरू केले आहेत. सरकारने काश्मिरी स्थलांतरित आणि पश्चिम पाकिस्तानी शरणार्थिंना ४.५ लाख स्वदेशी प्रमाणपत्र वितरित केले आहेत. यामुळे बिगर मुस्लिम उत्साहित होते आणि हेच दहशतवाद्यांच्या रागाचे कारण आहे. म्हणूनच केवळ हिंदूच नव्हे तर शीखांनाही लक्ष्य केले जात आहे जेणेकरून त्यांच्यामध्ये दहशत पसरेल. असा होरा या दहशतवाद्यांचा दिसून येतो. 

 भारताला डसणार्‍या विषारी नागांची फण ठेचावीच लागणार 

मात्र याचवेळी दहशतवादी संघटनांकडे खोर्‍यात स्थानिक दहशतवाद्यांची कमतरता आहे. म्हणून, पाकिस्तानमधून कार्यरत दहशतवादी संघटनांनी पार्टटाइम दहशतवाद्यांकडून हल्ले करण्याची पद्धत स्वीकारली आहे. ही माहिती लष्करी गुप्तचर संस्थांना खोर्‍यात बसलेल्या हँडलर्सला पाकिस्तानातून पाठवलेल्या संदेशाला इंटरसेप्ट केल्याने मिळाली आहे. हे संदेश घाटीतील स्लीपर सेल्सच्या हँडलर्सला येतात. गेल्या काही दिवसांमध्ये सामान्य नागरिकांवर जे हल्ले झाले, त्यामध्ये नवीन हल्लेखोर होते. त्यांचा यापूर्वीचा कोणताही रेकॉर्ड नाही. दहशतवादी संघटना त्यांना मोठी रक्कम देऊन त्यांच्या वापर करत आहेत. यानंतर त्यांचे दहशतवादी संघटनांसोबत नाते तोडून टाकतात, यामुळे त्याना ट्रेस करणे कठीण जात आहे. हिजबुल मुजाहिदीन, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहंमदसारख्या दहशतवादी संघटना जम्मू भागात जवाहर बोगद्याजवळ हल्ल्याचा कट करू लागल्या आहेत. राजौरी व पूंछ या सीमेवरील जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरून प्रशिक्षित दहशतवाद्याला घुसखोरीसाठी पाठवले जात आहे. दहशतवाद्यांच्या आर्थिक पोषणासाठी या भागात ड्रगच्या व्यवसायाला प्रोत्साहन दिले जात आहे. अलीकडच्या काही आठवड्यांत पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत सुमारे २ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्याव्यतिरिक्त राजौरीच्या थानामंडी, सुंदरबनी भागातही अनेक चकमकी घडू लागल्या आहेत. काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांना झालेल्या प्रचंड हानीची भरपाई म्हणून जम्मूत दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न केला जात आहे. डोडा, किश्तवाड, रामबनच्या डोंगराळ जिल्ह्यात दुर्गम भागात शस्त्रे, दारूगोळ्याची खेप रवाना केली जात आहे. सीमेवरील सांबा व कंठुआ ‘ड्रोन’ च्या समस्येला तोंड देत आहेत. येथे रेडिमेड आयईडीसह शस्त्रांची खेप नियमितपणे सोडली जात आहे. गर्दीची ठिकाणे तसेच महत्त्वाची सार्वजनिक ठिकाणे दहशतवाद्यांच्या रडारवर आहेत. २७ जून २०२१ रोजी जम्मूच्या हवाई दलाच्या स्थानकावर ड्रोन हल्ला झाल्यानंतर ड्रोन स्पॉटिंगच्या डझनावर हल्ले करण्यात आले. यावरून दहशतवाद्यांनी स्थानिकांच्या मदतीने कारवायांचा कट केलेला दिसतो. जम्मू-काश्मीर पोलिसांनुसार जुलै २०२१ पासून आतापर्यंत जम्मू भागात दहशतवाद्यांशी पाच चकमकी झाल्या. त्यात सात दहशतवाद्यांचा सफाया झाला. दहशतवाद्यांची ही बदलती कार्यपध्दती सुरक्षा यंत्रणांची मोठी डोकंदूखी ठरतांना दिसत आहे. सुरक्षा तज्ञांच्या अंदाजानुसार, भारताच्या कडक सुरक्षानितीमुळे दहशतवादी बिथरल्याने त्यांना आता वेगळाच मार्ग निवडलेला दिसतो. जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित करायची असेल तर भारताला डसणार्‍या या विषारी नागांची फण ठेचावीच लागणार आहे. त्याशिवाय हे सुधारणार नाहीत.

Post a Comment

Designed By Blogger