लहान मुलांचं लसीकरण

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने अनेक राज्यांमध्ये शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. अनेक विद्यार्थी आणि शिक्षक शाळेत परतत आहेत. असे असले तरी तिसर्‍या लाटेचे भीती अजूनही कायम आहे. जर कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली तर त्यामध्ये मुलांची संख्या जास्त असण्याची दाट शक्यता आहे. देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाने वेग घेतल्याने देशभरात आज जवळपास ९६ कोटी लसींचे डोस देशातील प्रौढ लोकांना देण्यात आले आहेत. मात्र हे सर्व डोस १८ वर्ष वयापेक्षा जास्त लोकांना देण्यात आले आहेत. लहान मुलं लसीकरणापासून अद्यापही दूर असल्याने त्यांची काळजी वाटणे स्वाभाविकच आहे. अशा या संकटात केंद्र सरकारने एक आनंददायी बातमी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या लहान मुलांच्या लसीला अखेर केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता २ वर्षावरील मुलांना कोरोनाची लस मिळणार आहे. तिसर्‍या लाटेपूर्वी केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक पालकांना दिलासा मिळणार आहे. ड्रग अँड कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) कोव्हॅक्सिनला दिलेल्या परवानगीनंतर आता देशभरात लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.



लसीकरण मोहिमेत नवा अध्याय लिहिला जाणार

गेली दिड वर्षं शाळा बंद होत्या. याकाळात मुले घरी असल्याने त्यांच्यात एकटेपणा वाढून मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले होते. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये शाळा सुरु झाल्या आहेत. शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बस ड्रायव्हर अशा व्यक्ती ज्या मुलांच्या संपर्कात येतात. त्यांचे लसीकरण करणे बंधनकारक करण्यात आले असले तरी मुलांसाठी अद्याप कोणतीही लस उपलब्ध नव्हती. यामुळे मुलांना शाळेत पाठवायचे का नाही? हा प्रश्न अनेक पालकांना सतावत होता. आता ही काळजी लवकरच मिटणार आहे. देशातील कोरोना लसीकरण मोहिमेत आता आणखी एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे. कारण लहान मुलांसाठी कोविड१९ संबंधीच्या विषय तज्ज्ञ समितीने डीसीजीआयकडे भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीची शिफारस केली आहे. त्यामुळे लवकरच दोन ते अठरा वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरु होणार आहे. हैदराबादस्थित भारत बायोटेकने सप्टेंबर महिन्यात दोन ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिन लसीची दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली होती. त्यानंतर हा चाचणीचा डेटा ड्रग अँड कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीसीजीआय) ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला पाठवून दिला होता. त्यास मान्यता मिळाली आहे. देशभरातील जवळपास १ हजार पेक्षा जास्त मुलांवर या लसीची चाचणी घेण्यात आली आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात १२ वर्षावरील मुलांसाठी झायडस कॅडिलाच्या तीन डोस डीएनएला परवानगी मिळाली होती. भारतात मुलांच्या लसीकरणासाठी सीरम इन्स्टिट्युटच्या नोव्हावॅक्स या तिसर्‍या लसीलाही मान्यता मिळण्याची शक्यता आहे. याबाबत बोलतांना दिल्ली एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुरेरिया यांनी २ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात यावे यावर भर दिला आहे. कारण याच मार्गाने आपण कोरोना महामारीपासून आपली सुटका करुन घेऊ शकतो असे ते म्हणाले. यामहिन्याच्या सुरुवातीला भारतीय लसीकरण टास्क फोर्सच्या डॉ. एनके अरोरा यांनी सांगितले होते की, मुलांचे कोरोना लसीकरण सुरु करताना पहिल्यांदा जी मुले व्याधीग्रस्त आहेत त्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर सदृढ मुलांचे लसीकरण सुरु करण्यात येईल. 

कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु

भारतात तयार करण्यात आलेल्या लसीचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. यासाठी दोन डोसमध्ये २० दिवसांचे अंतर ठेवावे लागणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्युबा या देशाने दोन वर्षांच्या मुलांना करोना लस देण्यास सुरुवात केली आहे. क्युबामध्ये दोन लस दिल्या जात आहेत. या लशी क्युबातच तयार करण्यात आल्या आहेत. क्युबामध्ये अब्दला आणि सोबरान या लशीचे डोस दिले जात आहेत. या लशीची चाचणी पूर्ण झाली आहे. क्युबामध्ये लहान मुलांना करोना लस देण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला १२ वर्षावरील मुलांना करोना लस देण्यात आली. त्यानंतर सोमवारी दोन ते ११ या वयोगटातील मुलांना करोना लस देण्यास सुरुवात झाली. सध्या क्युबाच्या सिएनफ्यूगोस शहरात ही लस देण्यात येत आहे. सध्या काही देशांमध्ये १२ वर्षावरील वयोगटासाठी लस देण्यात येत आहे. तर काही देशांमध्ये चाचणी सुरू आहे. चीन, संयुक्त अरब अमिरात, व्हेनेझुएला आदी देशांनीदेखील लहान मुलांना करोना लस देण्याची घोषणा केली आहे. मात्र, क्युबाने त्याआधीच लहान मुलांना लस देण्यास सुरुवात केली आहे. क्युबाने विकसित केलेल्या लशीला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिली नाही. क्युबाने एकूण पाच लशी विकसित केल्या आहेत. क्युबातील आरोग्य व्यवस्था ही जगात सर्वोत्तम समजली जाते. यासह अमेरिका, सिंगापूर यांच्यासह जगभरातील २० देशांनी यापूर्वीच लहान मुलांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात केली आहे. जगभरात आलेल्या कोरोना संकटामुळे अनेक जण दहशतीच्या सावटाखाली जगत होते. यातच कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता. प्रत्येक देश त्यांच्याकडील लोकसंख्येला कोरोनापासून वाचवण्यासाठी लसीकरण करत होते. यापार्श्वभूमीवर भारतात कोव्हॅक्सिन लसीची ३ टप्प्यात चाचणी घेण्यात आली. सप्टेंबरपर्यंत ही चाचणी पूर्ण होऊन आशादायक चित्र पुढे आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारने २ वर्षावरील मुलांसाठी कोव्हॅक्सिन लस देण्यास मंजुरी दिली आहे. प्रौढांच्या लसींप्रमाणे लहान मुलांचे लसीकरण देखील वेगाने पुर्ण झाल्यास भारत कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु करु शकतो. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला दुसरा देश असतांना प्रभावीपणे लसीकरण मोहिम राबवत भारताने अनेक देशांसमोर आदर्श निर्माण केला आहे. आता त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे लहान मुलांचे लसीकरण राहील, यात तिळमात्रही शंका नाही.

Post a Comment

Designed By Blogger