अफगणिस्तानमध्ये आलेली तालिबानी राजवट आणि तेथे चीन व पाकिस्तानचा वाढता हस्तक्षेप ही भारतासाठी मोठी डोकंदूखी आहे. अफगणिस्तान आता जगभरातील दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनू शकते, अशी भीती अमेरिकेसह अनेक देशांना सतावत आहे. दुसरीकडे चीन आपली विस्तारवादी भुमिका सोडण्यास तयार नाही, किंबहुना चीनीची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे भारताचे शेजारी राष्ट्रांच्या वाढत्या कुरापती तर दुसरीकडे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मंदावलेले देशाचे आर्थिकचक्र. अशा दोन वेगवेगळ्या आव्हानांचा मुकाबला कसा करायचा? याबाबतची भविष्यातील वाटचालीची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन दिवसीय अमेरिका दौर्यात झाली आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कोरोनाकाळत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच विदेश दौरा केला. या दौर्यात पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७६ व्या सत्राला संबोधित केले. अमरिकेचे राष्ट्रपती जो बायडन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासोबत चर्चा केली. त्यासोबत जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन यांच्यासोबत पंतप्रधानांच्या बैठका झाल्या. चार देशांच्या एकत्र होणार्या बैठकीत देखील सहभागी झाले. या व्यतिरिक्त अमेरिकेतील विविध कंपन्यांच्या मुख्य सीईओंसोबत देखील त्यांनी चर्चा केली. यात पंतप्रधानांनी भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन सीईओंना केले.
चीन आणि पाकिस्तानला शह देणे भारताला शक्य
कोरोनाकाळात भारताने औषधी व लसींचा अन्य देशांना केलेला पुरवठा असो का देशातील कोरोनाची परिस्थितीची हाताळणी असो, सर्वच पातळ्यांवर भारत अमेरिका, ब्रिटनसह पुढारलेल्या युरोपीय देशांपेक्षा सरसच ठरला आहे. याचा डंका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिका दौर्यात वाजवून घेतला. तीन दिवसांच्या दौर्यात पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ७६ व्या अधिवेशनाला संबोधित केले आणि पहिल्या प्रत्यक्ष क्वाड परिषदेला उपस्थित राहिले. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यात दोन्ही देशांदरम्यानचे संबंध वृद्धिंगत करण्याबरोबरच कोरोना संकटाचा मुकाबला, व्यापार आणि उद्योग क्षेत्रातले सहकार्य वाढविणे, लोकशाही मूल्यांचा पुरस्कार आदी विषयांवर चर्चा झाली. संरक्षण क्षेत्रात भारताला आगामी काळात व्यापक प्रमाणावर सहकार्य करण्याचे आश्वासन बायडेन यांनी दिले. चीन आणि पाकिस्तानचे आव्हान लक्षात घेता भारताला आपले लष्कर आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज करणे गरजेचे आहे. त्याचमुळे लष्करी क्षेत्रातील अमेरिकेचे सहकार्य आगामी काळात आणि दृरदृष्टीच्या सामरिक राजकारणातून भारताकरिता महत्त्वपूर्ण ठरणार आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्रात मोदींनी पाकिस्तान आणि इम्रान खान यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. ते म्हणाले होते, जे देश दहशतवादाचा आधार घेत आहेत, त्यांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, यामुळे त्यांनाही धोका आहे. तसेच अफगाणिस्तानचा वापर आपल्या स्वार्थासाठी कुणी करु नये, असा इशाराही मोदींनी यावेळी दिला. पाकिस्तानचे कठपुतळी पंतप्रधान इम्रान खान यांनी नेहमीप्रमाणे संयुक्त राष्ट्रामध्ये काश्मीरचा राग आळवला. त्यांना अपेक्षाही नसेल तितक्या कठोर भाषेत संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे यांनी पाकिस्तानचे वाभाडे काढले. दहशतवादाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी यांनी याआधीही विविध जागतिक व्यासपीठांवर ठाम भूमिका घेतली होती. ताज्या दौर्यातही त्यांनी दहशतवादाचा कोणत्याही परिस्थितीत बिमोड केला जाईल, असा सरळ स्पष्ट संदेश दिला आहे. अमेरिकेसोबत वृद्धिंगत झालेल्या संबंधाचा फायदा घेऊन चीन आणि पाकिस्तानला शह देणे भारताला शक्य होणार आहे.
भारत-अमेरिका संबंध येत्या काही वर्षांमध्ये अधिक मजबूत होतील
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेतील पंतप्रधान मोदी यांचे भाषण असो, अथवा क्वाडच्या माध्यमातून त्यांनी चीन-पाकला दिलेला संदेश असो. विस्तारवाद आणि दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारत यापूर्वीच्या तुलनेत जास्त सज्ज असल्याचे त्यांनी ठामपणे अधोरेखित केले आहे. क्वाड संघटनेच्या माध्यमातून भारत, जपान, ऑस्ट्रेलिया या देशांना अमेरिका एकत्र आणू पाहत आहे. याचा मोठा फायदा भारताला होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या दौर्यात अमेरिकेतील अनेक दिग्गज उद्योगपतींच्या भेटी घेऊन त्यांना भारतात गुंतवणूक करण्याचे निमंत्रण दिले. क्वाडच्या बैठकीत फाइव्ह जी तंत्रज्ञान तसेच आधुनिक चिपसेट तयार करण्यासाठी आवश्यक सेमीकंडक्टरच्या निर्मितीसाठी भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांनी परस्पर सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. भारतातली पारदर्शी लोकशाही व्यवस्था आणि उद्योग सुलभतेचे वातावरण त्यांना खुणावत आहे. त्यामुळे आगामी काळात भारतात विक्रमी प्रमाणावर विदेशी गुंतवणूक झाल्यास त्याचे नवल वाटू नये. भारतात परतण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले, की त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय कार्यक्रमांमध्ये भाग घेतला जो खूप फलदायी होता. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, गेल्या काही दिवसांमध्ये विविध मुख्य कार्यकारी अधिकार्यांशी संवाद साधला आणि संयुक्त राष्ट्रांत संबोधन करण्याबरोबरच द्विपक्षीय आणि बहुपक्षीय कार्यक्रमांमध्ये भाग घेतला, जो खूप फलदायी होता. मला खात्री आहे की भारत-अमेरिका संबंध येत्या काही वर्षांमध्ये अधिक मजबूत होतील. आपल्या लोकांमधील समृद्ध संबंध हा आपला मजबूत वारसा आहे. मोदींचे हे आशादायी ट्विट खूप काही सांगून जाते. पंतप्रधान मोंदींच्या अमेरिका दौर्यामुळे पाकिस्तानी माध्यमांनी चालवलेली आदळआपट देखील खूप काही सांगून जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौर्यातून भारतात १५७ प्राचीन कलाकृती आणि वस्तू घेऊन आले आहेत. अमेरिकेने या सर्व कलाकृती मोदींना भेट म्हणून दिल्या आहेत. यातील काही कलाकृती तर ११ व्या शतकापासून १४ व्या शतकातल्या आहेत. पंतप्रधानांनी केवळ या प्राचीन वस्तूच परत आणल्या नसून भारताचा वारसा परत मिळविला आहे. ही देखील मोठी उपलब्धी आहे. मोदींच्या या अमेरिका दौर्यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असले तरी त्यांचा हा दौरा निश्चित फलयाचीच ठरला आहे. या दौर्यात त्यांनी चीन व पाकिस्तानला इशारा देत नव्या भारताची ओळख संपूर्ण जगाला करुन दिली आहे.
Post a Comment