नव्याने बिगिन अगेन

राज्यात येत्या ४ ऑक्टोबरपासून शाळा व सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा निर्णय झाल्यामुळे लोकांना काहीसा दिलासा मिळालेला असताना त्यापाठोपाठ २२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशासह महाराष्ट्रातही विक्रमी वेगाने लसीकरण होत असल्याने कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका टळण्याचे सकारात्मक चित्र दिसू लागले आहे. काही आठवड्यांपूर्वी राज्य शासनाने लॉकडाऊन शिथिल केले होते. मात्र शाळा, मंदीर व चित्रपटगृह बंदच होती. आता ते देखील सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला आहे. मात्र कोरोना विरुध्दची लढाई अजूनही संपलेली नाही, याचे सर्वांनी भान ठेवायला हवे.प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागणार

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून, पॉझिटिव्हिटी दर कमी होत असल्याने एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने कोरोनाबाबत जिल्हावार आढावा घेऊन बिगिन अगेनचा नारा दिला आहे. एप्रिल आणि मे महिन्यास संपूर्ण देशात धुमाकूळ घालणारी, कोट्यवधी जणांना बाधित करणारी आणि लाखो जणांचा बळी घेणारी कोरोना विषाणूची दुसरी लाट आता बर्‍यापैकी ओसरल्याचे चित्र आहे. दहीहंडी, ईद व गणेशोत्सवासारखे महत्वाचे सण पार पडल्यानंतरही सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस समोर आलेल्या कोरोनाच्या आकडेवारीमुळे संपूर्ण देशाला दिलासा मिळण्याची शक्यता दिसू लागली आहे. महाराष्ट्रातही अहमदनगर वगळता बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात दिसून येत आहे. मात्र, गणेशोत्सवानिमित्त अनेकजण आपापल्या गावी गेले आणि गणेशोत्सवानंतर घरी परतले आहेत. त्यामुळे तज्ज्ञांनी गणेशोत्सवानंतर दहा दिवस परिस्थितीवर देखरेख ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार राज्य सरकारचा सध्या तरी कोरोनासंदर्भातील निर्बंध शिथिल करण्याचा विचार नाही. याबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात दिली. यामुळे आगामी काही दिवस आव्हाने कायम राहणार आहेत. मात्र राज्य सरकारच्या निर्णयानंतर आता लवकरच शाळांची घंटा पुन्हा वाजणार आहे. पण विद्यार्थी दीड वर्षाहून अधिक काळ घरात आहेत. त्यांना काही दिवसांत शाळेत पाठवायचा निर्णय घेताना प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागणार आहे. शाळा सुरु होणे आणि मोठ्या कालावधीनंतर शाळेत जाणे हा मुलांसाठी आनंदाचा क्षण असला तरी मानसिक संतुलनाचा सर्वांत अवघड काम राहणार आहे. कोरोनाच्या या महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. शाळा बंद असल्याने मुले घरीच कोंडून राहत असून, टीव्ही आणि मोबाइल एवढेच त्यांचे भावविश्‍व बनून राहिल्याने पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमुळे विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून घरी बसावे लागले असल्यामुळे शाळा सुरु होणे ही विद्यार्थी आणि पालकांची मानसिक गरज झाली होती. आता राज्यात शाळा आणि महाविद्यालये सुरु होत असल्याने विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील दीड वर्षाहून अधिकच्या काळात मुलांच्या खाण्याच्या, बसण्याच्या, शिस्तीच्या सवयीत बदल झाल्याने ते हळूहळू पूर्ववत होईल याकडे पालकांना लक्ष द्यावे लागणार आहे. मुलांना कोव्हिड-१९ लस दिलेली नसूनही; तसेच शाळा बंद ठेवूनही मुलांमध्ये लागणीचे, प्रतिपिंडे तयार होण्याचे प्रमाण जवळ जवळ प्रौढ लोकांइतकेच आढळले आहे. ही जमेची बाजू असली तरी तिसर्‍या कोव्हिड लाटेची शक्यता असल्याने लहान, शालेय मुलांबाबत जास्त काळजी वाटणे साहजिक आहे; पण कोव्हिड-१९ ची दुसरी लाट अतिप्रचंड असूनही, लहान मुलांच्या काही जीवशास्त्रीय वैशिष्ट्यांमुळे बहुसंख्य मुलांत कोव्हिड-१९ आजार होण्याचे प्रमाण फार कमी होते. कोव्हिड-१९ आजार झालाच, तर गंभीर आजाराचे प्रमाण अत्यंत कमी आणि मृत्यूचे प्रमाण नगण्य राहिले आहे. एवढीच एक दिलासादायक बाब आहे. कितीही काळजी घेतली, तरी शाळेत मुलांना संसर्ग होण्याची शक्यता असली तरी त्याची तीव्रता फारशी नसेल, याबाबत तज्ञांना खात्री पटल्याने राज्यात शाळा सुरु करण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. तरीही विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर राहणे, शाळांचे सॅनिटायझेशन, घरापासून शाळेपर्यंत पोहोचण्याचे आणि परत घरी येण्यासाठी वाहनाचे नियोजन, स्वच्छतागृहांचे नियोजन यासारख्या सर्व बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे. 

सर्वकाही राज्य व केंद्र सरकारवर ढकलून चालणार नाही

शाळांसह सर्वधर्मिय प्रार्थनास्थळांचा महत्वाचा मुद्दा आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यावर गेल्या एप्रिलमध्ये सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आली होती. रुग्ण कमी झाल्याने प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, घटस्थापनेपासून म्हणजेच ७ ऑक्टोबरला राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे खुली करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. दुसर्‍या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसर्‍या लाटेशी लढण्याचे नियोजन आपण केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बर्‍याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यामुळे मंदीरे खुली होणार असली तरी मंदीरांमध्ये गर्दी होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यासारखे आशादायक चित्र जरी दिसत असले, तरी अजूनही धोका टळलेला नाही. पहिली लाट ओसरत असतांना लोकांनी मुक्त वातावरणात आपली कामे करण्यास सुरुवात केली. लोक काहींसे निर्धास्त झाल्यासारखे वागत होते. त्यांना मास्क वापरणे नकोसे वाटू लागले होते. पहिली लाट ओसरत असतांना जी चूक झाली तीच चूक आता पुन्हा व्हायला नको. मी लस घेतली आहे, आता मला कोरोनाची काय भीती? अशा आविर्भावात वावरणे निश्चितपणे धोकादायक आहे. आताही कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली असली तरी कोरोनाचा धोका संपलेला नाही. उलट आपण जेवढे बेफिकिरपणे वागू तेवढा कोरोना आपल्या जास्त जवळ येणार आहे. देशात विक्रमी वेगाने लसीकरण होतेय, ही जमेची बाजू आहे. यामुळे कोरोनाविरुध्दच्या लढाईत मोठे यश मिळतांना दिसत असले तरी कोरोनाचा लढा अजून संपलेला नाही. ही लढाई दीर्घकालीन निश्चितच आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. महाराष्ट्रात खरोखरच कोरानाचा आलेख खाली येत आहेत हे निश्चितच चांगले संकेत असून रुग्णसंख्या घटविण्यासाठी या स्थितीत जिल्हा आणि राज्य पातळीवर सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. तरच कोरोनाला अटकाव करता येईल, आताही आपण गाफिल राहिलो तर तिसरी लाट आल्याशिवाय राहणार नाही. कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येकाने आपआपली जबाबदारी ओळखली पाहिजे. सर्वकाही राज्य व केंद्र सरकारवर ढकलून चालणार नाही. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे.


Post a Comment

Designed By Blogger