ऑलिम्पिकसाठी ‘मिशन पॅरिस’

टोकियो ऑलिम्पिकची रविवारी सांगता झाली. भारताला एका सुवर्णासह ७ पदके मिळाली, जी १२१ वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी आहे. लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने ६ पदके मिळवली होती. यामुळेे यंदाचे ऑलिम्पिक भारतासाठी खासच ठरले आहे. नीरज चोप्राने (सुवर्ण), मीराबाई चानू (रौप्य), रविकुमार दहिया (रौप्य), पीव्ही सिंधू (कांस्य), लव्हलिना बोर्गोहेन (कांस्य) भारतीय पुरुष हॉकी संघ (कांस्य),बजरंग पुनिया (कास्य) पदकांवर शिक्कामोर्तब केले. भारताला अजून तिन पदके मिळविण्याची संधी प्राप्त झाली होती मात्र ती थोडक्यात हूकली. महिला संघाने चांगला खेळ केला मात्र त्यांचे कास्य पदक थोडक्यात हुकले. दीपक पुनिया याने कुस्तीत ८६ किलो गटात उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर कांस्य पदकाच्या लढतीत तो चांगल्या स्थितीत होता मात्र अखेरच्या दहा सेकंदात बाजी पलटली व त्याचेही कास्य पदक हुकले. संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी वंडर गर्ल अदिती अशोकने महिला गोल्फमध्ये पदकाच्या आशा जागवल्या होत्या मात्र ती चौथ्या स्थानावर राहिली. टोकियो ऑलिम्पिकमधील कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचे कौतूक करावे तितके कमीच आहे. मात्र येथेच न थांबता आतापासूनच मिशल पॅरिसची तयारी सुरु केली पाहिजे.टोकियोमध्ये भारताच्या राष्ट्रगीताची धून

दर चार वर्षांनी आयोजित केली जाणारी ऑलिम्पिक स्पर्धा ही केवळ एक क्रीडास्पर्धा नसते तर एक वैश्विक उत्सव असतो. यंदा टोकियोे ऑलिम्पिकच्या १८ स्पर्धांमध्ये १२६ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता. यात सात पदके भारताने जिंकली आहे. भालाफेक थलिटमध्ये नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकले. टोकियोमध्ये भारताच्या राष्ट्रगीताची धून वाजली ही प्रचंड अभिमानस्पद बाब आहे. नीरज हा ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारा तो फक्त दुसरा भारतीय आहे. याआधी ही कामगिरी केवळ अभिनव बिंद्राने केली आहे. टोकियोत पहिल्याच दिवशी मीराबाई चानूने भारतासाठी रौप्य पदक जिंकले. तीने १०२ किलो वजन उचलत रियोतील अपयश झटकून टाकले. हरयाणाच्या सोनिपतच्या नाहरी गावचा रवी दहिया याने पुरूषांच्या ५७ किलो गटात फ्री स्टाईल कुस्तीत रौप्य पदक जिंकले. टोकियो २०२० च्या पी.व्ही. सिंधूूला सुवर्ण पदकासाठी दावेदार मानले जात होते. कांस्य पदक जिंकले. २६ वर्षांच्या या खेळाडूने २०१६ मध्ये रौप्य पदक मिळवले होते. ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणारी ती भारताची दुसरी खेळाडू आणि पहिली महिला आहे. भारतीय पुरूष हॉकी संघाने कांस्य पदक जिंकून ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ दूर केला. देशात हॉकीला लोकप्रिय बनवण्यासाठी हे पदक मोलाचे ठरत आहे. साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाकडून भारताने १-७ असे पराभव स्विकारला होता. मात्र कर्णधार मनप्रीतच्या नेतृत्वातील या संघाने शानदार खेळ केला. उपांत्य फेरीतील पराभवानंतर कांस्य पदक प्ले ऑफमध्ये जर्मनीला ५-४ अशी मात दिली. असामच्या लव्हलिना बोर्गोहेन हीने ऑलिम्पिक कांस्य पदक जिंकून इतिहास निर्माण केला आहे. विजेंदर आणि मेरी कोम यांच्यानंतर पदक जिंकणारी ती तिसरी भारतीय महिला आहे. बजरंग पुनिया याला सुवर्ण पदकाचा दावेदार मानले जात होते. मात्र उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर त्याने कांस्य पदक मिळवले. यंदाची सर्वात विशेष बाब म्हणजे, भारतीय महिला हॉकी संघाने मारलेली जोरदार मुसंडी आणि पुरुष हॉकी संघाने केलेली कामगिरी म्हणता येईल. भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. भारतीय संघाने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदक मिळवले आहे. तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय संघाला हॉकीमध्ये पदक मिळाले आहे. अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला. सुरुवातीला पराभवाच्या छायेत असणार्या भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केले. भारताचा हा विजय हॉकीच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल असाच आहे. उपांत्य फेरीमधील निराशाजनक पराभव मागे टाकून ४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा पराक्रम भारतीय पुरुष संघाने केला आहे. भारताने कांस्यपदकाच्या लढतीमध्ये बलाढ्य जर्मनीला पराभूत केले. आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणार्या भारताने १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. परंतु बेल्जियमविरुद्धच्या चुका टाळून रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या जर्मनीला टक्कर देत भारताने पदकाचे स्वप्न ४१ वर्षांनंतर साकारले. तसेच महिला हॉकी संघाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. महिला हॉकी संघ रियोत अखेरच्यास्थानावर असलेल्या या संघाने टोकियोत चौथे स्थान मिळवले. महिला संघाला कांस्य पदकाच्या लढतीत ग्रेट ब्रिटनकडून ३-४ असा पराभव पत्करावा लागला. 

१३१ कोटींची लोकसंख्या असलेल्या देशाला केवळ ७ पदके का?

भारताला एका सुवर्णासह ७ पदके मिळाली, जी १२१ वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी आहे. परंतु अनेक प्रश्नही आहेत. १३१ कोटींची लोकसंख्या असलेल्या देशाला केवळ ७ पदके का? आपल्या १२१ वर्षांच्या ऑलिम्पिक इतिहासात केवळ २८ पदके जिंकली, त्यापैकी ९ सुवर्णपदके आहेत. यापैकी आठ पदके एकट्या हॉकीमध्ये जिंकली गेली आहेत. एकट्या अमेरिकन जलतरणपटू मायकेल फेल्प्सने आपल्या कारकिर्दीत  २८ ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत. जी टोकियोपूर्वी भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात जिंकलेल्या एकूण पदकांइतकी आहेत. यावरुन ऑलिम्पिकमधील कामगिरीचे मुल्यांकन करता येते. भारतात क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांमध्ये कोणालाही विशेष रस नाही हे वास्तव आहे. पाश्चिमात्य देशांनी नेहमीच ऑलिम्पिक आणि इतर आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांवर वर्चस्व राखले आहे. यामुळे अन्य देश ऑलिम्पिकमध्ये पदांची लयलूट करतात. ऑलिंम्पिकसारख्या महत्वाच्या स्पर्धांमध्ये भारताच्या अपयशासाठी पूर्णपणे खेळाडूंनाच दोषी ठरवता येणार नाही. यास भारतीय क्रीडा क्षेत्रातील गंभीर त्रुटी कारणीभूत आहेत. प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास, आपल्या देशात सर्वाधिक महत्व क्रिकेटलाच दिले जाते त्या तुलने अन्य खेळांना दुय्यम दर्जा मिळतो. परिणामी अन्य खेळांमध्ये पायाभूत सुविधांसाठी झगडण्यापासून सुरुवात होते. शालेय पातळीवर क्रीडा क्षेत्राला अजूनही पाहिजे तसे प्रोत्साहन मिळत नाही. क्रीडा संघटनांमधील राजकारण व त्यावर पकड मिळविण्यासाठी होणारा राजकीय हस्तक्षेप हा खेळाचा दर्जा संपवितो, असा आजवरचा अनुभव आहे. अनेक खेळांना प्रायोजकत्व मिळत नाही व सरकारदेखील त्याला अपेक्षित मदत करत नाही, अशा अनेक अडथळ्यांची शर्यत खेळाडूंना पार करावी लागते. क्रिकेट वगळता अन्य खेळाडूंकडे दुर्लक्ष केले जात असले तरी ऑलिंम्पिकसारखी मोठी स्पर्धा आली की खेळाडूंकडून पदाकांची अपेक्षा ठेवली जाते. अपेक्षांच्या या ओझ्याखाली अनेक खेळाडूंना त्यांचा नैर्सर्गिक खेळ करता येत नाही. अशा पार्श्वभूमीवर पदके जिंकणार्‍या सर्व खेळाडूंचे मन:पूर्वक अभिनंदन.

Post a Comment

Designed By Blogger