ऑलिम्पिक : खेळ जिंकावा, कोरोना हरावा

जगभरातील खेळाडूंचा कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणार्‍या ऑलिम्पिकचे शुक्रवारी कोरोना सावटातच उद्घाटन होत आहे. उद्घाटन सोहळ्याला जवळपास १५ देशांचे नेते उपस्थित राहणार असून प्रत्यक्ष उपस्थितांची संख्या केवळ एक हजार इतकी असेल. गत वर्षभरापासून कोरोनाचे ग्रहण लागलेल्या टोकियो ऑलिम्पिकला उद्घाटनानंतरही अडथळ्यांची मोठी शर्यत पार पाडावी लागणार आहे. उद्घाटनाआधीच क्रिडाग्राममध्ये कोरोनाबाधित खेळाडू आढळून आले आहे. यामुळे उद्घाटन सोहळ्याला प्रत्येक देशाच्या सहा पदाधिकार्‍यानाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र खेळाडूंच्या संख्येबाबत कोणतीही अट ठेवण्यात आली नाही. असे असले तरी सर्वच खेळाडू यात सहभागी होतील कि नाही? याबाबत सांशकता आहे. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी जपान सर्व शक्तीनिशी प्रयत्न करत आहे. संपूर्ण जगाला हेवा वाटेल अशा सुरक्षितपणे टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन केले जाईल, अशी ग्वाही जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी दिली आहे.



स्पर्धा पुढे ढकलल्याने यापूर्वीच जवळपास ४२ हजार कोटी रुपयांचे नुकसान 

दर चार वर्षांनी आयोजित केली जाणारी ऑलिम्पिक स्पर्धा ही केवळ एक क्रीडास्पर्धा नसते तर एक वैश्विक उत्सव असतो. २०२० मध्ये जापानच्या टोकियोत २४ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत स्पर्धा रंगणार होत्या. याकाळात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्या. अर्थात यास ऑलिम्पिक अपवाद नव्हते फरक एवढाच होता की ऑलिम्पिक रद्द न करता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आता ही स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ या कालावधीत होत आहे. शुक्रवारी उद्घाटन सोहळा होत असला तरी कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यास स्पर्धा कधीही रद्द किंवा स्थगित करावी तर लागणार नाही ना? अशी भीती जपानला सतावत आहे. गेल्या काही दिवसांपासून जपानच्या अधिकार्‍यांसाठी ही परिस्थिती अधिक अवघड बनली आहे, कारण ऑलिम्पिकचे आयोजन होणार हे गृहित धरुन त्याच्या नियोजनासाठी मोठा खर्च करण्यात आला आहे. टोकियो ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धा रद्द केल्यास जपानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसेल. यामुळे जापानचे सुमारे ३.१५ लाख कोटी रुपयांचे नुकसान होईल. यात सरकार, आयोजन समिती, हॉस्पिटॅलिटी क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, हॉटेल, स्थानिक बाजार आदींच्या नुकसानीचा समावेश आहे. मात्र, स्पर्धा पुढे ढकलल्याने यापूर्वीच जवळपास ४२ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कारण, स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या क्रीडा साहित्य व सुविधांच्या देखभालीचा खर्च वाढला आहे. हे नुकसान कमी करण्यासाठी आयोजक नवे पर्याय शोधत आहे. मात्र कोरोनामुळे निर्माण होणार्‍या संकटांची मालिका संपायचे नाव घेत नाहीत. उद्घाटन सोहळ्याच्या काही तास आधीच चिलीची तायक्वांडोपटू फर्नांडा एग्वायर आणि नेदरलॅन्डची स्केटबोर्ड खेळाडू केंडी जेकब्स या बुधवारी पॉझिटिव्ह आढळताच ऑलिम्पिक बाहेर पडल्या. फर्नांडा ही विमानतळावरील चाचणीत तर केंडी क्रीडाग्राममधील चाचणीत बाधित आढळली. यामुळे कोरोनाबाधित खेळाडूंची संख्या सहा झाली आहे. स्पर्धे दरम्यान कोरोनाची लागण झालेल्यांची कशी काळजी घेतली जाते, हे सर्वात महत्त्वाचे आहे. 

 भारताला अधिकाधिक पदके मिळोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना

करोनाची प्रकरणे समोर आणणे, त्यांचे विलगीकरण आणि त्यांची लवकरात लवकर काळजी घेणे, जेणेकरून करोनाचा प्रादुर्भाव खंडित केला जाईल, यावर ऑलिम्पिकचे यश अवलंबून आहे. आयुष्यात कुठे ना, कुठे तरी धोका पत्करावा लागतोच. आताही तेच सुरु आहे. सर्वच खेळाडू जीवाचा धोका पत्करुन मैदानात उतरले आहे. पुढचे काही दिवस खेळाडू व आयोजक जपान या दोघांनाही प्रचंड आव्हानात्मक राहणार आहे. यात खेळ जिंकावा आणि कोरोना हरावा, अशी देवाला प्रार्थना आहे. उद्घाटन सोहळ्याआधी झालेल्या स्पर्धांमध्ये पहिला विजय यजमान संघाने मिळविला. जपानने महिला सॉफ्टबॉलच्या एकतर्फी लढतीत ऑस्ट्रेलियाचा ८-१ ने पराभव केला. खेळाडू, अधिकारी आणि माध्यम प्रतिनिधींच्या उपस्थितीत सामना झाला. जपानची ही विजयी सलामी कोरोनाला हरविण्यासाठी शुभसंकेतच म्हणायला हवी! यंदा भारतासाठीदेखील ही ऑलिम्पिक स्पर्धा खूप महत्वाची आहे. यंदा ऑलिम्पिकसाठी भारताचे १२७ खेळाडू पात्र ठरले आहेत. लंडनमध्ये भारताने सर्वाधिक सहा पदके मिळवली होती. या वेळी भारताची पदकतालिकेतील कामगिरी नक्कीच सुधारलेली असेल, अशी अपेक्षा आहे. नेमबाजी, कुस्ती, बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूला पदकाची संधी आहे. त्याचबरोबर भारतीय बॅडमिंटनपटूंनाही आपली कामगिरी सुधारण्याची खूप चांगली संधी आहे. रिओ आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने जे यश साध्य केले, त्यापेक्षा चांगले यश मिळवण्याची संधी आहे. सिंधू ही सुवर्णपदकाची दावेदार समजली जात आहे. चिराग शेट्टी आणि सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी यांच्यासमोरही खडतर प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान नसेल. त्यांच्यातही पदक जिंकण्याची क्षमता आहे. बी. साईप्रणीतने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. त्याच्याकडून अशाच कामगिरीची पुनरावृत्ती अपेक्षित आहे. याव्यतिरिक्तही अनपेक्षित पदके भारताच्या झोळीत पडू शकतात, असा विश्वास काही माजी खेळाडूंनी व्यक्त केला आहे. कोरोनाच्या दहशतीखाली सुरू होत असलेल्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून देशवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भारतीय खेळाडू यंदा पदक जिंकण्याच्या इराद्यानेच लढत द्यायची, या निर्धारासह प्रत्येक जण घाम गाळत आहे. यामुळे यंदा नक्कीच मोठे यश मिळणारच, असा ठाम विश्वास आहे. हा विश्वास खरा ठरो आणि भारताला अधिकाधिक पदके मिळोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.


Post a Comment

Designed By Blogger