मोदी-ममतांमध्ये आंब्याचा गोडावा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मतभेद सर्वश्रुत आहेत. नुकत्याच आटोपलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राजकीय हिंसाचार उफाळून आला होता. यात अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. यावरून भाजप अजूनही आक्रमक आहे. तर कोलकाता हायकोर्टाच्या आदेशावरून निवडणुकीनतंरच्या हिंसाचार प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून चौकशी सुरू आहे. आयोगाने आपला अहवाल सोपवला आहे. दुसरीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनताही बंगालमधील हिंसाचारावर तृणमूल काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाऊ शकतो. या हिंसाचारासह नारदा घोटाळ्यातील उघड होत असलेली प्रकरणे, मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांचे अचानक करण्यात आलेले स्थानांतरण आणि राज्यपाल जगदीप घनखड अशा एक ना अनेक विषयांवरून केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारमध्ये सातत्याने तणाव आहे. पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या ‘यास’ वादळ आढावा बैठकीलाही ममता बॅनर्जी यांनी दांडी मारली होती. यामुळे पश्चिम बंगाल सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष उफाळून आला होता. दोन्ही नेत्यांमध्ये असे टोकाचे वाद असले तरी ममतादीदींनी पंतप्रधान मोदींना पश्चिम बंगालमधील सर्वाधिक गोड असलेल्या आंबे पाठवले आहेत. राजकारणातील कटूता दूर करण्यासाठी नेत्यांकडून अशा प्रकारे आंबे पाठवण्याची परंपरा असल्याने दोघांमधील राजकीय कटूता कमी होण्याची अपेक्षा आहे.ममता बॅनर्जी विरुध्द पंतप्रधान नरेंद्र मोदी संघर्ष 

लोकसभेच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपाने पश्चिम बंगालमधील ४२ जागांपैकी १८ जागा जिंकल्या आणि तेव्हापासून ममता बॅनर्जी विरुध्द पंतप्रधान नरेंद्र मोदी असा संघर्ष सुरु झाला. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत या संघर्षाचा रक्तरंजित इतीहास लिहण्यात आला. बंगालची विधानसभा निवडणूक भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते मैदानात उतरले होते. पंतप्रधान मोदींनी कोरोना काळातही अनेक सभा घेत भाजपच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तसेच आम्ही २०० हून अधिक जागांवर विजय मिळवू, असा दावा अमित शहा यांच्याकडून केला जात होता. मात्र बंगालच्या मतदारांवर अजूनही ममतादीदींचीच जादू कायम असल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. भाजपाच्या पुर्ण फौजेला एकट्या ममतादीदी उरुन पुरुन निघाल्या. बंगालमधील ममतादीदींची १० वर्षांची सत्ता उखडून टाकण्याचे मनसुबे बंगालच्याच उपसागरात बुडाल्यानंतर केंद्र सरकारने विधानसभा निवडणुकींच्या निकालानंतर लगोलग पाच-सात वर्षांपूर्वीचे ‘नारदा टेप्स’ प्रकरण उकरून काढले. या प्रकरणात सीबीआयने ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळातील दोन नेत्यांना अटक केली तसेच इतर दोन नेत्यांनाही बेड्या ठोकल्या. यानंतरही ममता बॅनर्जी विरुध्द भाजपामध्ये आरोप प्रत्यारोपाचा डाव रंगला होता. निवडणुकीनंतर बंगालचे मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांच्या मुद्द्यावरूनही केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने आले होते. 

आंबे पाठवण्याची परंपरा कायम राखली

मोदी व भाजपाला सत्तेवरुन खेचण्यासाठी देशात तिसर्‍या आघाडीवर चर्चा सुरु झाली आहे. मोदींविरुध्द तगडा पर्याय म्हणून ममता बॅनर्जी यांच्याकडे पाहिले जात आहे. जर तिसर्‍या आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला तर ममतादीदी पंतप्रधानपदाच्या उमेदवार राहू शकतात. मात्र ही सर्व कटूता बाजूला ठेवून ममता बॅनर्जी यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या संबंधांमध्ये गोडवा आणण्याचा प्रयत्न केला आहे. ममता बॅनर्जी यांनी गेल्या आठवड्यात हिमसागर, मालदा आणि लक्ष्मणभोग या जातीचे आंबे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून पाठवले आहेत. मोदींबरोबरच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही भेट म्हणून आंबे पाठवले आहेत. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही आंब्याच्या पेट्या भेट म्हणून पाठवल्या आहेत. केंद्र सरकारसोबत तणाव असला तरी ममता बॅनर्जी यांनी आंबे पाठवण्याची परंपरा कायम राखली आहे. ममता बॅनर्जी २०११ पासून भेट म्हणून आंबे पाठवत आहेत. राजकारणात राजकीय कटूता कमी करण्यासाठी मिठाई व आंबे पाठविण्याची प्रथादेखील आहे. यंदा दोन्ही नेत्यांमध्ये टोकाचे मतभेत झाल्यानंतर देखील ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या नेत्यांना आंबे पाठवल्याने भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील कटूता किती कमी होईल, हे पुढील काळात दिसेलच. परंतू त्यांच्या या कृतीचे कौतूकच करायला हवे. 

आंबे डिप्लोमसी कितपत फायदेशीर ठरते?

जसे मतभेद पश्चिम बंगाल आणि भाजपात आहेत तसेच मतभेद महाराष्ट्र सरकार आणि भाजपातही आहे. महाविकास आघाडी सरकारचे नेते पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दोघांमधील वाद इतके टोकाला पोहचले आहेत की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्याचे विरोधीपक्ष नेते तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना अनेक कार्यक्रमांचे निमंत्रण देखील दिलेले नाही. यापार्श्वभूमीवर ममतादीदींची आंबे पाठविण्याची कृती इतर राजकारण्यांना मार्गदर्शक ठरणारी आहे. राजकारणापलीकडेही काही संंबंध असतात, ते जपावेच लागतात. ममतादीदींनी तेच केले आहे. पश्चिम बंगाल हे एक मोठे राज्य आहे. यामुळे देशाच्या राजकारणात राज्य विरुध्द केंद्र असा दीर्घकाळ चालणारा संघर्ष परवडणारा नाही. आता पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका पार पडल्याने भाजपाला पाच वर्ष वाट पहावीच लागेल. दुसरीकडे लोकसभा निवडणुकांसाठी अजून किमान अडीच ते तिन वर्षांचा काळ शिल्लक आहे. याकाळात राजकारण बाजूला ठेवून राज्य व केंद्र सरकारला काम करावे लागेल. आधीच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्य आणि केंद्रापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. अर्थकारण पार कोलमडून पडले आहे. या संकटांमधून बाहेर पडायचे असेल तर सर्वांनी एकत्रीत येण्याची आवश्यकता आहे. यासाठी सर्वप्रथम मनातील कटूता दूर होण्याची गरज आहे. ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपाच्या अनेक बड्या नेत्यांना गोड आंबे पाठवून त्याची सुरुवात केली आहे, असे म्हटले तरी ते पूर्णपणे चुकीचे ठरणार नाही. ममतादीदींची ही आंबे डिप्लोमसी कितपत फायदेशीर ठरते? याचे उत्तर येणार्‍या काळात मिळेलच!

Post a Comment

Designed By Blogger