एप्रिल आणि मे महिन्यास संपूर्ण देशात धुमाकूळ घालणारी, कोट्यवधी जणांना बाधित करणारी आणि लाखो जणांचा बळी घेणारी कोरोना विषाणूची दुसरी लाट आता बर्यापैकी ओसरत असल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. ब्रेक दि चेनमध्ये निर्बंधांबाबत निकष आणि पातळ्या निश्चित करण्यात आल्या असून या अंतर्गत सोमवारपासून जळगाव जिल्ह्यात अनेक निर्बंध शिथिल झाले आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतर पहिल्याच दिवशी जळगाव मधील सर्वच रस्त्यांवर गर्दी उसळल्याचे चित्र दिवसभर होते. ही गर्दी पाहता येत्या ८-१५ दिवसात पुन्हा लॉकडाऊनची वेळ येते की काय? अशी शंका वाटू लागली आहे. लॉकडाऊन शिथिल झाला आहे याचा अर्थ कोरोना संपला आहे, असा नसून जळगाव जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये बेड व ऑक्सिजन उपलब्ध आहे. असा होतो, याची जाणीव जळगावकरांनी ठेवण्याची आवश्यकता आहे.
बेफिकिरपणे वागू तेवढा कोरोना आपल्या जास्त जवळ येणार
कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याने राज्य शासनाने कोरोना संसर्ग दर पाच टक्केच्या आत असलेल्या भागातील निर्बंध शिथिल केले आहेत. कोरोना संसर्गाचा दर आणि त्या भागातील ऑक्सिजन बेडवर उपचार घेणार्या गंभीर रुग्णांची संख्या याचा ताळमेळ घालून पाच टप्प्यांत शहराची वर्गवारी निश्चित केली आहे. यानुसार जळगाव जिल्ह्यात सर्व दुकाने, रेस्टॉरंट, मॉल्स, बार यांना पूर्णवेळ सुरू झाले आहेत. मात्र कोरोना संसर्गापासून बचावासाठी लग्न समारंभ, अत्यंयात्रांना केवळ ५० जणांना उपस्थित राहण्यास परवानगी दिली आहे. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक, राजकीय, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना शंभर लोकांच्या उपस्थितीत घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यासह राज्य व देशातील रुग्णसंख्या कमी होत आहे. हे चित्र निश्चितच दिलासादायक आहे. देशात सध्या दैनंदिन सक्रिय रुग्णसंख्या एक लाखांपर्यंत खाली आली आहे. काही दिवसांपूर्वी दररोज चार लाखांवर नवे रुग्ण सापडत होते. राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यासारखे आशादायक चित्र जरी दिसत असले, तरी अजूनही धोका टळलेला नाही. पहिली लाट ओसरत असतांना लोकांनी मुक्त वातावरणात आपली कामे करण्यास सुरुवात केली. लोक काहींसे निर्धास्त झाल्यासारखे वागत होते. त्यांना मास्क वापरणे नकोसे वाटू लागले होते. आताही कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली असली तरी कोरोनाचा धोका संपलेला नाही. उलट आपण जेवढे बेफिकिरपणे वागू तेवढा कोरोना आपल्या जास्त जवळ येणार आहे.
....तर तिसर्या लाटेत मोठे आव्हान
देशात लसीकरण सुरु झाले असले तरीही आपण शंभर टक्के सुरक्षित झालो असे नाही. कारण संपूर्ण देशात १०० टक्के लसीकरण होत नाही तोपर्यंत कोरोना आटोक्यात येणार नाही. त्यामुळे कोरोनाची ही लढाई अजून किमान वर्ष-दोन वर्षे तरी लढावी लागणार आहे. त्यासाठी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे व सतत हात धुणे हे खबरदारीचे उपाय आपल्याला सुरुच ठेवावे लागणार आहेत. कोरोनाचा लढा अजून संपलेला नाही. ही लढाई दीर्घकालीन निश्चितच आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. आजही बाजारात विनाकारण होणारी गर्दी, रस्त्यांवर फिरणारे रिकामटेकडे यांना वेळीच रोखले नाही तर परिस्थिती अजून खराब होवू शकते. लॉकडाऊन व कडक निर्बंधांमुळे अर्थकारणाला खीळ बसली आहे, हे जरी खरे असले तरी ‘जान है तो जहान है’ हे लक्षात ठेवावे. सध्या लॉकडाऊन शिथिल झाले असले तरी मार्केटमध्ये उसळणारी गर्दी धोक्याची घंटा असेल. हे चित्र असेच असले तर तिसर्या लाटेला आमंत्रण दिल्या सारखे होईल, याचे भान प्रत्येकाने ठेवण्याची आवश्यकता आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेत लहान मुलांनाही धोका असल्याचे सांगण्यात येत असल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. डबल म्युटेशनमुळे राज्यात संसर्गाचा प्रसार तीव्रतेने झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. यामुळे आगामी काळात गाफिल राहून चालणार नाही. पहिल्या लाटेदरम्यान दुसर्या लाटेचा इशारा देण्यात आला होता मात्र केंद्र सरकार, राज्य सरकारसह सर्वच जण गाफिल राहिल्याने आता दुसर्या लाटेत त्याची मोठी किंमत चुकवावी लागत आहे. गेल्या वर्षी संसर्ग हा विविध सण उत्सवानंतर वाढला होता, यावेळेस ही दुसरी लाट सणवारांच्या अगोदर आली आहे. दुसरे म्हणजे म्युटेशन झालेल्या या विषाणूमुळे संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असून यापासून अधिक सावध राहण्याची गरज आहे नाहीतर तिसर्या लाटेत मोठे आव्हान उभे राहू शकते.
पुन्हा लॉकडाऊन झाल्यास सर्वाधिक नुकसान
जळगाव बाबतीत बोलायचे म्हटल्यास, भविष्यात जळगाव जिल्हयाचा पॉझिटीव्हीटी रेट ५ टक्के किंवा अधिक झाल्यास किंवा ऑक्सीजन बेड २५ टक्के पेक्षा अधिक भरले गेल्यास अनलॉकच्या आदेशात सुधारणा करून नवीन आदेश काढण्यात येतील. यामुळे कोरेाना संसर्गाचे रुग्ण वाढू नये याासाठी सर्वांनीच फिजीकल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क लावणे, गर्दी जाणे टाळणे आदी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात खरोखरच कोरानाचा आलेख खाली येत असेल तर हे निश्चितच चांगले संकेत असून रुग्णसंख्या घटविण्यासाठी या स्थितीत जिल्हा आणि राज्य पातळीवर सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. तरच कोरोनाला अटकाव करता येईल, आताही आपण गाफिल राहिलो तर तिसरी लाट आल्याशिवाय राहणार नाही. दुसरीकडे कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढणे गरजेचे आहे. आधी लोक लसीकरणासाठी पुढे येत नव्हते आता प्रत्येकाला लसींचे महत्व पटले असल्याने लसीकरणासाठी गर्दी होवू लागली आहे मात्र सध्या लसीच उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कोरोना विरुध्द सुरु असलेले युध्द अजूनही संपलेले नाही, याचे भान प्रत्येकाने ठेवून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळणे, मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला काही होणार नाही, माझी रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे, अशा भ्रमात न राहणे, हाच सर्वोत्तम मार्ग आहे. यासाठी जळगावकरांनी मार्केटमध्ये विनाकारण गर्दी करणे टाळायला हवे, व्यापार्यांनीही ग्राहकांना तशा सुचना द्याव्यात अन्यथा पुन्हा लॉकडाऊन झाल्यास त्यांचेच सर्वाधिक नुकसान आहे.
Post a Comment