‘भारतरत्न’ नव्हे देवमाणूस रतन टाटा

कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटात नोकरदार वर्गाचे टेन्शन प्रचंड वाढले आहे. लाखो लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. काही ठिकाणी कर्मचारी कपात, पगार कपात किंवा अन्य सोयी सुविधा कमी करण्यात येत आहेत. अशात पण टाटा ग्रुप याला अपवाद ठरला. टाटा ग्रुपने एकाही कर्मचार्‍याला काढून टाकले नाही. याउलट पगारवाढ, बोनस वाटप करत कंपनीतील कर्मचार्‍यांची अगदी कुटुंबाप्रमाणे काळजी घेतली. आता त्याहूनही एक पाऊल टाकत आपल्या कुठल्याही कर्मचार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास, त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांना त्या कर्मचार्‍याच्या वयाच्या ६० वर्षांपर्यंत म्हणजे रिटायरमेंटच्या वयापर्यंत संपूर्ण वेतन देण्यात येईल. एवढेच नाही तर, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण व्यवस्थादेखील कंपनीच करेल आणि अशा कुटुंबांना वैद्यकीय तसेच निवासाची सुविधाही मिळत राहील, अशी घोषणा टाटा स्टीलने केली आहे. या शिवाय, आपले कर्तव्य बजावत असताना एखाद्या फ्रंटलाईन वर्करचा मृत्यू झाला, तर कंपनी व्यवस्थापन त्यांच्या मुलांचा भारतात पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार आहे. टाटांच्या या घोषणेने सर्वांची मने जिंकली आहे.



हजारो रुग्णांचे प्राण वाचविले

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा हे त्यांच्या दानशूर व्यक्तिमत्वामुळे कायमच चर्चेत असतात. टाटा हे भारतावर किती प्रेम करतात हे सांगायला नको. कोरोना काळात देखील त्यांनी देशासाठी भरभरून मदत केली. देशाबद्दल जे जे काही करता येईल त्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असतात. कोरोना संकटच्या काळातही टाटा समूह देशाच्या मदतीसाठी धावून आला. देशावर कोरोनाचे संकट ओढवल्यापासून रतन टाटा यांनी विविध पद्धतीने लोकांपर्यंत आपला मदतीचा हात कायम पोहोचेल याची काळजी घेतली आहे. गेल्यावर्षी देखील रतन टाटा यांनी कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी टाटा ट्रस्टतर्फे १५०० कोटींची मदत जाहीर केली होती. त्यानंतर रतन टाटांनी ‘नो लिमिट’ मदतीची योजना जाहीर केली. टाटा समूह या योजनेसाठी तब्बल २००० कोटी रुपये खर्च करणार आहे. विशेष म्हणजे, कोविड योद्धा बनून रुग्णलयात काम करणार्‍या डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचार्यांसाठी त्यांनी आपले ताज हॉटेलही खुले केले. रुग्णालयात याच हॉटेलमधून दररोज जेवणाचे डबेही पुरविले. कोरोना संकट काळात देशातील अनेक भागात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यानंतर टाटा समूहाने लिक्विड ऑक्सिजनच्या हालचालीसाठी २४ क्रायोजेनिक कंटेनर्स आयात करत दररोज २००-३०० टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन राज्य सरकार आणि रुग्णालयांमध्ये पाठवत हजारो रुग्णांचे प्राण वाचविले. 

भारतरत्न देण्याची मागणी

कोरोनाच्या या काळात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी टाटा ग्रुपमधील बनमाली अग्रवाल, प्रेसिडेंट ग्रुप ऑफ हॉटेल्स, टाटा इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेन्स अँड एअरोस्पेस, टाटा सन्स, टाटा स्टील, टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम, टाटा मोटर्स, इंडियन हॉटेल्स, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, टाटा इंटरनॅशनल, व्होल्टास, टाटा प्रोजेक्ट या कंपन्या काम करत आहेत. यापैकी काही कंपन्यांनी गेल्या वर्षी कोविड काळ सुरु झाल्यानंतर जीवरक्षक उपकरणे उपलब्ध करुन देण्यात मदत केली होती. टाटा उद्योग समूहात हॉटेल, आर्थिक सेवा, ऑटो, विमान आदींचा समावेश होतो. ही अशी क्षेत्र आहेत ज्याच्यावर कोरोनामुळे सर्वाधिक परिणाम झालाय. विमान सेवा आणि हॉटेल व्यवसायातील परिस्थिती सर्वांना माहित आहे. ऑटो सेक्टरची परिस्थिती अशीच असून गाड्यांची विक्रीत प्रचंड घट झाली आहे. असे असून सुद्धा टाटाने एकाही कर्मचार्‍याला नोकरीवरून काढून टाकेल नाही. त्याउलट टाटा समूहातील आयटी कंपनी असलेल्या टीसीएस ने चालू आर्थिक वर्षात ४० हजार लोकांना नोकरी देण्याची घोषणा केली आहे. टाटांचे देश व कर्मचार्‍यांवरील प्रेम सर्वश्रूत आहे. याचा प्रत्येय काही दिवसांपुर्वी पुण्यातील एका माजी कर्मचार्‍याला आला होता. मागील दोन वर्षांपासून अस्वस्थ असलेल्या एका माजी कर्मचार्‍याला भेटण्यासाठी ८३ वर्षीय रतन टाटा यांनी मुंबई ते पुणे प्रवास केला. ते जेंव्हा आजारी कर्मचार्‍याला भेटायला घरी गेले यावेळी त्यांच्यासोबत ना बाउन्सर होते ना सुरक्षारक्षक वा ताफा. अत्यंत साधेपणाने या माजी कर्मचार्‍यांची त्यांनी भेट घेतली. या खासगी भेटीचा कोणत्याही प्रकारे प्रचार केला गेला नाही. त्यांच्या या भेटीचा एक फोटो व्हायरल झाला होता. या घटनेवरुन ते कर्मचार्‍यांना कुटुंबातील एक सदस्य म्हणूनच पहातात, हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले. त्यांच्या अशा या मनं जिंकणार्‍या कार्यामुळे त्यांना भारतरत्न देण्याची मागणी सोशल मीडियावर सातत्याने होत असते. मात्र यासही रतन टाटा नम्रपणे नकार देतात. 

अन्य कंपन्यांनी रतन टाटांचा आदर्श घ्यायला हवा

आता तर रतन टाटा एका देवमाणसाच्या रुपाने त्यांच्या कर्मचार्‍यांच्या समोर आले आहेत. गत वर्षभरापासून कोरोनाने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. कोरोनामुळे देशात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. यात अनेकांनी आपले आई-वडील, तर कुणी आपले भाऊ-बहीण गमावले आहेत. अनेक मुलं अनाथ झाली आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी टाटा उद्योग समूह विविध प्रकारचे प्रयत्न करत आहेत. यातच टाटा स्टीलने अशा लोकांसाठी मोठी घोषणा करून पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकली आहेत. टाटा स्टीलने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना त्या कर्मचार्‍याच्या रिटायरमेंटपर्यंत पगार देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेला एलआयसीचे ब्रीदवाक्य खर्‍या अर्थाने लागू पडते, ते म्हणजे ‘जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी’ रतन टाटांची ही कृती इतर कॉर्पोरेट कंपन्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. टाटा समूह इतका मोठा व यशस्वी का आहे? कारण ते त्यांच्या कर्मचार्‍यांची नियमांच्या चौकटीबाहेर जावून काळजी घेतात म्हणूनच...कोरोनाचे संकट वर्षभरापासून आले आहे मात्र अनेक कंपन्यांमध्ये वर्षानुवर्षे काम करणार्‍यांना एका झटक्यात काढून टाकणार्‍या कॉर्पोरेट कंपन्यांनी टाटांपासून बोध घेणे गरजेचे आहे. कंपनी संकटात असतांना अनेक कर्मचारी रक्ताचे पाणी करुन काम करतात मात्र आज जेंव्हा त्यांच्यावर संकट आले तेंव्हा त्यांचा मध्येच असा हात सोडून देणे कितपत योग्य? याचा विचार अन्य कंपन्यांनी करायला हवा व देवमाणून रतन टाटांचा आदर्श घ्यायला हवा.

Post a Comment

Designed By Blogger