ऑलिम्पिक व्हेंटिंलेटरवर!

दर चार वर्षांनी आयोजित केली जाणारी ऑलिम्पिक स्पर्धा ही केवळ एक क्रीडास्पर्धा नसते तर एक वैश्‍विक उत्सव असतो. २०२० मध्ये जापानच्या टोकियोत २४ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत स्पर्धा रंगणार होत्या. याकाळात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्या. अर्थात यास ऑलिम्पिक अपवाद नव्हते फरक एवढाच होता की ऑलिम्पिक रद्द न करता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. संघटनेने ऑलिम्पिकच्या जाहीर केलेल्या नव्या तारखांनुसार ही स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ या कालावधीत होणे अपेक्षित आहे. मात्र कोरोनाची दुसरी लाट आणि जपानमध्ये उद्भवलेली परिस्थिती बघता अगदी ३ महिन्यांवर असलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट आहे. कोरोनामुळे टोकियोसह जपानच्या अनेक शहरात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. यामुळे ऑलिम्पिकचे आयोजन रद्द व्हावे, अशी मागणी जोर धरत आहे. टोकियो ऑलिम्पिकला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असला तरी आयोजन रद्द होणार नसल्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने स्पष्ट केले आहे. यामुळे ऑलिम्पिक खरोखरचं होईल का? व झाले तर कसे होईल? हे प्रश्‍न जगभरातील क्रीडाप्रेमींना पडले आहेत.ऑलिम्पिक रद्द करण्यासाठी ऑलिम्पिक समितीवर दबाव

गत वर्षापासून जगभरातील महासत्तांना हादरवून सोडणार्‍या कोराना विषाणूचे थैमान अजूनही सुरुच आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसी उपलब्ध झाल्या असल्या तरी परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. कोरोनाचा फटका जवळपास सर्वच क्षेत्रांना बसला यास क्रीडा क्षेत्रही अपवाद नाही. आयपीएलसारखी सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा देखील कोरोनामुळे मध्येच थांबवावी लागली. त्यापाठोपाठ आता ऑलिम्पिकवर देखील कोरोनाचे संकट घोंगावत आहे. मुळात ही स्पर्धा गेल्या वर्षीच होणार होती. मात्र कॅनडा आणि अमेरिकासह न्यूझीलंड, जर्मनी, इंग्लंडदेखील ऑलिम्पिक रद्द करण्यासाठी ऑलिम्पिक समितीवर दबाव आणत होते. सर्व देशांचे म्हणणे होते की, ऑलिम्पिकदरम्यान, खेळाडूंना कोरोनाचा धोका अधिक आहे. त्यामुळे यासर्व देशांनी ऑलिम्पिक खेळांना एक वर्षांसाठी स्थगित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. मात्र वर्षभरातनंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने यावेळीही ऑलिम्पिकला विरोध होत आहे. जापानमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑलिम्पिकमधील उन्हाळी क्रीडा स्पर्धा अगोदर पुढे ढकलल्या गेल्या व आता तर ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्याची मागणी जपानमध्ये जोर धरत आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेण्याकरिता आफ्रिका, भारत, ब्रिटन, अशा देशांतून येणारे खेळाडू कोरोनाचे वेगवेगळे स्ट्रेन घेऊन टोकियोला येतील व त्यामुळे जपानी लोकांच्या जिवाला धोका वाढेल, अशी भीती व्यक्त होत आहे. यामुळे जापानमध्ये ऑलिम्पिक होवू नये, याबाजूने जवळपास ८० टक्के जापानी एकवटले आहेत. 

ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलता येणार नाहीत, त्या रद्दच कराव्या लागतील

सध्या जपानमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे येथे मेडिकल सुविधांचाही अभाव दिसून येत आहे. अशा परिस्थितीत टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन केल्यास हेल्थ वर्कर, नागरिक व या क्रीडा महोत्सवाशी निगडीत जनतेसाठी हानिकारक ठरू शकते, अशा याचिकाही तेथील न्यायालयात दाखल झाल्या आहेत. स्थानिक लोकांना विषाणूचा संसर्ग होऊ नये, त्यांचा बचाव व्हावा यासाठी यापूर्वीच ऑलिम्पिकमध्ये परदेशी चाहत्यांना सहभाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच खेळाडू, प्रशिक्षक, पत्रकार आणि कार्यक्रम अधिकार्‍यांसाठी देखील प्रवेश मर्यादित असेल, असे ऑलिम्पिक समितीने स्पष्ट केले आहे, तरीही स्थानिक पातळीवर याला होणारा विरोध कमी होत नाही. यातून मार्ग काढणत अनुकुल वातावरण तयार व्हावे यासाठी आयोजकांनी ऑलिम्पिकच्या तयारीची चाचणी घेण्यासाठी काही स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यात ऑलिम्पिकची दोन ठिकाणे टोकिओ व योकोहामामध्ये बेसबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात मर्यादित प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला. प्रेक्षकांमध्ये एक आसन रिकामे सोडण्यात आले होते. त्यांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले होते. ठिकठिकाणी सॅनिटायझर स्टेशन तयार करण्यात आले होते. त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि जपानच्या संघटनेने असे स्पष्ट केले आहे, की आता ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलता येणार नाहीत, त्या रद्दच कराव्या लागतील, याशिवाय अन्य कोणाताही पर्याय नसेल. 

जापानचे सुमारे ३.१५ लाख कोटी रुपयांचे नुकसान!

जपानच्या अधिकार्‍यांसाठी ही परिस्थिती अधिक अवघड बनली आहे, कारण ऑलिम्पिकचे आयोजन होणार हे गृहित धरुन त्याच्या नियोजनासाठी मोठा खर्च करण्यात आला आहे. टोकियो ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धा रद्द केल्यास जपानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसेल. यामुळे जापानचे सुमारे ३.१५ लाख कोटी रुपयांचे नुकसान होईल. यात सरकार, आयोजन समिती, हॉस्पिटॅलिटी क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, हॉटेल, स्थानिक बाजार आदींच्या नुकसानीचा समावेश आहे. मात्र, स्पर्धा पुढे ढकलल्याने यापूर्वीच जवळपास ४२ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कारण, स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या क्रीडा साहित्य व सुविधांच्या देखभालीचा खर्च वाढला आहे. हे नुकसान कमी करण्यासाठी आयोजक नवे पर्याय शोधत आहे. त्यांच्यानुसार, स्पर्धा पुढे ढकलल्या किंवा रद्द झाल्यास ४८० मिलियन डॉलर (जवळपास ३५०० कोटी रुपये) इन्शुरन्समधून मिळतील. मात्र ही रक्कम खर्चाच्या तुलनेत खूप कमी आहे. यामुळे ऑलिम्पिक रद्द होवू नये, यासाठी जपान सरकारची धडपड सुरु आहे. जपानमध्ये आयोजित ऑलिम्पिक रद्द होण्याची ही दुसरी वेळ असेल. याआधी दुसर्‍या महायुद्धाच्या काळात १९४०मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा रद्द केल्या गेल्या, त्यावेळी जपानमध्ये ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन केले होते. जगभर युद्धज्वर तीव्र झाल्याने ही स्पर्धा रद्द केली गेली. तत्पूर्वी, पहिल्या महायुद्धामुळे १९१६मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा रद्द केल्या होत्या. त्यावेळी स्पर्धांचे यजमानपद जर्मनीकडे होते. यानंतर १९४४मध्ये लंडन ऑलिम्पिक देखील रद्द करण्यात आले होते. चौथ्यांदा ऑलिम्पिक रद्द होते का? याचे उत्तर लवकरच मिळेल!


Post a Comment

Designed By Blogger