अजूनही कडक निर्बंध हवेच

राज्यात कोरोनाग्रस्तांचे आकडे ६० हजारापार गेल्यानतंर एप्रिलमध्ये राज्यभरात कडक निर्बंध घालण्यात आले. याची मुदत १५ मे रोजी संपत आहे. या निर्बंधाच्या काळात रुग्णसंख्या केवळ स्थिरावलीच नसून खाली येण्यास सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत निर्बंध हटविण्याऐवजी महाराष्ट्रात १५ मे नंतरही कठोर निर्बंध कायम राहील हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये सध्या संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असून आणखी काही जिल्हे १० ते १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या सकृतदर्शनी कमी दिसत असली, तरीही लॉकडाऊन काढला तर अन्य राज्ये व जिल्ह्यातील लोक मोठ्या प्रमाणात मुंबईत येतील आणि तेथून कोरोनाची साथ पुन्हा राज्यभर पसरेल, म्हणून ३१ मेपर्यंत परिस्थिती आहे तशीच ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. आरोग्य यंत्रणांवरील ताण कमी करण्यासाठी, रुग्णसंख्या नियंत्रणात आली पाहिजे. त्याआधी निर्बंध शिथिल करणे योग्य ठरणार नाही. ....तर तिसर्‍या लाटेचाही प्रभाव अधिक असणार

राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे प्रमाण अधिक तीव्र प्रमाणात पाहायला मिळत आहे. फेब्रुवारीच्या सुमारास दुसर्‍या लाटेला सुरुवात झाली. एप्रिलच्या शेवटपर्यंत दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत गेली. मात्र, त्यानंतर राज्य सरकारच्यावतीने लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या कमी होत आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा आलेख सपाटीकरणावर असल्याचे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले आहे. कोरोनाची दुसरी लाट सपाटीकरणावर, पुढे वाढू ही शकते किंवा ओसरूही शकते. राज्यात गेल्या ४ ते ५ दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख हा सपाटीकरणावर आहे. जर राज्यातील लॉकडाऊन आहे असाच ठेवल तर रुग्णसंख्या ही कमी कमी होऊ शकते. मात्र, जर लॉकडाऊन काढला आणि पुन्हा पहिल्या सारखी गर्दी होऊ लागली तर कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. तिसरी लाट येणार, या लोकांना तिसर्‍या लाटेत अधिक धोका - कोणतीही जागतिक साथ आली की त्या साथीच्या दुसर्‍या लाटेनंतर तिसरी लाट ही येतच असते. महाराष्ट्रात तयार झालेल्या डबल विषाणूने दुसर्‍या लाटेत आपल्याला याचा अधिक प्रभाव जाणवला. जर अश्याच पद्धतीने तिसर्‍या लाटेतही आपल्या इथेच कोरोनाच नवीन विषाणू किंवा परिवर्तित विषाणू तयार झाले, तर तिसर्‍या लाटेचाही प्रभाव अधिक असणार आहे. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत ज्यांना कोरोनाची लागण झाली नाही, त्यांना तिसर्‍या लाटेत कोरोनाच लागण होण्याची भीती जास्त आहे. ज्यांना पहिल्या लाटेत कोरोना होऊन गेला आहे, अश्या लोकांनाही तिसर्‍या लाटेत कोरोना पुन्हा होण्याची जास्त भीती आहे. 

 गतवेळी केलेली चुक पुन्हा परवडणार नाही

तिसर्‍या लाटेत लहान मुलांनाही धोका असल्याचे सांगण्यात येत असल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. डबल म्युटेशनमुळे राज्यात संसर्गाचा प्रसार तीव्रतेने झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. यामुळे आगामी काळात गाफिल राहून चालणार नाही. पहिल्या लाटेदरम्यान दुसर्‍या लाटेचा इशारा देण्यात आला होता मात्र केंद्र सरकार, राज्य सरकारसह सर्वच जण गाफिल राहिल्याने आता दुसर्‍या लाटेत त्याची मोठी किंमत चुकवावी लागत आहे. दुसर्‍या लाटेला रोखण्यासाठी राज्यात सुमारे दिड महिन्यांपासून कडक निर्बंध लावण्यात आले आहे. याकाळात याचे फारसे पालन होत नसले तरी त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. राज्यात रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. आपल्याकडे रोज ६० ते ७० हजार रुग्ण निघत होते. त्यांची संख्या आता ४५ ते ५० हजारापर्यंत कमी झाली आहे. मात्र अजूनही परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आलेली नाही. अशावेळी लॉकडाऊन काढला किंवा निर्बंधांमध्ये शिथिलता आणली तर केलेली सगळी मेहनत वाया जाईल. यामुळे लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय योग्यच म्हणावा लागेल. सुरुवातीला लॉकडाऊनला विरोध होत होता मात्र आता त्याचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याने पुढील १५ दिवस वाढले तरी त्याचे स्वागतच होईल, अशी परिस्थिती आहे. यामुळेच सरकारने नेमलेल्या टास्क फोर्ससह वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘जैसे थे परिस्थिती’ कायम ठेवावी, अशी शिफारस केली आहे. याकाळात सरकारला यंत्रणा मजबूत करण्यासाठी युध्दपातळीवर काम करावे लागणार आहे. ऑक्सिजनची उपलब्धता, रेमडिसिव्हीर, बेड आदींची सज्जता ठेवावी लागेल. गतवेळी केलेली चुक पुन्हा परवडणार नाही. 

लसीकरणाचा वेग वाढणे गरजेचे

लॉकडाऊन व कडक निर्बंधांमुळे अर्थकारणाला खीळ बसली आहे, हे जरी खरे असले तरी ‘जान है तो जहान है’ हे लक्षात ठेवावे. सध्या सुरु असलेल्या कडक निर्बंधात सकाळी ११ वाजेपर्यंत घराबाहेर पडण्याची मुभा असल्याने सकाळी खरेदीसाठी उसळणारी गर्दी धोक्याची घंटा आहे. हे चित्र असेच असले तर तिसर्‍या लाटेला आमंत्रण दिल्या सारखे होईल, याचे भान प्रत्येकाने ठेवण्याची आवश्यकता आहे. यासाठी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करायला हवी. दुसरीकडे कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढणे गरजेचे आहे. आधी लोक लसीकरणासाठी पुढे येत नव्हते आता प्रत्येकाला लसींचे महत्व पटले असल्याने लसीकरणासाठी गर्दी होवू लागली आहे मात्र सध्या लसीच उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. लसीकरण हाच कोरोनाला रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. कारण राज्यात अजूनही हर्ड इम्युनिटी आलेली नाही. कोरोना विरुध्द सुरु असलेले युध्द अजूनही संपलेले नाही, याचे भान प्रत्येकाने ठेवून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळणे, मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला काही होणार नाही, माझी रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे, अशा भ्रमात न राहणे, हाच सर्वोत्तम मार्ग आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येकाने आपआपली जबाबदारी ओळखली पाहिजे. सर्वकाही राज्य व केंद्र सरकारवर ढकलून चालणार नाही. शासनाने अजून काही दिवस निर्बंध लादले तरी थोडी कळ सोसावी लागणार आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे.

Post a Comment

Designed By Blogger