साखळी तुटली!

गेल्या नऊ महिन्यापासून संपूर्ण जगभरात कोरोनाची साथ सुरू आहे. मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्रात पहिला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर संपूर्ण देशांत लॉकडाऊन करण्यात आला. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आरोग्य कर्मचारी व पोलिसांनी कडक उपाययोजना करून कोरोनाला अटकाव केला. ऑगस्टनंतर विशेषत: गणेशोत्सवानंतर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या कोरोनावर सप्टेंबर अखेरनंतर पुन्हा नियंत्रणात मिळवण्यात आले आहे. मात्र दिवाळीनंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढतील, अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र दिवाळी होऊन १५ दिवस उलटल्यानंतरही कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात दिसून येत आहे. अद्याप कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाली नसताना कोरोनाचा मंदावलेला वेग निश्‍चितच दिलासादायक आहे. भारतात लोकांमध्ये हर्ड इन्यूनिटी तयार झाल्याचे मानण्यात येत आहे. यापार्श्‍वभूमीवर अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे अध्यक्ष बलराज भार्गवा यांनी, देशातील करोनाची साखळी तोडण्यात यश आले, तर प्रत्येक नागरिकाला लस देण्याची गरज पडणार नाही, असे वक्तव्य केले आहे.



लसींवरील संशोधन अंतिम टप्प्यात

चीनपासून उगम पावलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटारमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. अमेरिकेसारखा बलाढ्या देश देखील कोरोनापुढे हतबल झालेला दिसत आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत अमेरिका जगात पहिल्या क्रमांकावर असून भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. व्हायरसवर नियंत्रण मिळविण्यासाठी किंवा तो मारण्यासाठी जगभरातील संशोधक लस शोधण्याचा प्रयत्न करत आहे. भारतासह अनेक देशांतील लसींवरील संशोधन अंतिम टप्प्यात पोहचले असले तरी सर्वसामान्यांना लस अद्याप उपलब्ध झालेली नाही. या संकटकाळात दिलासादायक घडलेली गोष्ट म्हणजे, मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्णसंख्येचा वेग मंदावल्याचे दिसत आहे. देशात शिरकाव केल्यानंतर सुरूवातील कोरोनाचा प्रसार नियंत्रित होता. मात्र शिथिलीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर वेग वाढला. सप्टेंबरमध्ये करोना रुग्णसंख्येचा स्फोट झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. पण ऑक्टोबरच्या सुरूवातीपासून करोना रुग्णवाढ मंदावली. देशात आतापर्यंत एकूण १ लाख ३८ हजाराहून अधिक कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण रुग्णसंख्येचा आकडा हा ९५ लाखांच्या पुढे गेला असला तरी यातील ८९ लाखांपेक्षा जास्त बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ९१ हजरा ४१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.४९ टक्के इतका झाला आहे ही निश्चितच चांगली बातमी आहे. मात्र अजूनही धोका टळलेला नाही, याचे भान प्रत्येकाने ठेवण्याची आवश्यकता आहे. 

हर्ड इम्युनिटीचा भारतीयांना सर्वात जास्त फायदा

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लस महत्त्वाची असल्याची चर्चा कित्येकी महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे सगळ्याचेच लक्ष करोनाची लस कधी येणार, याकडे लागले आहे. भारतात पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद येथे अनुक्रमे ‘कोव्हिशिल्ड’, ‘झायकोव्ही-डी’ आणि ‘कोव्हॅक्सीन’ या लसींच्या निर्मितीचे प्रयत्न होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तीनही प्रयोगशाळांना गेल्या आठवड्यात शनिवारी भेट दिली. कोव्हिड-१९ सारख्या नव्या साथरोगावर वर्षभरात लस विकसित करण्याचा प्रयत्न स्तुत्य आणि महामारीचे थैमान रोखण्यासाठी आवश्यक आहे; परंतु घाई घाईने लस आणण्यात धोका असतो. मात्र पंतप्रधानांसारख्या सर्वोच्च नेत्याचा दौर्‍यामुळे, लस निर्मितीचा कार्यक्रम देशात योग्य दिशेने सुरू आहे, असे मानले जात आहे. सर्व चाचण्या, तांत्रिक अडथळे आणि मान्यतेचे सोपस्कार पार करून तीनही लसी मार्चपर्यंत बाजारात येतील, असे दिसते. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट येथे ऑक्सफर्ड ऍस्ट्राझेनेका यांच्या मदतीने ‘कोव्हिशिल्ड’ ही लस विकसित होत आहे. तिच्या चाचण्यांत तांत्रिक अडथळे आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, त्यांवर मात करून ही लस सिद्ध होत असल्याचे संकेत पंतप्रधानांच्या भेटीत देण्यात आले. लस येण्याआधीच भारतात कोरोनाच्या मंदावलेल्या वेगामुळे आरोग्य यंत्रणेला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार भारतीयांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी एक वेगळी रोगप्रतिकारक क्षमता कामी आली आहे. ज्याला आपण ‘हर्ड इम्युनिटी’ असे म्हणतो. ब्रिटनच्या प्रिंस्टन युनिव्हर्सिटी आणि सेंटर फॉर डिजीज डायनॅमिक्स, इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी (सीडीडीईपी) च्या काही वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार हर्ड इम्युनिटीचा भारतीयांना सर्वात जास्त फायदा होऊ शकतो. यामुळे भारतीय जनता कोरोनापासून बचाव करू शकेल, असा निष्कर्ष ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात आला होता. त्याचेच परिणाम आता दिसून येत आहेत. 

आरोग्य सुविधांचा फेरआढावा घेण्याची गरज

कारोना लसीकरणाबाबत बलराज भार्गवा म्हणाले की, देशभरात लसीकरण करण्यात येईल, असे सरकारने कधीही म्हटलेले नाही. देशातील प्रत्येक नागरिकाला लस देण्याची गरज देखील पडणार नाही. कोरोनामुळे बर्‍याच क्षेत्राचे नुकसान झाले. त्यामुळे देशाची आर्थिक व्यवस्थ्या पूर्णपणे कोलमडून पडली आहे. आता कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे, हे जरी खरे असले तरी कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. याचे भान ठेवण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत प्रत्येकाने आपआपली काळजी घेणेचे उचित राहिल. येत्या काही दिवसात राज्य व केंद्र सरकारच्या पातळीवर कोरोना नियंत्रणासाठी आणखी व्यापक प्रयत्न व्हायला हवेत. त्यात त्यांना सातत्य राखावेच लागेल. लसींबाबत भारतातील घडामोडी योग्य पथावर दिसत आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्या दाव्यानुसार, मार्च महिन्यापर्यंत भारतीय बनावटीची लस सर्वांना उपलब्ध होवू शकते. त्याआधी जानेवारीपासून अन्य लसी देखील टप्प्या टप्प्याने उपलब्ध होण्यास सुरुवात होतील. मात्र, सर्वांना लस मिळण्यास वेळ लागणार असल्याने सर्वतोपरी काळजी घेणे गरजेचेच आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी कोरोनाची साखळी तोडण्यात मोठ्याप्रमाणात यश आले असले तरी अजून शेवटचा टप्पा गाठायचा आहे. कोरोनाचे संकट दूर झाल्यावर देशातील आरोग्य सुविधांचा फेरआढावा घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर कोरोनासारखी साथ भविष्यात आल्यास आजच्यासारखी धावपळ होऊ नये यासाठीचा व्यापक आराखडा तयार होणे गरजेचा आहे.

Post a Comment

Designed By Blogger