चंद्रावर पुन्हा पडणार मानवी पाऊल

मानवाला अगदी प्राचीन काळापासून चंद्राचे विशेष आकर्षण राहिले आहे. चंद्र आणि माणसाचे नाते खूपच वेगळे आहे. साहित्यिक व कविकुलाचा हा लाडका, प्रेमीयुगुलांच्या भावबंधांचा साक्षीदार मानला जातो. चंद्राची तुलना प्रियसीसोबत करत अनेक गाणी लिहिली गेली आहेत. आजी-आजोबांच्या गोष्टीत तर ‘चांदोबा’ असतोच. तिकडे सातासमुद्रापारच्या शेक्सपिअरच्या साहित्यातही चंद्र डोकावतोच. पाश्चात्त्य जगात काही विज्ञान काल्पनिकांमध्ये चंद्राचा उल्लेख झाला आहे. तसेच काही हॉलीवूडपटांमध्येही चांद्रमोहिमा दाखविण्यात आल्या आहेत. चंद्राच्या या आकर्षणामुळे २० जुलै १९६९ ला पृथ्वीपासून तीन लाख ८४ हजार ४०० किलोमीटर दूर असलेल्या चंद्रावर अमेरिकेचा अवकाशवीर निल आर्मस्ट्राँगने पहिले पाऊल ठेवण्याची अचाट कामगिरी करुन दाखवली. चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल पडल्याचा सुवर्णमहोत्सव गेल्या वर्षीच साजरा झाला. त्यानंतर आता अमेरिकेने पुन्हा मानवाला चंद्रावर उतरविण्याची तयारी सुरु केली आहे. 

एक महिला आणि एक पुरुष चंद्रावर जाणार 

मानवाच्या चांद्रमोहिमेचा इतिहास मोठा रंजक आहे. १२ एप्रिल १९६१ ला युरी गागरीन या अंतराळवीराला अवकाशात पाठवत रशियाने अमेरिकेवर अवकाश क्षेत्रात मात केली. हा पराभव अमेरिकेच्या जिव्हारी लागला. यानंतर तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी थेट चंद्रावर जाण्याचा निर्धार बोलून दाखविला. तब्बल ८ वर्षाच्या अथक मेहनत आणि ८ अवकाशवीरांचा या मोहिमेच्या चाचणीत बळी गेल्यावर अमेरिकेने चंद्रावरची अपोलो मोहीम यशस्वी केली. २० जुलै १९६९ अमेरिकेचा अवकाशवीर निल आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. यानंतर जवळपास १० अमेरिकन अवकाशवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवले. आजवर अनेक चंद्रमोहिमा झाल्या पण चंद्रावर उतरून तिथून पुन्हा पृथ्वीवर उतरण्याच्या अनुभवाची सर कशालाच नाही. आज ५० वर्षानंतर नासा पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर पाठवण्यासाठी सज्ज होते आहे. २०२४ मध्ये पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर पाठविण्याची ‘अर्टेमिस’ मोहीम नासाने आखली आहे. या मोहिमेअंतर्गत एक महिला आणि एक पुरुष अंतराळवीर चंद्रावर पाठवण्यात येणार आहे. या मोहिमेसह भविष्यातला मानवाचा चंद्रावरचा वावर हा केवळ काही मिनिटांचा किंवा तासांचा नसेल. एक झेंडा रोवून, पाऊलठसा उमटवून परत येण्यात आता काहीच हशील नाही. आता तिथे जायचे ते मुक्कामासाठीच, ही माणसाची महत्त्वाकांक्षा आहे. 

भारतीय वंशाच्या अंतराळवीराचा समावेश 

चंद्रपृष्ठावर गुरुत्वाकर्षण कमी आहे, तिथे प्राणवायू किंवा पाणी नाही, असे असले तरी चंद्रावर मानवी मोहिमांच्या पलिकडे जावून थेट मानवी वस्ती उभारण्याची स्वप्ने अनेक वर्षांपासून पाहिली जात आहेत. इलॉन मस्क यांची स्पेस एक्स या कंपनीने या प्रकल्पावर काम देखील सुरु केले आहे. या दृष्टीने ‘आर्टेमिस’ ही मोहिम अत्यंत महत्वाची मानली जात आहे. नासाने या मोहिमेची तयारी सुरू केली असून या चांद्रमोहिमेसाठी १८ अंतराळवीरांच्या नावाची घोषणा केली आहे. यात राजा जॉन वुरपुट्टर चारी या भारतीय वंशाच्या अंतराळवीराचाही समावेश आहे. चारी हे अमेरिकेच्या हवाई दल अकादमीचे तसेच नेव्हल टेस्ट पायलट स्कूलचे ते पदवीधर आहेत. नासाने २०१७ मध्येच अंतराळवीरांच्या विशेष प्रशिक्षण वर्गासाठी त्यांची निवड केली होती. ते सुरुवातीचे प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर आता ते चांद्रमोहिमेसाठी पात्र ठरले आहेत. राजा चारी (वय ४१) हे भारतीय वंशाचे तिसरे अमेरिकन अंतराळवीर असतील. चारी हे अमेरिकेच्या हवाईदलात कर्नल आहेत. खगोलशास्त्रीय अभियांत्रिकी आणि वैज्ञानिक अभियांत्रिकीचे शिक्षण त्यांनी घेतलेले आहे. त्यांचे वडील श्रीनिवास चारी हे अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी १९७० मध्ये हैदराबादहून अमेरिकेला आले होते. उच्च शिक्षण घेऊन यशस्वी करिअर घडविण्याचे त्यांचे ध्येय होते. अमेरिकेतील मुलीशी विवाहबद्ध झाल्यानंतर ते तेथेच स्थायिक झाले. राजा चारी यांची जन्मभूमी व कर्णभूमी अमेरिका आहे. 

मानवीवस्तीच्या दृष्टीने नासाची मोहिम 

३ एप्रिल १९८४ रोजी भारताने इतिहास रचला होता. इस्त्रो आणि रशिया अर्थात तत्कालीन सोव्हियत युनियनच्या संयुक्त मोहिमेत चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला भारतीय व्यक्ती म्हणून राकेश शर्मा यांना मान मिळाला होता. त्यानंतर भारतवंशाच्या कल्पना चावला आणि सुनिता विल्ययम्स यांनीही भारताचे नाव अवकाशात कोरले आहे. आता राजा चारी हे चौथे भारतीय ठरले आहेत. या मोहिमेत अमेरिकन्स वगळता कोरियन वंशाचा लेफ्टनंट जॉनी किम आणि इराणी वंशाची जस्मिन मोघबेली या तीन भावी अंतराळवीरांचा समावेश आहे. अमेरिकेच्या नौदलात लेफ्टनंट पदावर असलेला जॉनी किम (वय ३५) हे कोरियन वंशाचे दुसरे अंतराळवीर ठरणार आहेत. ते वैद्यकीय पदवीधारक आहे. आता चंद्रावर जाण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. तर जस्मिन मोघबेली (वय ३६) यांचे आईवडील १९७९ च्या इस्लामी क्रांतीनंतर इराणमधून बाहेर पडले. त्यांचा जन्म जर्मनीतील असला तरी अमेरिका कर्मभूमी आहे. मोघबेली यांनी अवकाशात जाण्याचे स्वप्न लहानपणापासून बाळगले होते. वयाच्या १५व्या वर्षीच त्यांनी ‘अ‍ॅडव्हान्स स्पेस अ‍ॅकॅडमी’चे शिबिर पूर्ण केले. पुढे अमेरिकेतील ‘एमआयटी’तून अवकाश अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नौदलाची शाखा असलेल्या ‘मरिन्स’ दलात प्रवेश घेतला. ‘कोब्रा’ हेलिकॉप्टर चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये युद्ध मोहिमांमध्ये भाग घेतला. या मोहिमेती बहुतेक अंतराळवीर ३० ते ४० वयोगटातील आहेत. सर्वात तरुण अंतराळवीर ३२ वर्षाचा आहे. २०३० पर्यंत चंदावर कायमस्वरुपी मानवीवस्तीच्या दृष्टीने नासाची ही मोहिम विशेष महत्वाची असणार आहे.


Post a Comment

Designed By Blogger