फुटबॉलचा जादूगार, दिएगो मॅरेडोना

फुटबॉल सम्राट म्हणून ओळख असलेले ब्राझिलचे पेले यांच्यानंतर सर्वाधिक प्रसिद्धी लाभलेला फुटबॉल प्लेअर म्हणून अर्जेंटिनाचे दिएगो मॅराडोना यांचे नाव घेतले जाते. फुटबॉल वरील त्यांचे नियंत्रण आणि पकड या सगळ्या गोष्टी, जेमतेम ५ फुट ५ इंच उंचीचे मॅराडोना ज्या चपळतेने करायचे ते बघणे म्हणजे साक्षात देवाचा वरदहस्त लाभलेला खेळाडू बघण्यासारखेच होते. म्हणूनच फिफाच्या २० व्या शतकातील सर्वकालिक महान खेळाडूंमध्ये पेले सोबत मॅराडोनांचे नाव घेतले जाते. ऐंशीच्या दशकात अवघे फुटबॉलविश्व मॅराडोना नावाच्या अवलियाने व्यापले होते. १९८६ विश्वचषक जिंकणार्‍या अर्जेंटिना संघाचे नेतृत्व करताना मॅरोडोनाचा खेळ अजूनही सर्व फुटबॉलप्रेमींच्या लक्षात आहे. याच स्पर्धेत त्यांनी केलेल्या निर्णायक अशा ‘हँड ऑफ गॉड’ गोलची चर्चा अजूनही होते. मॅरोडोना हे नाव तिकके फुटबॉलसाठी प्रसिध्द होते तितकेच वाद-विवादांसाठीही प्रसिध्द होते. दारु आणि ड्रग्जचे व्यसन, निलंबन असे अनेक उतार चढाव पाहणार्‍या मॅरेडोना यांच्या निधनामुळे फुटबॉलविश्वातील एका पर्वाचा अंत झाला आहे.


...नंतर मॅराडोनाचे आयुष्य फुटबॉल ने बदलले

भारत हा क्रिकेटवेड्यांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी जगाच्या पाठीवर सर्वाधिक खेळला जाणारा म्हणून फुटबॉल या खेळाची ओळख आहे. भारतात कोलकात्यातील प्रसिद्ध क्लब मोहन बगान आणि ईस्ट बंगाल क्लब तसेच भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार बायचंग भुतिया यांनी फुटबॉलला लोकप्रियता मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला असला तरी ८०च्या दशकात गल्लीबोळात अथवा रस्त्यांवर फुटबॉल खेळण्याचे वेड लावण्याचे श्रेय मॅरेडोनालाच जाते! डिएगो अरमान्डो मॅराडोनाचा जन्म ३० ऑक्टोबर १९६० रोजी झाला. आठ मुलांमधील पाचवे आपत्य असलेले मॅरेडोना एका गरीब कुटुंबात वाढले. त्यांचे वडील हे साधे कामगार होते. लहानपणीच वयाच्या चौथ्या वर्षी माराडोनाला त्याच्या भावाने फुटबॉल भेट दिला. हा फुटबॉल म्हणजे मॅराडोना चा जीव की प्राण झाला तो शेवटपर्यंत. नीट व्यवस्थित धावण्या आगोदर मॅराडोना फुटबॉल सोबत अनेक क्लुपत्या करायला शिकला होता. वयाची ८ वर्ष होईपर्यंत मॅराडोना फुटबॉल खेळायला शिकला होता. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे माराडोनाचे फुटबॉल वरील नियंत्रण अर्जेंटिना च्या ज्युनिअर टीम च्या कोचच्या लक्षात आले त्यांनी लगेच माराडोनाला टीम मध्ये संधी दिली. त्या नंतर मॅराडोनाचे आयुष्य फुटबॉल ने बदलले ते कायमचे. 

विवादित गोल ‘हॅण्ड ऑफ गॉड’

वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार्‍या मॅरेडोना यांनी यांनी चार विश्वचषकात अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व केले. कर्णधार म्हणून फुटबॉल विश्वचषकात सर्वाधिक सामने खेळण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावे जमा आहे. ९१ आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्जेंटिना फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करताना ३४ गोल झळकावले होते. पण ते सर्वांच्या गळ्यातील ताईत बनले सन १९८६च्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये. हा वर्ल्डकप मॅराडोनाने अक्षरश: गाजवला. फुटबॉल विश्वचषक जिंकणार्‍या अर्जेंटिना संघाचे ते कर्णधार होते. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला देण्यात येणारा ‘गोल्डन बॉल’ पुरस्कार मॅराडोना यांनी आपल्या नावे केला होता. १९८६ विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात त्यांनी केलेला विवादित गोल ‘हॅण्ड ऑफ गॉड’ म्हणून ओळखला जातो. हा गोल मॅराडोना यांच्या हाताला लागून झाला होता. अनेक वर्षानंतर त्यांनी हेतूपुरस्सरपणे चेंडूला हात लावल्याची कबुली देखील दिली होती. फिफाने या गोलला फुटबॉल इतिहासातील सर्वोत्कृष्ट गोल संबोधले होते. बार्सिलोना या क्लब ने माराडोनाच्या क्लब सोबत खेळण्यासाठी प्रचंड असे ७.७ मिलियन अमेरिकन डॉलर मोजले. फुटबॉल इतिहासातील हा एखाद्या खेळाडूसाठी केला जाणार सगळ्यात मोठा सौदा ठरला. माराडोनाचे वय तेव्हा अवघे २१ वर्ष होते. कमी वयात प्रचंड पैसा आणि प्रसिद्धी मॅराडोना ला मिळाली. अतिशय गरिबीतून अचानक हाती लागलेला पैसा त्याच्यासोबत अनेक वाईट गोष्टीही घेऊन आला. ह्यातच मॅराडोना ने कोकेन ची चव चाखली आणि त्याचे व्यसनात रुपांतर व्हायला वेळ लागला नाही. १९८६ चा वर्ल्ड कप माराडोनाला दैवत्व देऊन गेला. १९९० च्या वर्षी माराडोना ने पुन्हा अर्जेंटिनाचे नेतृत्व वर्ल्ड कप मध्ये केलं पण आपल्या लौकिकाला साजेसा खेळ मॅराडोना करू शकला नाही. यावेळी अर्जेंटिना जर्मनी कडून पराभूत झाली. मॅराडोनाला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. १७ मार्च १९९१ ला मॅराडोना उत्तेजकद्रव्य चाचणीत दोषी आढळल्याने त्यांच्यावर १५ महिन्यांची बंदी घालण्यात आली. १९९४ च्या वर्ल्ड कप मधील उत्तेजक द्रव्य चाचणीत मॅराडोना पुन्हा एकदा अपयशी ठरला. 

आयुष्याचा शेवटचा टप्पा  निराशाजनक!

एकेकाळी डोक्यावर घेतलेल्या या खेळाडूची अशी पीछेहाट चटका लावून जात होती. अखेर मॅराडोनाने ऑक्टोबर १९९७ ला फुटबॉल मधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीनंतर त्यांनी २००८ मध्ये अर्जेंटिना फुटबॉल संघाचे प्रशिक्षकपद भूषवले. त्यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ अत्यंत निराशाजनक राहिला. २०१० फुटबॉल विश्वचषकात जर्मनीच्या हातून उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर, त्यांनी आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. मॅराडोना कायम आपल्या विवादित वक्तव्यांसाठी चर्चेत राहिले होते. २००६ फुटबॉल विश्वचषकाच्या उद्घाटनासाठी ते आमंत्रण असूनही उपस्थित राहिले नव्हते. त्यावेळी त्यांनी स्पष्टीकरण दिले होते की, मला त्या पेलेसोबत बसायचे नाही. मॅरेडोनाने अर्जेटिना, इटली आणि स्पेन येथे क्लब संघांचे नेतृत्व केले. याशिवाय बोका ज्युनियर्स, नेपोली आणि बासिर्लोना या प्रख्यात संघांशिवाय अन्य संघाकडूनही खेळ केला. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात अंमली पदार्थांच्या अतिसेवनाने मॅरेडोनाला अनेक व्याधींनी त्यांना ग्रासले होते. २००० आणि २००४ मध्ये त्याला हृदयविकाराच्या समस्येसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, पुढच्या वर्षी त्यांच्यावर गॅस्ट्रिक-बायपास शस्त्रक्रिया झाली. मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्यामुळे काही दिवसांपूर्वीच मॅरेडोना यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. एका अपघातानंतर मॅरेडोना यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रियाही झाली. यातून सावरल्यानंतर मॅरेडोना यांना ११ नोव्हेंबर रोजी त्यांच्या घरी हलविण्यात आले होते. मात्र २५ नोव्हेंबरला वयाच्या ६० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले. उत्कृष्ट ड्रिब्लिंग अ‍ॅक्शन, अचूक पास आणि प्रभावी फूटवर्कमुळे फुटबॉलचे जादूगार म्हणून ओळखले जाणार्‍या मॅरेडोना यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

Post a Comment

Designed By Blogger