जगातील अतिप्राचीन धर्मांपैकी एक आहे हिंदू धर्म! हिंदू धर्माची पाळेमुळे केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगात विविध देशात आढळतात. भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माबद्दल विदेशात प्रचंड कुतूहल आणि आकर्षण दिसून येते. हजारो वर्षांचा इतीहास असलेल्या हिंदू धर्मात रामायण व महाभारताला विशेष महत्व आहे. किंबहूना रामायण व महाभारताशिवाय हिंदू धर्म पूर्णच होऊ शकत नाही, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. गेल्या दोन-तिन दशकांपासून भारतात पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकिकरण वाढत असताना अनेक देशांमध्ये भारतीय संस्कृती व हिंदू धर्माकडे अनेक लोक ओढले जात आहेत. यात अमेरिका, ब्रिटन, रशियासारख्या बड्या देशांचाही समावेश आहे. आता या विषयावर जागतिक पातळीवर चर्चा होण्याचे कारण म्हणजे, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा...मी रामायण आणि महाभारताच्या गोष्टी ऐकतच मोठा झालो. यामुळे मला हिंदू धर्म आणि भारताबद्दल विशेष आस्था असल्याचे ओबामा यांनी त्यांच्या ‘ए प्रॉमिस्ड लँड’ या पुस्तकात म्हटले आहे.
‘अ प्रॉमिस्ड लँड’
भारतात रामायण-महाभारतातल्या गोष्टी बालपणी ऐकल्या नाहीत, असा माणूसच दुर्मिळ म्हणावा लागेल. आधी आजी-आजोबा किंवा आई-वडिल अथवा एखाद्या धार्मिक कार्यक्रमात साधू-संतांच्या तोंडून ऐकल्या जाणार्या रामायण, महाभारताच्या कथा ९०च्या दशकात टीव्हीच्या माध्यमातून सर्व जाती धर्माच्या मुला-मुलींच्या तोंडपाठ झाल्या. मात्र सातासमुद्रापार असणार्या महाबलाढ्य अमेरिका सारख्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा देखील लहानपणापासून रामायण आणि महाभारताच्या गोष्टी ऐकत होते, हे गुपित खुद्द ओबामांनीच उघड केल्याने अनेकांच्या भुवया उंचविणे स्वाभाविक आहे. बराक ओबामा यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीतील अनुभवांवर आधारित ‘अ प्रॉमिस्ड लँड’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. यामध्ये बराक ओबामा यांनी भारताविषयी त्यांचे अनुभव कथन केले आहेत. भारताचा आकार, जगातील एक सष्टांश लोकसंख्या असलेला देश, दोन हजारापेक्षा जास्त पारपंरिक समूह आणि तब्बल ७०० भाषा बोलला जाणारा देश या सार्या घटकांमुळे भारताविषयी माझ्या मनात कायमच कुतूहूल होते. माझ्या बालपणाची काही वर्षे इंडोनेशियात गेली. त्याठिकाणी मला हिंदू धर्मीयांकडून रामायण आणि महाभारताशी निगडीत अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. त्यामुळे बालपणापासूनच माझ्या मनात भारतासाठी विशेष स्थान होते, असे बराक ओबामा यांनी सांगितले. गेल्या काही वर्षात भारतिय संस्कृती आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा जणू काही विडाच उचलला आहे, अशा पध्दतीने एक अजेंडा राबविण्यात येत असल्याचे ठळकपणे जाणवते.
भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म टीका करणे फॅशन
हिंदू धर्माचे श्रध्दास्थान असलेल्या प्रभू श्रीरामांना काल्पनिक पात्र म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली. भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेले काही सण आले की, स्वत:ला सेक्यूलर म्हणवून घेणारा एक गट अचानक सक्रिय होत टीका सुरु करतो. दिवाळीच्या काळात प्रदुषण वाढते, गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांमुळे जलप्रदुषण होते, मोठ्या आवाजामुळे ध्वनी प्रदुषण होते, धुलवळ किंवा रंगपंचमीला पाण्याची नासाडी होते, होळी व दसर्याला पर्यावरणाचा र्हास होतो, अशी कितीतरी अजेंडे राबविले जातात. मात्र औद्योगीकरणामुळे सणांचे रूप बदलले आहे. पूर्वी पूजा फुलापानांनी होत होती. आता प्लास्टिक आले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस आले आहे. फटाके आले आहेत. सणांचे आधुनिक रूप हे पर्यावरणास अनुकूल नाही. समस्या आहे ती औद्योगीकरण आणि व्यावसायीकरण यांची. धर्माची नाही. पण टीका मात्र नेहमीच धर्मावर केली जाते. भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म टीका करणे हे सध्याच्या काळात जणू फॅशन झाली आहे. काही वेळा काही विद्वान किंवा अभ्यासक यांच्याकडूनही अज्ञानापोटी किंवा नकळत अयोग्य विचार मांडले जातात. परिणामी धार्मिक धृवीकरण होण्यास सुपिक वातावरण निर्माण होते. यावरुन अनेकांची राजकीय दुकानदारी चालते, हे अनेकांना स्पष्टपणे दिसत असूनही त्याकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष केले जाते. सध्या याला सेक्युलर असे देखील म्हटले जाते. मात्र सेक्युलर असणे याचा अर्थ देशात होणार्या कायद्यांवर व प्रशासकीय आदेशांवर धर्माचे वर्चस्व व त्याचा रंग असू नये हा आहे. जे मानवीय व्यवहारासाठी आवश्यक आहे अशा मनुष्यकेंद्री व्यवहाराचा तो धर्म आहे.
हिंदू धर्माचे वेगळेपण पुन्हा एकदा अधोरेखीत
राज्य आणि धर्म या दोन स्वतंत्र व्यवस्था आहेत आणि त्यांच्यातील अंतर राखणे हे आधुनिक लोकशाहीची जबाबदारी आहे. दुसरीकडे धर्मांध शक्तींना सेक्युलर व्यवस्थेचे नेमके हेच स्वरूप मान्य नाहीत. त्याचमुळे त्या अतिरेकी होतात. तालिबान, इसिस यासारख्या कमालीच्या कर्मठ व प्रसंगी हिंस्र होणार्या संस्था त्यातून जन्म घेतात. त्यांना धर्माचे राज्यावरील वर्चस्व हवे असते, याबद्दल कुणीच बोलत नाही. याबद्दल स्वामी विवेकानंद यांचे विचार जाणून घेणे आवश्यक आहे. १८९३ साली अमेरिकेत झालेल्या सर्वधर्म परिषदेत भाषण करताना स्वामीजींनी हिंदू धर्माचे सगळ्यांपेक्षा वेगळेपण म्हणून हीच गोष्ट नमूद केली होती. आपला परिचय करून देतानाच त्यांनी म्हटले होते की, मी अशा एका धर्माचा प्रतिनिधी आहे की, जो धर्म सर्व धर्मांचा आदर करतो. माझ्या धर्मामध्ये ज्याला ज्या मार्गाने परमेश्वर प्राप्ती होऊ शकेल त्या मार्गाने जाण्याचे स्वातंत्र्य आहे. माझा हिंदू धर्म हा चौकटीत बंद झालेला धर्म नाही, असे नमुद केले होते. विवेकानंदांनी इस्लामचा कधीच द्वेष केला नाही. इस्लाम असो, ख्रिश्चन धर्म असो की अन्य कोणताही धर्म असो त्या प्रत्येक धर्माने आपापल्या परीने सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हिंदू धर्म अन्य कोणत्याही धर्माला चुकीचा मानत नाही. यामुळेच अलीकडच्या काही वर्षात परदेशातही अनेकांनी हिंदू धर्माचा स्विकार केला असावा. बराक ओबामा जेंव्हा पहिल्यांदा भारत दौर्यावर आले होते तेंव्हा त्यांच्या खिशात ते हनुमानाचा फोटो ठेवतात, यावरुन बरीच चर्चा झाली होती मात्र त्यांनी त्यावर कधी उघडपणे भाष्य केले नव्हते परंतू आता खुद्द त्यांनी रामायण, महाभारतातील गोष्टींबद्दल खुलासा केल्याने भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माचे वेगळेपण पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.
Post a Comment