अमेरिकेतील हिंदू व्होटबँक

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ३ नोव्हेंबरला होत आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटीक पक्षाचे उमेदवार आणि माजी उपराष्ट्रपती जो बायडन यांच्यात होणारी सरळ निवडणूक अतिशय रंगतदार होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या निवडणुकीत प्रथमच भारतीय हिंदू मतदारांना प्रचंड महत्त्व आले आहे. हिंदू मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. ट्रम्प यांनी ‘हिंदू व्हॉईस फॉर ट्रम्प’ तर बिडेन यांनी ‘हिंदू अमेरिकन्स फॉर बिडेन’ अभियान सुरु केले आहे. अमेरिकेत हिंदू मतदारांचा प्रभाव वाढत असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत. अमेरिकेत जवळपास २० लाख हिंदू मतदार असून अमेरिकेत हिंदू हा चौथा मोठा धर्म म्हणून पुढे आला आहे.



प्रथमच हिंदूना प्रचंड महत्त्व

जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती म्हणून अमेरिकन राष्ट्रध्यक्षांची ओळख आहे. यामुळे दर चार वर्षांनी होणार्‍या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे केवळ अमेरिकेन नागरिकांचेच नव्हे तर जगभरातील देशांचे लक्ष लागून असते. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ पुर्ण होत आल्याने नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. वादग्रस्त व लहरी वक्तव्यांमुळे प्रसिध्द असलेले पण भारताचे मित्र म्हणून ओळखले जाणारे ट्रम्प यांना रिपब्लिक पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. तर त्यांच्या विरुध्द डेमोकेेेेेेेेे्रटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन रिंगणात आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचार रणनितीमधील साम्य म्हणजे दोघांनी अमेरिकेतील हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. अमेरिक राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा आजवरचा इतिहास पाहिल्यास आतापर्यंत ज्यू आणि मुस्लिम मते मिळविण्यासाठी राजकीय पक्षांनी अभियाने राबविली होती. मात्र, आता प्रथमच हिंदूना प्रचंड महत्त्व आले आहे. हिंदू मतेही निवडणुकीत मोठा प्रभाव पाडू शकतात, म्हणून राजकीय पक्षांनी त्यांच्याकड लक्ष केंद्रीत केले आहे. यात मुख्य मुद्दा हिंदुंवरील हल्ल्यांचा आणि एच१ बी व्हिसा भोवती फिरत आहे. 

सगळीकडे भारतीयांचा दबदबा

डेमोक्रॅटीक पक्षाने तर भारतीय- अमेरिकन उमेदवार कमला हॅरिस यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी जाहीर करत एक पाऊल पुढे टाकले आहे. बायडन यांनी हिंदू समुदायावर होणारे अन्याय आणि भेदभावाच्या समस्या सोडवणार असल्याचे आश्वासन दिले आहे. जो बिडेन आणि कमला हॅरिस यांनी गेल्या आठवड्यात भारतीयांना गणेशोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. ‘हा उत्सव साजरा करणार्‍यांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होवो,’ अशी सदिच्छा बिडेन यांनी दिली होती. त्यांच्या प्रचार मोहिमेतही वारंवार भारतीयांच्या योगदानाचे कौतुक केले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराचे काम पाहत असलेल्या व्यवस्थापकांनी एका व्हिडिओच्या स्वरुपात आपली पहिली जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्या अहमदाबादेतील ऐतिहासिक भाषणांतील काही मुद्द्यांचा समावेश आहे. प्रचार मोहिमेचे नेतृत्व करणार्‍या डोनाल्ड ट्रम्प ज्यूनिअर यांचे भारतीय-अमेरिकन समुदायाच्या लोकांशी चांगले संबंध आहेत. याखेरीज सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना ‘उल्लू’ असे संबोधल्यामुळे हा व्हिडिओ चर्चेत आला आहे. राजकीय विश्लेषक असणार्‍या टोमी लाहरेन यांनी भारतीय वंशाच्या समुदायाचे आभार मानण्यासाठी व्हिडिओ तयार केला. यामध्ये त्यांनी ट्रम्प यांनी अमेरिकेला महान करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. या दरम्यान लाहरेन यांनी हिंदीत राष्ट्रपती ट्रम्प हे ‘उल्लू’ सारखी बुद्धीमत्ता असल्याचे म्हटले. हिंदीत बोलून भारतीय वंशाच्या मतदारांना आकर्षित करण्याचा टोमींचा प्रयत्न होता. मात्र, हा प्रयत्न चांगलाच फसला. यातील विरोधाभासाचा व गंमतीचा मुद्दा वगळला तर भारतीयांच्या मताला प्रचंड महत्व असल्याचे अधोरेखीत होते. २०१६ च्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच्या प्रचारादरम्यान ‘अबकी बार ट्रम्प सरकार, आय लव्ह हिंदू, आय लव्ह मोदी’ यासारख्या घोषणा देत भारतीयांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. निवडून आल्यावरही त्यांनी भारतीयवंशीयांना स्वतःच्या प्रशासनात महत्त्वाची जबाबदारी दिली होती. यंदा तर दोन्ही बाजूंनी हिंदूच्या मतांना महत्व दिले आहे, हा योगायोग नाही. कारण अमेरिकेच्या प्रगतीत भारतीयांचे योगदान अनन्य आहे. अमेरिकेत पक्षनिधी देण्यात भारतीय प्रथम क्रमांकावर आहेत. हॉटेल उद्योग, माहिती तंत्रज्ञान उद्योग, संशोधनाच्या क्षेत्रासह सगळीकडे भारतीयांचा दबदबा आहे. 

सर्व भारतियांसाठी मोठ्या अभिमानाची बाब

आजमितीला अमेरिकेतील डॉक्टरांपैकी सुमारे ३८ टक्के डॉक्टर्स भारतीय आहेत. नासामध्ये ३६ टक्के कर्मचारी भारतीय आहेत. विविध शैक्षणिक, संशोधन संस्थांमधे १२ टक्के शास्त्रज्ञ भारतीय आहेत. सिलिकॉन व्हॅलीमधे तर भारतीयांचे योगदान डोळे दिपवून टाकणारे आहे. मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, गुगल, इंटेलसारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांमधे सरासरी ४० टक्के कर्मचारी भारतीय आहेत. अनेक भारतीयांनी सिलीकॉन व्हॅलीमधे स्वत:च्या कंपन्या सुरू करून त्या यशस्वी करून दाखवल्या आहेत. अमेरिकेत शिकत असलेल्या एकूण परदेशातील विद्यार्थ्यांपैकी एकट्या भारताचे तब्बल १८ टक्के विद्यार्थी आहेत. गेल्या २० वर्षांत राष्ट्राध्यक्ष हा डेमोक्रॅटिक पक्षाचा असो किंवा रिपब्लिक पक्षाचा असो, भारत-अमेरिका संबंध वृद्धिंगत होत आहेत. मोदींच्या पहिल्या कालखंडात भारताला ‘स्ट्रॅटेजिक ट्रेड ऑथोरायझेशन-दोन’मधून एकमध्ये स्थान मिळाले. तसेच, ‘मोस्ट फेवर्ड डिफेन्स पार्टनर’ म्हणून दर्जा मिळाला. तसेच, ‘नॉननॅटो अलाय’चा दर्जा देण्यात आला. भारताबरोबर संवेदनशील संरक्षण साधन सामग्रीच्या उत्पादन तंत्रज्ञानाचे हस्तांतर करण्याचा निर्णय झाला. हे सर्व भारताचे वाढते महत्त्व अधोरेखित करते. अमेरिकेत भारतियांच्या वाढत्या प्रभावामुळेच रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या दोन्ही प्रमुख पक्षांनी अमेरिकेतील हिंदुच्या अडचणींवर दोन्ही पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे. भारतीयांच्या मतशक्तीची जाणीव दोन्ही पक्षांना असल्याने त्यांनी प्रचार मोहिम आखली आहे. भारतीयांचा आपल्यालाच पाठिंबा असल्याचा दावा दोन्ही पक्ष करत असून यासाठी त्यांनी विविध गटांशी हातमिळवणीही केली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रथमच हिंदू मतांसाठी करण्यात आलेली अशी आघाडी, ही सर्व भारतियांसाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे.

Post a Comment

Designed By Blogger