‘उडता पंजाब’च्या दिशेने...

अभिनेता सुशांतसिंह राजपूतचे आत्महत्या प्रकरण आता ‘व्हाया’ कंगना वादावरुन मुंबई विशेषत: बॉलीवूडच्या ड्रग्ज कनेक्शनच्या जवळ येवून ठेपले आहे. सुशांतला त्याची मैत्रीण रिया नकळत अमली पदार्थ देत होती, असे चौकशीत समोर आल्यानंतर पुन्हा एकदा बॉलीवूड आणि मद्यपान, अमली पदार्थांचा अंमल, त्यातून होणारे नुकसान यावर चर्चा सुरू झाली आहे. यातच कंगना राणावतने पुन्हा एकदा बड्या कलाकारांच्या चेहर्‍यावरचे बुरखे फाडायला सुरुवात केली आहे. यात अनेक दिग्गज सेलिबे्रटींची नावे समोर येत असल्याने आख्खे बॉलीवूड हादरले आहे. गेल्या पाच वर्षातील काही घटना-घडामोडींवर  नजर टाकली तर हेच लक्षात येते की, मुंबईमध्ये अमली पदार्थाची विक्री, खरेदी आणि सेवन यास बंदी असूनही राजरोसपणे याचा गोरख धंदा सुरु आहे. अमली पदार्थांचा विळखा फक्त महाविद्यालयीन तरुणांभोवतीच नाही, तर तो संपूर्ण समाजाला पोखरतो आहे. दिवसेंदिवस यातील आरोपींची कार्यपद्धती बदलत चालली असल्याने यांची पाळेमुळे शोधून त्यांचा नायनाट करणे, हे आव्हान उभे राहिले आहे. 



बॉलीवूडचे ड्रग्ज कनेक्शन

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि एका ड्रग व्यापार्‍याचा संपर्क, कंगना राणावतने एका बड्या स्टारच्या अमली पदार्थ सेवनाविषयी वक्तव्य करणे, यात अनेक बड्या नावांचा समावेश होणे, या सर्वांतून बॉलिवूड कलाकारांविषयी सर्वसामान्यांच्या मनातील प्रतिमांना तडा जात आहे. बॉलिवूड म्हणजे मनोरंजन करणारे माध्यम आहे. अनेक कलाकार पडद्यावर नायक, नायिकांची भूमिका साकारतात तेव्हा तरुणांसाठी आदर्श ठरतात, त्यांचा प्रभाव पडतो. मात्र पडद्यावरील ती भूमिका वगळता प्रत्यक्ष आयुष्यात मात्र या कलाकारांचे व्यक्तिमत्त्व वेगळेच असते. पडद्यावर हिरो असणार्‍या लाडक्या कलाकाराची सत्य प्रतिमा कित्येकदा वेगळीच असते त्यांच्या सवयी कलंक वाटणार्‍या असतात. आज सिनेइंडस्ट्रीतील अनेक कलाकार हे दारू, अमली पदार्थ, गांजा, कोकेन अशा अनेक अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे दिसते. तसे पाहता बॉलीवूड व अमली पदार्थांचे नाते नवे नाही. संजय दत्त, ममता कुलकर्णी, बॉबी देओल, प्रतीक बब्बर, रणबीर कपूर, फरदीन खान, पूजा भट्ट, यांच्यासह अनेक कलाकारांच्या दारू आणि अमली पदार्थांच्या सवयी काही लपून राहिलेल्या नाहीत. यापैकी अनेकांनी आपल्या नशेच्या सवयी सोडल्याचे उघडपणे मान्य देखील केले आहे. बॉलीवूडचा प्रसिध्द दिग्दर्शक करण जोहरने ऑगस्ट २०१९ मध्ये दिलेल्या एका पार्टीत अनेक स्टार कलाकारांनी अमली पदार्थांचे सेवन केले होते, अशी तक्रार अकाली दलाचे खासदार सिरसा यांनी दाखल केली होती. यावर बॉलीवूडमध्ये प्रचंड गदारोळ झाला होता. कारण यापार्टीत दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, विकी कौशल, अर्जुन कपूर, मलाईका अरोरा, वरुण धवन, शाहिद कपूर, झोया अख्तर यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध चेहर्‍यांनी हजेरी लावली होती. या अशा स्टार्सचे अनुकरण करणार्‍यांची संख्या कमी नाही. 

देशातील सुमारे २५ टक्के तरुण अमली पदार्थांच्या आहारी

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून समोर आलेला ड्रग्सचा मुद्दा सोमवारी संसदेत देखील समोर आला. भोजपुरी सुपरस्टार व भाजपाचे खासदार रवी किशन यांनी लोकसभेत ड्रग तस्करीचा मुद्दा मांडला आणि केंद्र सरकारकडे मोठ्या पातळीवरील तपासाची मागणी केली. यावरुन याची पाळेमुळे किती खोलवर गेली आहेत आणि ते किती गंभीर आहे, याची प्रचिती येते. आपल्या देशातील सुमारे २५ टक्के तरुण अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे एका सर्वेक्षणात आढळले होते. अमली पदार्थांपासून आपण खरेच तरुण पिढी आणि समाजाला वाचवू शकणार का, असा प्रश्न उद्विग्न करतो आहे. मुंबईसह राज्यभरात अमली पदार्थ सेवनाचे प्रकार वाढले असून यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. शाळा महाविद्यालयांमधून तंबाखू, सिगारेट, दारू, चरस आणि गांजा यांचा वापर सर्रास होत नसला तरी गेल्या १० वर्षांत वाढताना दिसत आहे. ब्राऊन शुगर, गांजा, अफू, भुलीचे इंजेक्शन, गुंगी आणि मेंदूला झिंग आणणार्‍या गोळ्या, तसेच सिगारेट, दारू, तंबाखू, गुटखा यांच्या आहारी जाऊन आपले आणि आपल्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे हे व्यसन आहे. अमली पदार्थांचे सेवन करणार्‍या व्यक्तीच्या विचारांमध्ये बदल जाणवू लागतो, तेव्हा हे व्यसन डोके वर काढते, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आता बहुतांश ठिकाणी मेडेड्रोन या उत्तेजक औषधाचाही नशेसाठी मोठ्या प्रामाणात वापर केला जातो. एम कॅट नावाने ओळखले जाणारे हे उत्तेजक औषध पावडर किंवा गोळ्यांच्या स्वरूपात वापरले जाते. याच्या सेवनाने शारीरिक तसेच मानसिक दुष्परिणाम होतात. हे व्यसन इतके घातक आहे की यासाठी मनोविकारतज्ज्ञांची मदत घ्यावी लागते किंवा प्रसंगी संबंधिताची रवानगी मनोरुग्णांच्या इस्पितळात करावी लागते. 

मध्यमवर्गीयांच्या घरात व्यसनाचा राक्षस

नव्वदच्या दशकात श्रीमंतांचे किंवा पैसेवाल्यांचे व्यसन म्हणून याकडे पाहिले जायचे, पण आता मध्यमवर्गीयांच्या घरात हा व्यसनाचा राक्षस शिरू पाहतो आहे. कामाचा ताण, काम नाही म्हणून येणारे वैफल्य, प्रेम आणि शारीरिक गरजा पूर्ण न होण्याचे दु:ख अशा अनेक परिस्थिती, भावना ज्यामुळे लोक नशेकडे आकृष्ट होतात. पण एकदा नशेचा विळखा पडला की कितीही झटापट केली तरी तो विळखा सुटत नाही आणि दु:खाशिवाय मग काहीच हाती उरत नाही. महाराष्ट्राला अंमली पदार्थांचा विळखा पडू देणार नाही, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य विधीमंडळाच्या गत अधिवेशनादरम्यान विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली होती. अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी राज्य सरकार कठोर पावले उचलत आहे असे त्यांनी सांगितले होते.  मुंबईच्या धर्तीवर ठाणे, पुणे व नागपूर आयुक्तालयाच्या ठिकाणी व औरंगाबाद, नाशिक शहर, रायगड या जिल्ह्याकरिता स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन केले आहेत. गुन्ह्यांचे प्रकरण दिवाणी ऐवजी सत्र न्यायालयात चालविणे, दोन वर्षांची शिक्षा १० वर्षे तर १० वर्षांची २० वर्षे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र अजूनही अंमली पदार्थांचा हा गोरखधंदा थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे शासनाला यापुढील काळात अंमली पदार्थ विरोधी मोहिम अधिक कडक करावी लागणार आहे. अन्यथा महाराष्ट्राची वाटचाल ‘उडता पंजाब’कडे सुरु होण्यास वेळ लागणार नाही.

Post a Comment

Designed By Blogger