काँग्रेसमध्ये ‘तरुण तुर्क आणि म्हातारे अर्क’

काँग्रेसचे ‘युवराज’ राहुल गांधी यांचे निकटवर्तिय म्हणून ओळखले जाणारे तसेच काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी पक्षाला रामराम केला. सव्वा वर्षांपूर्वी अटीतटीच्या लढतीत भाजपचा पराभव करून सत्ता स्थापन केलेल्या मध्य प्रदेशमध्ये सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेले ज्योतिरादित्य शिंदे गेल्या अनेक महिन्यांपासून अस्वस्थ होते. अखेर आपले वडिल माधवराव शिंदे यांच्या जयंतीच्या दिवशीच त्यांनी वेगळी वाट चोखाळण्याचा निर्णय घेतला. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे पक्षांतर्गत अस्वस्थतता अधोरेखित झाली आहे तसेच काँग्रेसच्या कार्यसंस्कृतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीत झालेल्या काँग्रेसच्या पराभवानंतर अनेक राज्यांमध्ये नेतृत्वाची पोकळी तयार झाली आहे. जवळपास अर्धा डझन केंद्रीय मंत्री, तीन माजी मुख्यमंत्री, चार विद्यमान आणि अन्य माजी प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यात आता ज्योतिरादित्य शिंदेची भर पडली आहे.


ज्योतिरादित्य शिंदे यांची घरवापसी!

मंगळवारी संपूर्ण देश धुलवड साजरा करत असताना मध्यप्रदेशात वेगळाच शिमगा सुरु होता. ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना समर्थ देणार्‍या काँग्रेसच्या १९ आमदारांनी राजीनामे दिले, यामध्ये कमलनाथ सरकारमधील सहा मंत्र्यांचा समावेश आहे. यामुळे आता मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार कोसळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंधरा महिन्यांपूर्वी कमलनाथ मुख्यमंत्री बनल्यापासून काँग्रेस पक्षात घुसमट होत असलेल्या ज्योतिरादित्य यांची नाराजी वाढत गेली होती. राज्यसभेसाठी पहिल्या पसंतीचा उमेदवार म्हणून आपल्या नावाला सहमती द्यावी, असा ज्योतिरादित्य यांचा आग्रह होता. मात्र, कमलनाथ यांनी दिग्विजय सिंह यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अपयशी ठरल्याने अखेर काँग्रेस सोडण्याचा टोकाचा निर्णय घेतला असण्याची शक्यता अधिक आहे. कारण मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर ज्योतिरादित्य यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केला होता. मात्र, पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्रिपदी कमलनाथ यांची निवड केली. त्यानंतर ज्योतिरादित्य यांना उपमुख्यमंत्रीपद किंवा प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले नाही. शिवाय, लोकसभा निवडणुकीत कमलनाथ आणि दिग्विजय सिंह गटाने एकत्रितपणे आपला पराभव केल्याची भावना ज्योतिरादित्य यांच्या मनात होती. कदाचित पक्षांतर्गत वाढत चाललेल्या घुसमटीला कंटाळून ज्योतिरादित्यांनी हा निर्णय घेत भाजपाची वाट धरली असली तरी एकाप्रकारे ती त्यांची घरवापसीच आहे. कारण ग्वाल्हेर घराणे आणि जनसंघचे जूने नाते आहे. 

 ग्वाल्हेर घराणे आणि जनसंघचे जूने नाते

ग्वाल्हेरच्या राजमाता विजयाराजे शिंदे यांनी काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. १९५७ मध्ये त्या गुणा मतदारसंघातून निवडून आल्या. पण १० वर्षांतच १९६७ साली त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्या या बंडामुळे काँग्रेसचे तत्कालीन सरकार कोसळले होते. त्यानंतर विजयाराजे यांच्या कार्यकाळात ग्वाल्हेर आणि परिसरात जनसंघाची पाळंमुळे रुजली. विजयाराजेंचे पुत्र माधवराव यांनीही जनसंघातून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. केवळ २६ वर्षांचे असताना माधवराव शिंदे ते खासदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी खुद्द अटल बिहारी वाजपेयी यांनी १०१ रुपयांची पावती फाडून माधवराव शिंदे यांना जनसंघाचा सदस्य बनवले होते. परंतु, दीर्घकाळ ते जनसंघासोबत राहीले नाही. अल्पवधीतच त्यांनी काँग्रेसचा हात धरला. १९८० मध्ये माधवराव शिंदे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढली आणि ही निवडणूक जिंकून त्यांनी केंद्रात मंत्रीपदही मिळवले. माधवराव हे राजीव गांधी यांचे सर्वात जवळच्या नेत्यांपैंकी एक मानले जात होते. २००१ साली माधवराव शिंदे यांचे एका विमान अपघातात निधन झाले. ज्योतिरादित्य शिंदे हे माधवराव शिंदेंच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात आले आणि आपल्या वडिलांचा राजकीय वारसा यशस्वीपणे पुढेही नेला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्याचा पराभव झाला किंवा ठरवून करण्यात आला. काँग्रेसमध्ये ‘तरुण तुर्क आणि म्हातारे अर्क’ अशी परिस्थिती असल्यानेपक्षातील ज्येष्ठ आणि तरुण नेत्यांमधील सत्तासंघर्ष पुन्हा अधोरेखित झाला आहे. 

काँग्रेसमधील तरुण नेत्यांच्या मनात असंतोषाची आग

काँग्रेसमध्ये घुसमट होत असलेले ज्योतिरादित्य शिंदे एकटे नाहीत. याआधी विजय बहुगुणा (उत्तराखंड), अजित जोगी (छत्तीसगड), रिटा बहुगुणा जोशी (उत्तर प्रदेश), शंकरसिंह वाघेला (गुजरात), हिमंता बिस्वा सरमा (आसाम), पेमा खांडू (अरुणाचल प्रदेश मुख्यमंत्री) अशी अनेक नावे आहेत. ज्यांनी काँग्रेसचा हात सोडला. महत्वाचे म्हणजे हे त्या त्या राज्यातील प्रमुख नेते होते. ही पडझड येथेच थांबेल, याची शास्वती कोणीही देवू शकत नाही. काँग्रेसमधील अनेक तरुण नेत्यांच्या मनातही अशीच असंतोषाची आग धगधगत आहे. ते सुद्धा पक्ष नेतृत्वावर नाराज असून बाहेर संधीच्या शोधत आहेत. मागच्या सहा वर्षात झालेल्या पराभवानंतरही काँग्रेसच्या कार्यसंस्कृतीत काहीही फरक पडलेला नाही. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना असून, तरुण नेते आता थांबायला तयार नाहीत. यामध्ये सर्वाधिक चर्चा राजस्थानच्या उपमुख्यमंत्र्यांची म्हणजेच सचिन पायलट यांची सुरु आहे. ज्योतिरादित्य शिंदे पाठोपाठ सचिन पायलटही काँग्रेसला रामराम ठोकून भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी जोरदार हवा तयार झाली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसने विजय मिळवल्यानंतर या राज्यांची धुरा तरुण नेत्यांच्या हाती देण्यात येईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाने दोन्ही राज्यांमधील मुख्यमंत्रीपदाची माळ गांधी कुटुंबाशी एकनिष्ठ असणार्‍या नेत्यांच्या गळ्यात घातली. त्यामुळेच हे मध्य प्रदेशमधील ज्योतिरादित्य शिंदे आणि राजस्थानमध्ये सचिन पायलट नाराज असल्याचे म्हटले जाते. मध्यप्रदेशातील या भूकंपामुळे कोणाचा फायदा होतो व कोणाचे नुकसान? याचे उत्तर येत्या काळात मिळेलच!

Post a Comment

Designed By Blogger