अमेरिका-ईराण वादात भारताची होरपळ!

अमेरिकेने बगदादमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे लष्कराचे सर्वोच्च अधिकारी कासिम सुलेमानी मारले गेल्यानंतर इराण आणि अमेरिकेदरम्यान युध्दाचा भडका उडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पश्चिम आशियातील तणावामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जगभरातील प्रमुख शेअर बाजारांमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. भारतीय शेअर बाजाराला याचा मोठा फटका बसला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७८८ अंकांनी कोसळून ४०,६७६ अंकांवर पोहोचला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २३३ अंकांनी कोसळून ११,९९३ अंकांवर बंद झाला. यामुळे गुंतवणूकदारांच्या तीन लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. दुसरीकडे देशांतर्गत बाजारांमध्ये कच्च्या तेलाच्या दरात ३.५३ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली परिणामी पेट्रोल व डिझेलच्या किंमती वाढण्याचे सत्र सुरुच राहिले. परिणामी डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण होवून सोमवारी रुपयाने ७२चा स्तर ओलांडला. अमेरिका व ईराणमधील युध्दज्वराचे पडसाद जगभरात उमटत असले तरी युरोपीन राष्ट्रांपेक्षा सर्वात जास्त फटका भारताला बसण्याची चिन्हे आहेत.


अमेरिकेची नजर तेलसाठ्यांवर 

नोटाबंदीनंतर भारताची अर्थव्यवस्था अनिश्‍चिततेच्या हिंदोळ्यांवर हेलकावे खात असून देशांतर्गत बेरोजगारीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. अशा कठीण समयीदेखील भारतीय अर्थव्यवस्थेला ‘पाच ट्रिलीयन’चे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण दाखवित आहेत. मात्र हे कसे होईल, याचे उत्तर कुणाकडेही नाही. देशांतर्गत संकटांची मालिका काय कमी होती म्हणून, तिकडे अमेरिका व इराणमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेला संपुर्ण जगावर स्वत:चा दबदबा निर्माण करण्याची अतिमहत्त्वकांक्षा आहे, ही बाब आता नवी राहिलेली नाही. या महत्त्वकांक्षेमुळे अमेरिकेची अनेक देशांच्या विविध धोरणांमध्ये लुडबुड सुरु असते. याचे परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर अधूनमधून उमटत असतात. गेल्या काही वर्षांचा इतीहास पाहिल्यास लक्षात येते की, अमेरिकेच्या या घातकी धोरणामुळे आखाती देशांसह मध्य-पुर्व, आफ्रिका व पश्‍चिम आशियायी देशांमध्ये तणाव निर्माण होत असतो. आता अमेरिका व इराणमधील वादाचे मुळ अशाच एका आसूरी महत्त्वकांक्षेमध्ये दडले आहे. अमेरिकेने २००३मध्ये इराकमध्ये घुसखोरी केली. त्याआधी इराकचे तत्कालीन अध्यक्ष सद्दाम हुसेन यांच्याशी मैत्री करत इराणच्या विरोधात डावपेच रचले व काम झाल्यानंतर रासायनिक शस्त्रांचे कारण पुढे करत इराकमध्ये अमेरिकन सैन्य घुसवून सद्दाम हुसेनचा खात्मा केला. अमेरिकेची नजर तेथील तेलसाठ्यांवर आहे, हे देखील उघड सत्य आहे. या दोन देशांमधील वादात सर्वाधिक फटका भारताला बसण्याची शक्यता आहे. याची झलक गेल्या ४८ तासात बघायला मिळाली आहेच. 

अनेक देशांना फटका 

अमेरिका-इराणमधील तणावपूर्ण वातावरणाने आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमती प्रति पिंप ७१ डॉलरनजीक गेल्या असून भारतातही परिणामी राजधानीत पेट्रोल व डिझेलच्या किंमती लिटरमागे दिवसात १७ पैशांपर्यंत वाढल्या. तर सार्वजनिक तेल व वायू कंपन्यांचे समभागमूल्य ७ टक्क्यांपर्यंत गडगडले, अमेरिकी चलन भक्कम होत येथील परकीय चलन विनिमय मंचावर स्थानिक चलन सोमवारी ७२ च्या वेशीवर पोहोचले, खनिज तेल, रुपयासह मौल्यवान धातूच्या दरातही प्रचंड घसरण नोंदली गेली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सप्ताहारंभीच्या एकाच सत्रात जवळपास ८०० अंश आपटीने गेल्या सहा महिन्यातील सुमार आपटी नोंदविणारा निर्देशांक ठरला. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम होण्याच्या धास्तीने गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर समभागविक्रीचा सपाटा लावला. परिणामी एकट्या मुंबई शेअर बाजारातील सलग दोन दिवसांच्या घसरणीने येथील गुंतवणूकदारांच्या तब्बल ३ लाख कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेचा चुराडा झाला. जपानच्या ‘निक्केई’मध्ये जवळपास २ टक्क्यांची घसरण झाली. चीनचा शेअर बाजारही घसरणीसह उघडला. ऑस्ट्रेलियाच्याही शेअर बाजारात घसरण नोंदविण्यात आली. एकंदरतीत अनेक देशांना याचा फटका बसला आहे. भविष्यात दोन्ही देशांदरम्यान युध्दाचा भडका उडालाच तर जपान, युरोपीन राष्ट्रांपेक्षा सर्वात जास्त फटका भारताला बसू शकतो कारण, दोन्ही देशातल्या वादामुळे भारताची इराणला होणारी निर्यात ठप्प होईल. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराणने फक्त भारताकडूनच माल घेण्याचे मार्ग खुले ठेवले आहेत. 

देशाच्या आयात-निर्यात धोरणावर परिणाम

इराणसाठी भारत मोठी बाजारपेठ आहे. इराणकडून भारताला कच्चे तेल, खते, रसायने आणि खतांच्या टंचाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. इराण भारताकडून जवळपास ९६,००० कोटींची आयात करतो. त्यात प्रामुख्याने मसाल्याचे पदार्थ, तृणधान्य, चहा, कॉफी, बासमती तांदूळ, सेंद्रिय रसायने खरेदी करतो. निर्यात आणि आयात यातली मोठी तफावत भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीमुळे निर्माण होते. दोन्ही देशांकडून व्यापारी करार पाळण्यात येतो. परिस्थिती चिघळल्यास देशाच्या आयात-निर्यात धोरणावर परिणाम होईल अशी भीती ‘फेडरेशन ऑफ एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन’ (एफआयईओ) ने वर्तविली आहे. जगातील एकूण तेल उत्पादनापैकी निम्मे तेल उत्पादन पश्चिम आशियामध्ये होते. इराणकडून तेल आयात थांबवल्यामुळे आपण इराक आणि सौदी अरेबियाकडून मोठया प्रमाणावर तेल आयात करतो. कासिम सुलेमानीला इराकच्या भूमिवर संपवण्यात आले आहे. उद्या युद्ध इराकच्या भूमिवर लढले गेल्यास भारताला केल्या जाणार्‍या तेल आयातीवर निश्चित परिणाम होईल. त्याचा मोठा आर्थिक फटका भारताला बसू शकतो. सध्यस्थितीत इराक, सौदी अरेबिया, इराण आणि संयुक्त अरब अमिरातीकडून भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा केला जात असला तरी हे चारही देश आखातातील संघर्षांच्या परिणाम क्षेत्रात आहेत. त्यामुळे आखात सोडून अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोकडून कच्चे तेल आयात करण्याचा विचार करावा लागणार आहे. अमेरिका व इराणमधील युध्द भारताला परवडणारे नाही शिवाय या युध्दा कुणाच्या बाजूने उभे राहायचे? हा देखील मोठ्या डोकंदुखीचा प्रश्‍न ठरणार आहे, म्हणून युध्दच होवू नये यासाठी भारताने प्रयत्न सुरु केले आहेत. यात मोदी सरकारच्या कुटनितीला यश येवो, हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना! 

Post a Comment

Designed By Blogger