भारत देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे, असे वारंवार बोलले जाते याचे प्रमुख कारण म्हणजे भारतातील युवाशक्ती! आज जगाच्या पाठीवर भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक असल्याने भारतातला तरुणांचा देश देखील म्हटले जाते. मात्र सर्वच क्षेत्रात निर्माण झालेल्या जीवघेण्या स्पर्धेमुळे किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात काम करताना येणारा ताण, जेवणाबरोबरच झोपण्याच्या अनियमित वेळा, आधुनिक जीवनशैली यामुळे सातपैकी एक भारतीय व्यक्ती मानसिक व्याधीने ग्रस्त असून याचे प्रमाण तब्बल १९.७ टक्के म्हणजेच २० कोटी लोक इतके असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या मनोविकारांमध्ये नैराश्य, चिंता, स्किझोफ्रेनिया, बायपोलार डिसऑर्डर, बैद्धिक विकृती, आचरणासंबंधी विकार आणि ऑटिझम यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘लॅन्सेट सायकॅट्री’ नावाच्या नामांकित जर्नलमध्ये ही माहिती प्रसिद्ध झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २०२२ पर्यंत हृदयरोगानंतर नैराश्य किंवा डिप्रेशन हा मनोविकार दुसर्या क्रमांकावर असेल. वाढत्या ताणतणावांमुळेच नैराश्यासारखे मनोविकार आगामी काळात वाढत जाणार आहेत. त्यामुळे यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ येवून ठेपलेली आहे.
जगभरात ४५ कोटींपेक्षाही जास्त लोक मनोरुग्ण
गेल्या काही महिन्यांपूर्वी ब्रिटिश जर्नल ऑफ सायकिऍट्रीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरात दरवर्षी ५० लाख लोकं मन:स्थितीतील बिघाड आणि चिंताग्रस्त झाल्याने मृत्युमूखी पडतात. सध्या जगभरात ४५ कोटींपेक्षाही जास्त लोक मनोरुग्ण ठरले आहेत. तर पाच कोटी भारतीय अशा मानसिक आजारासोबत लढा देत असल्याचे म्हटले होते. आता ‘लॅन्सेट सायकॅट्री’मध्ये प्रसिध्द झालेल्या ‘इंडिया स्टेट लेव्हल डिसीज बर्डन इनिशिएटीव्ह’ संशोधनानुसार परिस्थिती अजूनच गंभीर झाल्याने स्पष्ट झाले आहे. भारतात सन १९९० पासून ते सन २०१७ पर्यंत म्हणजेच २७ वर्षांच्यां काळातील आकडेवारीवर आधारित असलेल्या संशोधनानुसार, मानसिक आजार असलेले लोक देशाच्या एकूण लोकसंख्येच्या १४.३ टक्के इतके आहेत. यांपैकी ४.६ कोटी लोकांना नैराश्याने (डिप्रेशन) ग्रासले आहे. तर ४.५ कोटी लोक एग्झायटीने त्रस्त होते. आज आपण शारीरिक आरोग्याबाबत जागरुक असणारे आपण मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो किंवा धावपळीच्या जीवशैलीमुळे त्याकडे दुर्लक्ष होते. शारीरिक आरोग्याचे महत्त्व आपण जाणतो, पण मानसिक आरोग्याबाबत आपण अनभिज्ञ असतो ही वस्तुस्थिती आहे. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. शारीरिक व मानसिक आरोग्याचा एकत्रित विचार करणे ही काळाची गरज आहे. बदलत्या काळानुसार मनोविकारांची कारणेही बदलली आहेत. पूर्वी केवळ जीवनावश्यक बाबींसाठी येणारे टेन्शन आता कोणत्याही कारणांमुळे येण्याचे प्रमाण वाढले आहे. ही समस्या केवळ मोठ्या शहरांमध्ये आहे असे नाही तर ग्रामीण भागातही मनोविकारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
विभक्त कुटुंब पद्धती
मानसिक विकार वाढण्याची अनेक कारणे आहेत. माणसाचे शारीरिक आरोग्य बहुतांशी मनाच्या आरोग्यावर अवलंबून असते, असे मानसशास्त्र सांगते. मन निरोगी नसेल तर शरीरही निरोगी राहू शकत नाही. लहानमुले व तरुणाईमध्ये मनोविकाराचे मुख्य कारण म्हणजे मोबाईल फोन व त्याद्वारे सोशल मीडियाचा अतिवापर असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. ही मुले २४ तासांपैकी ६ ते ७ पाच तास मोबाईलचा वापर करत असल्याने त्यांचा मुख्य जगाशी संबंध तुटतो व ते एका आभासी जगामध्ये प्रवेश करतात. या आभासी जगामध्ये सर्वकाही आलबेल चालू असते व अचानक या आभासी जगामध्ये माणसाच्या भावना अथवा अहंगार दुखावला गेल्यास ते मनोरुग्ण ठरण्याची दाट शक्यता असते. भारतात १५ ते २९ वयोगटातील लोकांमध्ये आत्महत्या करण्याचा एक मोठ कारण आहे. ते देखील याच समस्येशी निगडीत आहे. नैराश्यग्रस्त लोक चिंतित, अशांत, सुस्त आणि आळशी राहू लागतात. कोणत्याही गोष्टीत ते एकाग्र होऊ शकत नाहीत, अवेळी झोप, जागणे, स्वतःला नुकसान पोहोचविण्यासोबत आत्महत्येबद्दल ते विचार करत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. नैराश्य आणि चिंता विकार या मानसिक आजारांचे मुख्य कारण ताण हेच असल्याचे तज्ञ सांगतात. तसेच मुलांमध्ये त्यांना घाबरवणे आणि धमकावणे या कारणांमुळे नैराश्य आणि चिंता विकार बळावत. या व्यतिरिक्त याला सामाजिक पार्श्वभूमी देखील आहे. पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती असल्याने आपल्या समस्यांबाबत कुटुंबातील लोक घरातील इतर सदस्यांशी बोलत आपले मन हलके करत असत. आता विभक्त कुटुंब पद्धतीत हे शक्य होताना दिसत नाही. परिणामी एकलकोंडा स्वभाव निर्माण होवून त्यातून मनोविकारासारखी समस्या गंभीर होत जाते. याकरीता कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांशी बोलून स्वतःची समस्या उघड केल्याने नैराश्याशी लढण्यास मदत मिळू शकते. थेरेपी देखील घेतली जाऊ शकते. अँटीडिप्रेसेंट औषधांचा वापर गंभीर नैराश्याच्या स्थितीतच केला जावा.
ताण-तणाव कमी कसे करावे त्याचे व्यवस्थापन हवे
मानसिक आरोग्य हा राष्ट्रीय प्रश्न होवू पाहत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते भारत सरकार यावर केवळ एक टक्का रक्कम खर्च करते. ही तरतूद किमान १० टक्के होण्याची गरज आहे. हेल्थ केअर इंडियाच्या मते देशात या विषयातील केवळ पाच हजार तज्ज्ञ आहेत. इंडियन सायकिअॅट्रिस्ट्स सोसायटीनुसार देशातील सुमारे दोन कोटी मानसिक आजारी लोकांसाठी केवळ ३५०० मानसोपचारतज्ज्ञ आणि १५०० परिचारिका उपलब्ध आहेत. अमेरिकेसारख्या देशात ही संख्या ४५ हजारपेक्षा अधिक आहे. बहुतांशी मनोविकार योग्य वेळी नियमितपणे उपचार घेतल्यास बरे होऊ शकतात. मात्र उपचारांबाबत अज्ञानामुळे रुग्ण मनोविकारांवर उपचार घेण्यासाठी तत्परता दाखवत नाहीत. यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे. याकडे शासकीय पातळीवरुन गांभीर्यांने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपणे हा आजार टाळण्याचा प्रतिबंधात्मक उपाय आहे. ताण-तणाव कमी कसे करावे किंवा त्याचे व्यवस्थापन कसे करावे हे शिकायला हवे. याचा समावेश शालेय पातळीवरील अभ्यासक्रमात समाविष्ट केल्यास त्याचा मोठा फायदा होवू शकतो. यासाठी शिक्षक, पालक व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. म्हणतात ना, ‘प्रिव्हेन्शन इज ऑल्वेज बेटर दॅन क्यूअर’...जी पिढी तणावग्रस्त असेल ती भारताला महासत्ता कशी घडवेल?
Post a Comment