‘ना संघर्ष न तकलीफ तो क्या मजा है जीने में, बडे बडे तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने मे्ं’ असे एका मोठ्या शायरने म्हणले होते. त्यांनी हे कोणासाठी लिहीले याबद्दल सांगणे थोडसे कठिण असले तरी सध्यस्थितीत हे वाक्य भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोला तंतोतंत लागू पडत आहे. सप्टेंबर महिन्यात चांद्रयान-२ मधील विक्रम लँडरचे चंद्रावर हार्ड लँडिंग झाले होते. या अपयशामुळे इस्रोचे वैज्ञानिक निराश झाले होते. इस्त्रो प्रमुख के.सिवन यांचा भावनांचा बांध तुटून त्यांना रडू कोसळल्याचे अवघ्या देशाने बघितल्यानंतर अनेकांचे डोळ पाणावले होते. मात्र त्या अपयशाला मागे सोडत इस्रोने चांद्रयान-३ मोहिमेच्या माध्यमातून पुन्हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले आहे. इतकेच नव्हे तर, इस्रोने चांद्रयान-३ मोहिमेवर काम देखील सुरु केले असून या नोव्हेंबर २०२० पर्यंत पुन्हा एकदा चंद्रावर लँडिंग करण्यात येणार आहे.
पुन्हा एकदा चंद्रावर लँडिंगचा प्रयत्न
२२ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून झेपावलेले चांद्रयान-२ अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत चंद्राजवळ पोहोचले. परंतु चंद्राच्या केवळ २.१ किमी दूर असतांना हार्ड लँण्डिंग झाल्यामुळे ७ सप्टेंबर रोजी ‘विक्रम’ लँडरसोबत इस्रोशी संपर्क तुटला. इस्त्रोची ही सर्वात अवघड आणि महत्वाकांक्षी मोहिम होती. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी इस्रोचे संशोधक १० वर्षांपासून अथक प्रयत्न करत होते. जर ही मोहिम १०० टक्के यशस्वी झाली असती तर अमेरिका, रशिया आणि चीन नंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत चौथा देश ठरला असता. आंतरराष्ट्रीय पातळीवरील अवकाश स्पर्धेचा विचार केल्यास इस्त्रोचा डंका अवकाशात आधीच वाजत असल्याने चांद्रयान-२ कडे संपुर्ण जगाचे लक्ष लागून होते. याचे अजून एक महत्त्चाचे कारण म्हणजे. अत्यंत कमी खर्चात ही मोहिम आखण्यात आली होती. उदाहरण द्यायचे म्हटल्यास हॉलिवूडच्या ‘अँव्हेजर्स-एंडगेम’ चित्रपटाच्या निर्मितीला तब्बल दोन हजार ४४३ कोटी रूपये लागले होते. मात्र, चांद्रयान-२ या संपूर्ण प्रकल्पावर एकूण ९७८ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. त्यामुळे चांद्रयान २ ला स्वस्त पण सर्वोत्तम असेच म्हटले गेले होते. मात्र ‘विक्रम’ लँडरच्या हार्ड लॅडिंगमुळे हे स्वप्न भंगले. यावेळी इस्रोने ट्विटरद्वारे संपूर्ण देशवासीयांचे आभार मानत, ‘तुम्हा सर्वांचे आभार. आम्ही जगभरात भारतीयांची आशा आणि स्वप्नांनी प्रेरित होऊन पुढे वाटचाल करत राहू’, असे ट्विट केले होते. या ट्विटवरून इस्रो आपल्या पुढील मिशनकडे वाटचाल करत असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. पहिल्या प्रयत्नात चंद्रावर सॉफ्ट लँडिंगमध्ये यश मिळाले नसले तरी भविष्यात पुन्हा एकदा चंद्रावर लँडिंगचा प्रयत्न करण्यात येईल, असे सिवन म्हणाले होते. त्यानंतर ‘आम्ही सुद्धा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करु शकतो, हे दाखवून देण्यासाठी इस्त्रो जीवाची बाजी लावणार आहे. त्यासाठीच्या योजनेवर जोमात काम सुरु आहे’, अशी माहिती सिवन यांनी आठवडाभरापूर्वी दिली होती.
इस्त्रोने संपूर्ण जगाला स्वत:च्या सामर्थ्याची जाणीव करुन दिली
आता तर इस्त्रोने चांद्रयान-३ची घोषणा करत १२५ भारतियांना सुखद धक्का दिला आहे. चांद्रयान-२ मोहिमेतील ऑर्बिटरचे कार्य व्यवस्थित सुरु असल्याने ही मोहिम आतापासून ५० टक्के फत्ते झाली आहे, असे मानल्यास चुकीचे ठरणार नाही. पहिल्या प्रयत्नात चंद्रावर सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आल्यानंतर या अपयशाचा अनुभव गाठिशी घेऊन आता इस्रो पुन्हा एकदा प्रयत्न करत आहे. देशातील अत्यंत महत्त्वकांक्षा मोहिमेला अपयश आल्यानंतर देखील खचून न जाता अवघ्या काही महिन्यात नव्या मोहिमेची घोषणा करणे हे काही साधे काम नाही. कारण चांद्रयान-२ ही मोहिम विविध कारणांनी महत्वाची होती. यात सर्वात मोठी बाब म्हणजे, चांद्रयान- २ मोहीम ही भविष्यातील चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या मानवी मोहिमेच्या दृष्टीने खरोखरीच, एक पुढचे पाऊल ठरणार होते. कारण, भारताच्या ‘गगनयान मिशन’ या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेचा पाया याच मोहिमेत भरला जाणार होता. २०२२ पासून भारतातील गगनयान मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार असल्याने इस्त्रोच्या वैज्ञानिकांना निश्चितपणे दडपण जाणवले असेलच! परंतू अपयशामुळे खचून न जाता पुन्हा त्याच खडतर मोहिमेच्या तयारीला लागणे, या चिकाटीस व दुर्दम्य इच्छाशक्तिस सलामच करायला हवा. चांद्रयान- २ मध्ये विक्रमचे सॉफ्ट लँडिंग न झाल्याने मोहिमेला गगनयान मोहिमेस काहीसा फटका बसेल, अशी अटकळ बांधली जात होती मात्र ती साफ चुकीचे ठरवत इस्त्रोने संपूर्ण जगाला स्वत:च्या सामर्थ्याची जाणीव करुन दिली आहे.
पुढील वर्षी नोव्हेंबर महिन्यात चांद्रयान-३ची झेप
चांद्रयान-३ मोहिमेचे काम वेगात सुरु असून लँडिंग साईट, दिशादर्शनासह १० महत्वाच्या गोष्टींकडे इस्रोने विशेष लक्ष दिले आहे. लँडर अधिक चांगल्या पद्धतीने विकसित करण्याकडे इस्रोने विशेष लक्ष दिले आहे. नव्या मिशनमध्ये लँडरचे पाय भक्कम करण्याला विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. जेणेकरुन वेगात लँडिंग झाले तरी लँडर सुस्थितीत राहिल. चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरने अपेक्षेपेक्षा जास्त वेगात लँडिंग केले. त्यामुळे लँडरचे नुकसान झाले होते. मागच्या मोहिमेतील चुका टाळून चंद्रावर यशस्वी लँडिंग करण्याचे इस्रोचे लक्ष्य आहे. चांद्रयान-२ या प्रकारच्या जटिल मोहिमेच्या पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरलेली इस्रो ही काही पहिली संस्था नाही. अगदी काही महिन्यांपुर्वी, अवकाशात उतरलेल्या इस्त्रायलच्या स्पेसआयएल या स्वयंसेवी अंतराळ गटाच्या मोहिमेत चंद्राचा लँडर - बेरेशीटचे हार्ड लँडीग झाल्याने त्याचा चक्काचूर झाला. इस्त्रायलसारखा प्रगत तंत्रज्ञानाचा देश या धक्यातून अजून कुठे सावरत असतांना भारतिय शास्त्रज्ञांनी मागचे अपयश विसरत नव्या मोहिमेची घोषणा केल्यामुळे नासासह अनेक देशांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. इ÷स्त्रोची आतापर्यंतची वाटचाल पाहता, ब्रम्हाडांतील सुपरपॉवर होण्याच्या दिशेने इस्त्रोची घोडदौड सुरु आहे. यात केवळ एका चांद्रयान - २ या मोहिमेचे अपयश ब्रेक लावू शकत नाही. पुढील वर्षी नोव्हेंबर महिन्यात इस्रोचे चांद्रयान-३ चंद्राच्या दिशेने झेप घेईल व यावेळी इस्त्रो १०० टक्के यशस्वी होईल, यात तिळमात्र शंका नाही.
nice article
ReplyDelete