‘एक था टायगर’ पासून ‘टायगर जिंदा है’ पर्यंत

देशातील वाघांच्या मृत्यूंची वाढती संख्या चिंताजनक आहे. देशभरात २०१२ ते २०१८ या सहा वर्षांच्या कालावधीत तब्बल ६५६ वाघांचा मृत्यू झाला आहे. यापैकी तब्बल २०७ वाघांचा मृत्यू अवैध शिकारीमुळे झाला असून २०१९ मध्ये सप्टेंबर महिन्या अखेर ४१ वाघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती माहिती नॅशनल टाइगर कंझर्व्हेशन ऍथॉरिटी (एनटीसीए) यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार समोर आली आहे. यात समाधानाची एकच बाब म्हणजे, जागतिक व्याघ्रदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आनंदवार्तेनुसार देशातील वाघांची संख्या वाढून ती २९६७ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रातील वाघांची संख्या १९० वरून ३१२ इतकी झाली आहे. ही आकडेवारी अजूनही चिंताजनकच आहे. यापार्श्‍वभुमीवर वाघ वाचविण्याचा संदेश देण्यासाठी सॉल्टलेक कोलकाता येथील रथीन्द्रोनाथ दास (४३) आणि त्यांची पत्नी गीतांजली दास या दाम्पत्याने ‘जर्नी फॉर टायगर’ अभियान सुरू करुन भारतभ्रमण सुरु केले आहे. आतापर्यंत त्यांनी २१ हजार किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास पुर्ण केला आहे. त्यांच्या या ‘शेरदिल’ हिंम्मतीचे कौतूक करायलाच हवे.


वाघ हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक

केंब्रिज येथील ट्रॅफिक इंटरनॅशनल या एनजीओने २००० ते २०१८ दरम्यान जगभरात एक सर्व्हे केला. यातील माहितीनुसार, गेल्या १९ वर्षांत जगातील ३२ देशांमध्ये १,९७७ वाघांची शिकार करण्यात आली आहे. तर ३८२ वाघांना जीवंत पकडण्यात आले आहे. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असतांना एकट्या भारतातच या १९ वर्षांत ६२६ वाघांची शिकार करण्यात आली असून वाघांच्या शिकारीत भारत पहिल्या क्रमांकावर असणे ही लाजीरवाणी बाब आहे. भारतानंतर वाघांच्या शिकारीत थायलंडचा नंबर लागतो. थायलंडमध्ये वाघांच्या शिकारीच्या ४९ घटनांमध्ये ३६९ वाघांची शिकार करण्यात आली आहे. जगभरातील वाघांच्या संख्येवर नजर टाकल्यास; इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक २,९६७ वाघ आहेत. जगातील वाघांची संख्या ३,९५१ असून त्या तुलनेत भारतात ७५.०९ टक्के वाघ आहेत. या गोष्टीचा अभिमान बाळगायचा का शिकारीतीही भारतच आघाडीवर आहे, यावर चिंता व्यक्त करायची? हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून भारतीय संस्कृतीचे वाघ हे एक प्रतीक आहे. हडप्पा संस्कृतीत प्रथम वाघांविषयीचे पुरावे आढळून आले. जगातील १३ देशांपैकी भारत हा एक देश आहे, ज्यामध्ये वाघ आढळून येतात. मंचुरिया, चीन, आग्नेय आशियातून वाघ भारतात आला, असे म्हटले जाते. आज प्रामुख्याने जंगली वाघ भारत, ब्रह्मदेश, थायलंड, चीन, रशिया येथे आढळतो. भारतातील पंजाब, हरियाणा या राज्यांत वाघांचे प्रमाण समाधानकारक आहे. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या खोर्‍यात कोयना, चांदोली अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आढळते. तर राज्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव नागझिरा आणि सह्याद्री, ताडोबा-अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत.

५० टक्क्यांपेक्षाही अधिक वाघ फक्त भारतात 

शिकार व वसतीस्थानाचा नाश आणि जंगलातील नागरीकरणाचे वाढते अतिक्रमण यामुळे वाघ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जंगली वाघातील ५० टक्क्यांपेक्षाही अधिक वाघ आज फक्त भारतात उरले आहेत. वाघांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी देशात वाघ दुर्मीळ झाले असून त्यांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे व्याघ्रसंरक्षण काळाची गरज आहे. भारतात एकेकाळी वाघांची मोठी संख्या होती, असे म्हटले जाते की, २० व्या शतकाच्या सुरूवातीला १ लाख तर ब्रिटीश सोडून जाताना भारतात ४० हजार वाघ होते. राजे महाराजे व ब्रिटीशांच्या काळात शौकीसाठी मोठ्या प्रमाणात वाघांची शिकार करण्यात येत असे. पुढे तोच प्रघात कायम राहिला. शिकार, जंगलतोड यांच्यामुळे ही संख्या कमी होत गेली आणि वाघांचे अस्तित्वच धोक्यात आले. त्यानंतर सरकारने वाघांची संख्या वाढवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले. १९७३ पासून व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आले, त्यावेळी भारतात वाघांची संख्या १८२७ इतकी होती. १९७३ साली ९ व्याघ्र अभयारण्यापासून सुरू झालेला प्रवास २०१० मध्ये ३९ अभयारण्यापर्यंत पोहोचला. २०१४ मध्ये देशात व्याघ्र संरक्षण प्रकल्पांची संख्या ६९२ होती. ती पाच वर्षांत वाढून ८६०हून अधिक झाली आहे. कम्युनिटी रिझर्व्हची संख्याही ४३ होती. ती आता शंभरावर गेली आहे. भारताच्या विविध भागात एकूण पंचवीस व्याघ्रप्रकल्पांची स्थापना झाली असून कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, कान्हा राष्ट्रीय उद्यान, मानस राष्ट्रीय उद्यान, सुंदरबन, महाराष्ट्रात मेळघाट, राजस्थानात रणथंभोर इत्यादी व्याघ्रप्रकल्प प्रसिद्ध आहेत. 

दास दाम्पत्यांचा प्रयत्न निश्‍चितच कौतूकास्पद

जसे विविध क्षेत्रात सेलिब्रिटी असतात तसेच वाघांमध्ये देखील आहे. रणथम्बोर नॅशनल पार्कमधील मछली ही भारतातली सगळ्यात प्रसिद्ध वाघीण होती. यानंतर बंदिपूर नॅशनल पार्क मधील प्रिन्स, कान्हा नॅशलन पार्क मधील मुन्ना, पेंच नॅशनल पार्कमधील कॉलरवाली, ताडोबा मधील माया आणि स्कारफेस हे भारतातील सेलिब्रिटी वाघ म्हणून ओळखले जातात. वाघांची शिकार हा केवळ भारतापुरता मर्यादित विषय नसून जागतिक पातळीवरील यक्ष प्रश्‍न होवून बसला आहे. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी सेंट पीटर्सबर्गमध्ये आंतराष्ट्रीय पातळीवरील बैठक झाली. यात २०२२ मध्ये वाघांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले. मात्र भारताने हे लक्ष्य चार वर्षे आधीच गाठले आहे. मात्र अजूनही वाघांची संख्या कमीच आहे. यावर सर्वच जण विशेषत: सोशल मीडियावर चर्चा करतात परंतु प्रत्यक्षात कृती करून नागरिकांना जागृत करण्यासाठी व वाघ वाचविण्याचा संदेश देण्यासाठी सॉल्टलेक कोलकाता येथील दास दाम्पत्य दुचाकीवर भारतभ्रमण करीत आहे. १५ फेब्रुवारीला ते पत्नीसह वाघ वाचवा हा संदेश देण्यासाठी दुचाकीवर निघाले. आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, बिहार, उत्तराखंड, हिमालच प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, चंदीगड, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात, दीव, मध्य प्रदेश येथून महाराष्ट्रात आले. यात त्यांनी बोर, मेळघाट, ताडोबा, नागझिराला भेट दिली. हा प्रवास इथेच न थांबविता मार्च महिन्यापासून ते आपल्या जग भ्रमणाची सुरुवात करणार आहेत. यात म्यानमार, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, लाओस, चीन, रशिया, काठमांडू, भूतान, बांगलादेश येथे वाघ वाचविण्याचा संदेश देणार आहेत. दास दाम्पत्यांचा हा प्रयत्न निश्‍चितच कौतूकास्पद आहे. व्याघ्र संरक्षण ही आज काळाची गरज आहे. वाघ जगल्यास वन्यजीव अन्नसाखळी सुरक्षित राहील, हे विसरुन चालणार नाही.

Post a Comment

Designed By Blogger