काही महिन्यांपुर्वी कर्नाटकमध्ये घडलेल्या राजकीय नाट्याला नावे ठेवणार्या महाराष्ट्रात गेल्या २० दिवसांपासून हायहोल्टेज राजकीय ड्रामा सुरु आहे. या नाट्यात दररोज इतके ट्विस्ट येत आहेत की, एकता कपूर यांच्या कोणत्याही सिरियलचा रेकॉर्ड आतापर्यंत तुटला असेल. या नाट्याचा विशेष शो अवघ्या महराष्ट्राने सोमवारी पाहिला तोही विदाऊट ब्रेक! निवडणुकीत युती-आघाडीच्या नावाखाली मतांचा जोगवा मागितल्यानंतर आता सत्तेची मलाई खाण्यासाठी सोईस्कर राजकारण करणार्या राजकीय पक्षांकडून नैतिकतेची अपेक्षा करण्यात काहीच अर्थ उरलेला नाही, हे ऐव्हाना मतदारांच्या लक्षात आलेच असेल. ज्या पक्षांच्या विरोधात निवडणुका लढवल्या, प्रचारादरम्यान एकमेकांवर विखारी टीका करत आधी टाळ्या व नंतर मते मिळवल्यानंतर आता त्यांच्याच सोबत एकत्र संसार थाटण्याचा खटाटोप शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाशिवआघाडीच्या रुपाने पहायला मिळाला. या सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षाच्या ध्येयधोरणांना मूठमाती तर दिलीच आहे मात्र मतदारांच्या विश्वासाचा खून देखील केला आहे. शेवटी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ महाराष्ट्रावर आली आहे.
सेनेचे परतीचे दोर कापले गेले
निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाने सत्ता स्थापन करण्यास नकार दिल्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची गाडी सुसाट सुटली होती. त्यांच्याकडून दररोज केल्या जाणार्या दाव्यांमुळे व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकारे यांच्या भीष्म प्रतिज्ञेमुळे महाराष्ट्रात शिवसेनचेचा मुख्यमंत्री होण्याचे जवळपास निश्चित मानले जात होते. परंतू सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी दिलेल्या चोवीस तासांच्या उत्कंठावर्धक मुदतीनंतर सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी गेलेल्या शिवसेनेला मुदत वाढवून देण्यास राज्यपालांनी नकार दिल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून पाठिंब्याचे पत्र अद्यापही मिळालेले नाही. या गोंधळात तिसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला विचारणा केली. परंतु पत्र देण्यावरूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामुळे उशीर होत असल्याचे म्हटले. तर अजित पवार यांनी काँग्रेसमुळे समर्थन देता आले नसल्याचे म्हटले. या आरोप प्रत्यारोपांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच जुंपली. यात काहीही झाले तरी दोन्ही पक्षाचे फारसे नुकसान होण्याची शक्यता नाही कारण आधीच त्यांच्या हातात काही नव्हते, त्याउलट निवडणुकीत संख्याबळ वाढले व सध्या सुरु असलेल्या राजकीय अस्थिरतेत महत्त्व देखील वाढले आहे. जे काही नुकसान होईल ते सेनेचेच होईल कारण, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएमधून शिवसेना बाहेर पडली आहे. मोदी मंत्रिमंडळात अवजड उद्योग खात्याचे मंत्री असलेले अरविंद सावंत यांनी राजीनामा दिल्यामुळे आता सेनेचे परतीचे दोर देखील कापले गेले आहेत.
कट्टर शिवसैनिक निश्तितपणे दुखवला जाणार
दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पातळीवरही खलबतांवर खलबते सुरू आहेतच. शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसला सोपा आहे कारण दोन्ही पक्षांचे राजकारण महाराष्ट्राच्या अवती भोवतीच फिरते. मात्र हा निर्णय काँग्रेससाठी तिकका सोपा नाही कारण शिवसेना म्हणजे हिंदुत्ववादी विचारधारेवर राजकरण करते तर काँग्रेसचा चेहरा धर्मनिरपेक्षतेचा आहे. महाराष्ट्रात काँग्रेसने सेनेशी जवळीक साधली तर याचे परिणाम देशभर उमटण्याची शक्यता आहे. मोदी लाटेनंतर काँग्रेसमध्ये मरगळ आली असून एकदा राज्यात सत्ता मिळाली की ही मरगळ दुर होईल, असे काँग्रेसमधील एका गटाचे मानले असले तरी तिचे दूरगामी परिणाम काँग्रेसच्या राजकारणावर होवू शकतात, याची जाणीव काँग्रेसमधील चाणक्यांना निश्चितपणे आहे. शिवसेनेसारख्या प्रादेशिक अस्मिता जपणार्या आणि शिवाय हिंदुत्ववादी विचारांच्या पक्षाशी सहकार्य करणे हा काँग्रेसच्या वाटचालीला एक प्रकारे ऐतिहासिक वळण देणारा निर्णय ठरू शकतो. यामुळे केवळ एखाद्या राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस सेनेसोबत जाण्याची जोखीम पत्कारणार नाही, असे तरी प्रथमदर्शनी दिसते. बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसविरोधाचे राजकारण केले. काँग्रेसी नेते भ्रष्ट आहेत, हिंदुविरोधी आहेत, असे आरोप हे सेना नेत्यांकडून सातत्याने केले गेले. आता सत्तेसाठी त्याच काँग्र्रेसच्या पाया पडण्याचेच सेनेने बाकी ठेवले असल्याने कट्टर शिवसैनिक निश्तितपणे दुखवला जाणार आहे किंबहुना दुखवला गेला आहे.
सर्व पक्षांनी मतदारांना गृहीत धरले
भाजपाला धडा शिकविण्यासाठी काँग्रेसची मदत घेणे म्हणजे नवरा मरो पण सवत रडो, असा आहे. राम मंदीर, तिन तलाक, जम्मू-काश्मीर मधील कलम ३७० या मुद्यांवर काँग्रेसने घेतलेल्या भुमिकांना शिवसेनेने प्रखरपणे विरोध केला आहे, आता त्यांच्याशीच तडजोड करण्याची वेळ आली आहे. गेल्या काही काळापासून भाजपा देखील सत्तेच्या अहंकारात जवळच्यांना दुखावत होती, याची जाणीव आता दिल्लीश्वरांना होवू लागली आहे. राज्यातील भाजपाच्या धुरंधरांनी तर बेरजेचे गणित आखतांना जवळच्यांना वजा करत काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांना आयात केले. मात्र त्यातील अनेक मातब्बरांना मतदारांना चांगलाच धडा शिकवत घरी पाठविले. भाजप-सेना युतीत लढत असतांना भाजपाचे अनेक बंडखोर उभे होते त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला. मात्र यातूनही दोन्ही पक्षांनी धडा न घेतल्याने सध्याची राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. शिवसेनाच्या स्वप्नातील महाशिवआघाडी सरकार आल्यास ते टिकाऊ असण्याची सुतराम शक्यता नाही. सुरुवातीला ‘आपणास मताधिक्य नाही, आम्ही विरोधी पक्षांत बसू,’ अशी सामजस्यांची भूमिका घेणारे शरद पवार शिवसेनेच्या आग्रहाला बळी कसे पडले, याचेही मोठे आश्चर्य आहे. यात आता कोणीही जिंको मात्र सर्व पक्षांनी मतदारांना केवळ गृहीतच धरले नाही तर त्यांच्या अमूल्य मतांचाही अपमान केला आहे. आज राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकरी संकटात सापडला आहे मात्र सत्तास्थापनेच्या स्वार्थात शेतकर्यांकडे दुर्लक्ष होत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत हा तिढा न सुटल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली, यापेक्षा मोठे दुर्दव्य कोणते?
Post a Comment