पाकिस्तानने पोसलेल्या भारतविरोधी दहशतवादाचा प्रमुख चेहरा जैश ए मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याला पाठिशी घालण्याचा चीन व पाकिस्तानचा वर्षोनुवर्षांचा प्रयत्न अखेर भारताच्या कूटनीतीने उधळला गेला. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आल्याने भारताने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला आहे दुसरीकडे पाकिस्तानच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारतावर निशाणा साधणार्या चीनलाही मोठी चपराक बसली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताचा दबदबा अधोरेखीत झाला आहे. चीनविरुद्ध सारे जग हा सरकारच्या मुत्सद्देगिरीचा परिणाम आहे.
चीन आणि पाकिस्तानसारखे विश्वासघातकी देश शेजारी म्हणून लाभले हे भारताचे मोठेच भौगोलिक दुर्दैव आहे. त्यांच्याशी भारताने कितीही चांगले संबंध प्रस्थापित केले. कशीही जवळीक साधली. तरीही त्यांचे शेपूट काही सरळ होत नाही. एकीकडे मैत्रीचा हात आणि दुसरीकडे घात, हेच या दोन्ही राष्ट्रांच्या परराष्ट्र धोरण राहिले आहे. मसूद अझर याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या प्रयत्नात चीनने सातत्याने घेतलेली भुमिका संशयास्पदच राहीली. जम्मू-काश्मीरच्या पुलवामासह देशातल्या कित्येक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार असलेल्या मसूदला जागतिक दहशतवादी ठरविण्यासाठी भारताने गेली १० वर्षे सातत्याने प्रयत्न केले. मात्र प्रत्येकवेळी चीनी ड्रॅगन भारतविरोधी आग ओकत राहिला. मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताने २००९ ला पहिला प्रयत्न केला होता. तेंव्हाही चीनने नकाराधिकार वापरत आपली अडेलतट्टू भूमिका घेतली होती. त्यानंतर २०१६ आणि २०१७ मध्ये पुन्हा हा पर्यंत केल्यावरही चीनने आपला हेका सोडला नाही. आता सर्व देशांचा पाठिंबा असतानाही एकट्या चीनने मसूद प्रकरणी भारताला विरोध केला. १९९९ मध्ये कंदहार विमान अपहरण प्रकरणानंतर भारताला मसूद अझर ला सोडावे लागले होते. तेंव्हापासून भारतावर होणार्या प्रत्येक दहशतवादी हाल्यात तो संशयित म्हणून समोर येत आहे .२००१ मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्यात मसूद अझर ची प्रमुख भूमिका होती. तेंव्हाही पुरावे देण्यात आले होते. पठाणकोट हल्ल्यातही मसूदचा हात असल्याचे पुरावे जगासमोर ठेवण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील मसूदचा हस्तक्षेप तर जगाने मान्य केला आहे. त्यामुळे यावेळी विरोधी सूर लावण्याचे चीनला काहीच कारण नव्हते. परंतु तरीही चीनने खोडा घातला. भारताने बालाकोटवर एअरस्ट्राईक केल्यानंतर फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिका या प्रमुख देशांनी अझरला जागतिक दहशतवादी जाहीर करण्यासाठीचा प्रस्तावही सादर केला. तरी पाच कायम सदस्यांपैकी एक असलेल्या चीनकडून या पाच सदस्यांना प्राप्त असलेला नकाराधिकार (व्हेटो) वापरला गेला आणि ठराव संमत होऊ शकला नाही. भारताने पाच प्रमुख देशांसह अन्य २५ देशांच्या प्रतिनिधींसमोर मसूदच्या कारवायांचे पुरावे सादर केले. तरीही चीनकडून तो प्रस्ताव रोखला गेला. विशेष म्हणजे फ्रान्सच्या पुढाकाराने यंदा भारताने केलेला हा चौथा प्रयत्न होता. या वेळी अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड या देशांनी मसूदविरोधात भारताच्या ठरावास पाठिंबा दिला. रशियानेदेखील भारताचीच बाजू उचलून धरली होती. पण, एन वेळी चिनी अजगराने त्याचे खरे स्वरूप पुन्हा दाखवले. नकाराधिकाराचा वापर करून चीनने मसूदला पर्यायाने पाकिस्तानला आणि एक प्रकारे दहशतवादालाच अभय दिले. भारत विरुध्द पाकिस्तानच्या वादात चीन नेहमी पाकिस्तानच्या बाजूने उभा राहीला असल्याचे इतिहास सांगतो. यास अनेक कारणे आहेत. प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास, चीन भारताला आपला प्रतिस्पर्धी म्हणून पाहतो. भारतावर वरचष्मा राखण्यासाठी भारताला जे हवे आहे ते न मिळू देण्यात त्याचे यश असते. दुसरे महत्त्वाचे म्हणचे, चीनने तिबेटवर कब्जा केल्यानंतर तिबेटी आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांना भारताने आश्रय दिला. सुमारे सहा दशकांपूर्वीच्या या घटनेचा आकस चीन अद्याप धरून आहे. याव्यतिरिक्त, अलीकडे चीनने ‘वन रोड वन बेल्ट’ या महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी पाकिस्तानमध्ये केलेली आहे. या सुमारे साडेतीन लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून चीन स्वत:साठी आफ्रिका खंडात आणि पश्चिम आशिया उपखंडांत पोचण्यासाठीचा व्यापारी मार्ग उपलब्ध करून घेत आहे आणि बदल्यात पाकिस्तानातील सर्वाधिक मागास प्रदेशांचा पायाभूत सुविधांद्वारे विकास करून देत आहे. यास भारताचा विरोध आहे. भारतावर पकड मिळवण्यासाठी चीन आणि पाक यांच्यातील अलिखित करार करण्यात आला आहे. यानुसार, जेथे चीनला फारसे पाठबळ नाही तेथे पाकिस्तान त्याच्या पाठीशी कायम राहणार आणि त्याच्या बदल्यात चीनकडून पाकला नकाराधिकाराच्या मार्फत संरक्षण मिळणार, असे त्यांचे गणित आहे. मात्र मोदी सरकारच्या कुटनितीचे फलीत म्हणून चीन संपुर्ण जगात एकाकी पडला. भारतीय धुरंधरांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या लॉबिंगमुळे चीनला भुमिका बदलावी लागली. ‘युनो’मध्ये अझरबाबत ठराव येण्यापूर्वी भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी चीनचा दौरा केला. गोखले २२ एप्रिल रोजी चीन गाठत चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली होती. याच भेटीत गोखले यांनी अझरच्या भारतविरोधी कारवायांचे ठोस पुरावे दिले. आमच्यासमोर आलेल्या सुधारीत पुराव्यांनी आमचे समाधान झाले आहे, अशी सुबुध्दी चीनला सुचली आणि अझरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले. चीनने साथ सोडल्यामुळे पाकिस्ताननेही स्वत:ची भुमिका बदलत, युनोच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे पाकिस्तानसाठी बाध्य आहे. पाकिस्ताननेही त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची लागलीच ग्वाही दिली आहे. युनोचा निर्णयाचे आम्ही पालन करू. तीन दिशांनी त्याची अंमलबजावणी होईल. अझरची मालमत्ता आम्ही गोठवू. त्याच्या हालचालींवर प्रतिबंध घालू. त्याच्याकडील शस्त्रे जप्त करू, असे आश्वासन दिले. याला भारतिय कुटनितीचेच यश मानावे लागेल.
Post a Comment