इस्त्रोचे अवकाशातून इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स


भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून भारताच्या एमीसॅट उपग्रहासह इतर देशांचे २८ नॅनो उपग्रहांचे पीएसएलव्ही सी ४५ प्रक्षेपकाच्या मदतीने यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. यात अमेरिकेचे २४, भारताचा १, ल्युनिनियाचे २, स्वित्झर्लंडचा १ आणि स्पेनचा १ अशा उपग्रहांचा समावेश आहे. एमीसॅटमुळे शत्रूच्या रडारची, तिथे चालणार्‍या संवादाची आणि प्रदेशाची माहिती मिळवणे शक्य होणार आहे. ४३६ किलो वजनाच्या या उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानच्या हालचालींवर अत्यंत बारीक लक्ष ठेवता येणार आहे. रात्रीच्यावेळी सुद्धा फोटो काढण्याची या उपग्रहाची क्षमता आहे. या उपग्रहामुळे शत्रूच्या भागात मोबाईल फोनसह अन्य किती संवाद उपकरणे सक्रीय आहेत ते सुरक्षा यंत्रणांना कळणार आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअरस्ट्राईकनंतर जगभरात खळबळ उडाली मात्र, भारतात यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या हल्ल्यात नेमके ३०० दहशतवादी कसे मारले? याची मोजणी कशी केली? आदी प्रश्‍न उपस्थित झाल्यानंतर दहशतवाद्यांचे किती मोबाईल सक्रीय होते, त्यावरुन अंदाज घेत हा हल्ला करण्यात आलाचा खुलासा झाला. आता अशीच अचूक माहिती एमीसॅटच्या माध्यमातून भारतीय लष्कराला उपलब्ध होणार आहे.


इस्त्रोची गगनभरारी 

१५ फेब्रुवारी २०१७ रोजी इस्त्रोने अमेरिकेच्या ९६ उपग्रहांसह एकाच वेळी १०४ उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम प्रस्थापित केल्यानंतर इस्त्रोची गगनभरारी सुरुच आहे. इस्रोची स्थापना झाल्यानंतर भारताने २१ नोव्हेंबर १९६३ रोजी आपल्या अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर १९ एप्रिल १९७५ रोजी भारतीय बनावटीचा पहिला उपग्रह आर्यभट्ट अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला. २६ मे १९९९ पासून भारताने अन्य राष्ट्रांचे लहानलहान उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यास सुरुवात केली. तेव्हा जर्मनी आणि दक्षिण कोरिया यांच्या ‘टब सेट’ उपग्रहांबरोबर भारताचा ‘ओशन सेट’ हादेखील अंतरिक्षात सोडला गेला. त्यानंतर ‘पीएसएलव्ही सी-३’ ने २२ ऑक्टोबर २००१ रोजी उड्डाण केले. त्यात भारतीय उपग्रह ‘बर्ड’ आणि बेल्जियमचा ‘प्रोबा’ यांचा समावेश होता. २२ एप्रिल २००७ रोजी ‘पीसीएलव्ही सी-८’ मधून इटलीचा ‘एन्जाईल’ उपग्रह प्रक्षेपण करण्यात आला. मात्र व्यावसायिक प्रक्षेपणाची सुरुवात २१ जानेवारी २००८ रोजी झाली, जेव्हा ‘पीएसएलवी सी-१०’ मधून इस्राईलचा ‘पोलारिस’ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यात आला. या उड्डाणाबरोबर ‘इस्रो’ने जागतिक निकषांनुसार उपग्रह प्रक्षेपण मूल्य घेण्यास सुरुवात केली. ही किंमत पाच हजार डॉलर ते २० हजार डॉलर प्रतिकिलोग्रॅम पेलोड यानुसार आकारली जाते. १५ फेब्रुवारी २०१७ रोजी भारताने एकाच वेळी १०४ उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम प्रस्थापित केला. त्यात ९६ उपग्रह अमेरिकेचे होते. जानेवारी २०१८ मध्ये ‘इस्रो’ने ‘पीएसएलव्ही - सी ४०’च्या मदतीने ३१ उपग्रह अवकाशात सोडले. यात अमेरिकेसह फिनलँड, कॅनडा, फ्रान्स, दक्षिण कोरिया आणि ब्रिटनच्या उपग्रहांचा समावेश होता. हा देखील एक मोठा विक्रम होता. 

ब्रम्हांडातील सुपरपॉवर होण्याच्या दिशेने वाटचाल

एकेकाळी सायकल व बैलगाड्यांवर उपग्रहांची वाहतूक करणार्‍या भारताने अल्पवधीतच ब्रम्हांडातील सुपरपॉवर होण्याच्या दिशेने वाटचाल करणे कौतूकास्पद आहे. काही टन वजन असणारे उपग्रह आपण अंतरिक्षात पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रक्षेपित करू शकतो किंवा मंगळ, चंद्र, शुक्र अशा ग्रहांवर ते पाठवण्याची क्षमता आपण प्राप्त केली. याआधी पीएसएलव्ही सी-४३ च्या मदतीने सोडण्यात आलेल्या हायपर स्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रहांच्या मदतीने पृथ्वीवरील वातावरणातील हालचाली, हवामान बदल यावर देखरेख ठेवण्यात येते, तसेच पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करण्यास याची मदत होत आहे. तसेच यामुळे पर्यावरण संरक्षण, कृषी, वन, पाणी व्यवस्थापन करण्यास मदत होत आहे. 

शत्रूच्या हालचालींची माहिती मिळवणे शक्य

दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिका, रशिया आणि जगातील अनेक देशांनी क्षेपणास्त्रावर संशोधन सुरू केले आणि पृथ्वीभोवती फिरणार्‍या उपग्रहांद्वारे दुसर्‍या देशांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. यात भारताने मोठी घोडदौड केली आहे. मध्यंतरी जीसॅट-२९ चा वापर इस्रोने आणखी एका चांगल्या कामासाठी करून घेतला आहे. तो म्हणजे भारताच्या पूर्वोत्तर क्षेत्रात इंटरनेट सेवा इतक्या परिपूर्ण ताकदीनिशी अस्तित्वात नव्हती. या उपग्रहाचा वापर करून भारताच्या बाकी क्षेत्रांत ज्या वेगाने इंटरनेट चालते त्याच वेगाने आता पूर्वोत्तरच्या क्षेत्रात या मायाजालाचा वेग राहणार आहे. या उपग्रहावर एक उच्च झूमिंग क्षमतेचा कॅमेरा लावण्यात आला आहे. ज्याला इस्रोने ‘जिओ आय’ असे नाव दिले आहे. याचा उपयोग भारताला संरक्षण क्षेत्रात पुरेपूर करून घेता येणार आहे. याच्या झूमिंगचा दर्जा इतका उत्तम आहे की, वर कक्षेत प्रस्थापित असताना जमिनीवर चालणार्‍या वाहनाचा क्रमांक पाहता येवू शकतो. ही सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप मोठी बाब आहे. हिंदी महासागरात देशाच्या शत्रूंची जहाजे विनापरवानगीने शिरतात किंवा शिरण्याच्या प्रयत्नात असतात, आता या जहाजांवर जीसॅट-२९ नजर ठेवून आहे. त्यासोबतच आता पीएसएलव्ही सी - ४५ उपग्रह तसेच इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स उपग्रहच्या प्रक्षेपणानंतर गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तान व चीनच्या हालचालींवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. एमीसॅटमुळे शत्रूच्या हालचालींची माहिती मिळवणे शक्य होणार आहे. सुरक्षा यंत्रणांना या उपग्रहाचा फायदा होणार आहे. इस्रोने आतापर्यंत केलेली प्रगती निश्‍चितच कौतूकास्पद आहे. वर्षानुवर्षांचे संशोधन, प्रसंगी येणार्‍या अपयशाने खचून न जाता पुन्हा जोमाने काम करीत राहत प्रगतीचा मोठा पल्ला इस्त्रो आता गाठला आहे. संरक्षणाच्या दृष्टीने अंतराळात सोडलेले उपग्रह महत्त्वाचे कार्य करीत आहेत. त्यामुळे चीन, पाकिस्तान अशा देशांतील महत्त्वाचे लष्करी तळ आणि कारवायांवर लक्ष ठेवणे भारताला आता सोपे होत आहे. ही एक अवकाशातील सर्जिकल स्ट्राईकच आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. इस्त्रोच्या या गगनभरारीसह नव्या विक्रमाला खूप खूप शुभेच्छा!

Post a Comment

Designed By Blogger