किंगफिशरनंतर जेट एअरवेजचे लॅण्डींग अन् मल्ल्याची नौटंकी


कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचे ओझे पेलू न शकल्याने किंगफिशरनंतर जेट एअरवेज जमिनीवर आली आहे. जेट एअरवेजसमोर आर्थिक संकट उभे राहिल्याने त्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सरकारने सर्व बँकांना हाक दिली. यामुळे कर्ज देणार्‍या २६ बँकांपैकी २ बँका जेटची मदत करण्यास तयार झाल्या. यामुळे जेट कॅ्रश होता होता वाचले. या विषयावरुन बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून पसार झालेला विजय मल्ल्याने नौटंकी सुरु केली आहे. स्वत:च्या मालकीच्या किंगफिशरवर असलेले १७ बँकांचे ९ हजार ९०० कोटी रुपयांचे कर्ज फेडू न शकणारा मल्ल्या मगरीचे अश्रू ढाळत, हवे तर माझ्याकडून पैसे घ्या मात्र जेट एअरवेजला वाचवा, असा ढोल बडवत आहे. एनडीए सरकारने जी भुमिका जेट बद्दल घेतली तीच किंगफिशर वाचविण्यासाठी का घेतली नाही? असा सवाल करत मल्ल्याने मोदी सरकारवर टीका केली आहे. हा प्रकार म्हणजे ‘चोर उलटा कोतवाल को डाटें’ असा आहे.

मल्ल्याची केवीलवाणी टीव-टीव

कॉर्पोरेट कर्ज व डीफॉल्टर्स या दोन मुद्द्यांवरुन देशात गेल्या सहा महिन्यांपासून नव्या वादाला तोंड फुटले आहे. एकीकडे देशातील शेतकर्‍यांना १० ते १५ हजार रुपयांचे कर्ज मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असतांना कॉर्पोरेट जगतातील मोठ्या हस्तींना कोट्यावधी रुपयांची नियमबाह्य कर्जांचे वाटप करण्यात येत आहे. हे कर्ज न फेडता विजय मल्ल्या, नीरव मोदींसारखे बडी धेंडं परदेशात पळून जात आहेत. यामुळे सहाजिकच सर्वसामान्यांचा सरकारवर रोष वाढणे स्वाभाविक आहे. सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतांना या विषयांवरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतीलच. या विषयावर पुन्हा चर्चा होण्यास पुन्हा सुरुवात झाली कारण, ८००० कोटींचे कर्ज थकलेल्या आणि प्रचंड तोट्यात असलेल्या जेट एअरवेजचा व्यापार बुडू नये म्हणून आपत्कालीन कर्ज देण्यास स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकने तयारी दर्शवली आहे. समभाग खरेदीच्या रूपातील जेट एअरवेजवरील स्टेट बँकेचे वर्चस्व तात्पुरते राहणार आहे. १५०० कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यासह सर्वात मोठया सरकारी स्टेट बँकेने कंपनीवर ५१ टक्के मालकी मिळविली असली तरी नव्या भागीदाराकरिता प्रक्रिया करावी लागणार आहे. जेटच्या रुपाने किंगफिशरची पुनरावृत्ती होऊ देऊ नका अशी हाकच सरकारकडून देण्यात आली होती. त्यास हाक देत दोन्ही बँकानी कर्ज देण्याची तयारी दर्शवली, येथेच मल्ल्या दुखावला. जशी जेटला वाचविण्यासाठी पाऊले उचलली गेली तसे प्रयत्न किंगफिशरला वाचविण्यासाठी केले नाहीत, यावर मल्ल्याचा रोष आहे. ‘मी कंपनी आणि कर्मचार्‍यांना वाचवण्यासाठी किंगफिशर एअरलाइन्समध्ये ४००० कोटींची गुंतवणूक केली. पण त्याची अजिबात दखल न घेतला शक्य तितकी टीका माझ्यावर करण्यात आली. याच सरकारी बँकांनी भारतातील सर्वोत्कृष्ट असलेल्यांपैकी एका कंपनीला बुडू दिले. एनडीए सरकारची दुटप्पी भूमिका आहे. भाजपा सरकारने किंगफिशरला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल वारंवार मनमोहन सिंग यांच्या सरकारवर टीका केली. पण आता त्यांनीही नरेश गोयल यांच्या जेट एअरवेजसाठी तेच केले’, असे ट्वीट मल्ल्याने केल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला. या ट्विटवरुन मल्ल्याबद्दल सहानुभूती दर्शविण्यापुर्वी मल्ल्याची ही केवीलवाणी टीव-टीव का सुरु झाली? हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 

‘फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, २०१८’

मोठे आर्थिक घोटाळे, बँकांची फसवणूक यांसारखे मोठे आर्थिक गुन्हे उघडकीस आल्यास गुन्हेगार परदेशामध्ये पलायन करून तिथे आश्रय घेतात. अशा देशांकडून त्यांचे प्रत्यार्पण होणे, त्यानंतर खटले चालविणे यामध्ये खूप वेळ वाया जातो. अशा घोटाळेबाजांवर वचक निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने ‘फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, २०१८’ आणला आहे. या कायद्यांतर्गत फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून जाहीर झाल्यास गुन्हेगाराच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करता येते. कायदेशीर कारवाई विरोधात स्वतःचा बचाव करण्यासाठी संबंधित व्यक्ती भारतातून परदेशात पळ काढतात. नंतर भारतवापसी करण्यास टाळाटाळही करतात. त्यामुळे केंद्र सरकारने कडक कायदा करून आर्थिक गुन्हेगारीला लगाम लावण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या पाच वर्षात २७ कर्जबुडवे तसेच आर्थिक गैरव्यवहार करणारे भारताबाहेर पळून गेले आहेत. देशाबाहेर गेलेल्या २७ कर्जबुडव्या व्यावसायिकांपैकी २० उद्योजकांविरुद्ध इंटरपोलने नोटीस बजावली आहे. तसेच ७ उद्योजकांविरुद्ध कठोर कारवाईची प्रक्रिया आणि ६ जणांच्या प्रत्यार्पणाची मागणी करण्यात आली आहे. कायद्यातील नव्या सुधारणेनंतर फरार घोषित केलेला विजय मल्ल्या हा पहिला गुन्हेगार ठरला आहे. येथे मल्ल्याचे दुखणे आहे. मल्ल्याने कर्नाटक उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेमध्ये ईडीने जप्त केलेली १,६००.४५ कोटींची स्थिर मालमत्ता, ७,६०९ कोटीचे शेअर्स, २१५ कोटीचे फिक्स डिपॉझिट, युनायटेड स्पिरिट लिमिटेडमधील २,८८८.१४ कोटीचे शेअर्स आणि अन्य मालमत्ता विकण्याची तयारी दर्शवली. मध्यंतरी त्याला अटक झाल्याने त्याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यामुळे तो सरकारवर तोंडसूख घेत आहे. प्रचंड मोठं नुकसान झाल्याने २०१२ मध्ये किंगफिशर एअरलाइन्स बंद पडली. दिवाळखोरीमुळे अनेकांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या होत्या, तर करोडोंचं नुकसान झाले होते, याचा दाखला देत मल्ल्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, कर्ज फेडण्यासाठी माझ्या संपत्तीची माहिती मी कर्नाटक उच्च न्यायालयात दिली आहे. मग बँका माझे पैसे घेत का नाहीत. हेच पैसे वापरुन ते जेट एअरवेजला वाचवू शकतात’. हि भूमिका म्हणजे स्वत:च्या मुलाला उपाशी ठेवून दुसर्‍याच्या मुलांना खाऊ घालण्यासाठी हट्ट करण्यासारखे आहे. आता चहू बाजूने कोंडी झाल्याने व यातून सुटका होण्याची चिन्हे दिसत नसल्याने मल्ल्याला हे शहाणपण सुचले आहे. मल्ल्याच्या या शहाणपणचा लोकसभा निवडणुकांशी संबंध आहे की नाही? याचे उत्तर मल्ल्याच देवू शकेल मात्र यामुळे मार्केटिंगचा एक फंडा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तो म्हणजे, ‘कनव्हीन्स देम ऑर कन्फ्यूज देम’. आता कोणी कनव्हीन्स व्हायचे व कोणी कन्फ्यूज, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे.

Post a Comment

Designed By Blogger