दुष्काळ दारात, नेते प्रचारात


सलग चार वर्षांपासून कमी अधिक प्रमाणात पडणार्‍या पावसामुळे दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. त्यात प्रशांत महासागरात एल निनो या चक्री वादळाचा प्रभाव असल्याने यंदा सरासरीच्या ९३ टक्के इतकाच पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. यामुळे आतापासूनच भविष्यातील संकटांची चाहूल लागली आहे. एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा बसत असल्याने वातावरण तापत आहे. एकीकडे सुर्य आग ओकत असतांना दुसरीकडे लोकसभा निवडणुकांच्या प्रचारसभांमुळे राजकीय वातावरण देखील तापायला सुरुवात झाली आहे. एरव्ही लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवरील मुद्दे व विषयांना महत्त्व असते मात्र यंदा पाणीटंचाई, चाराटंचाई, ग्रामीण भागातील पाण्याचे, विहीर अधिग्रहणाचे प्रश्न हे मुद्दे घेऊन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतांना दिसत आहे. मात्र दुर्दव्य एवढेच की दुष्काळ दारात उभा असतांना त्यावर केवळ राजकारण केले जात आहे.

शेतीमुळे १.३ अब्ज लोकांना रोजगार

कृषीप्रधान अर्थव्यवस्था असल्याने भारताच्या दृष्टीने पाऊसमानाचा अंदाज अतिशय महत्त्वाचा असतो. भारतातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने शेतकर्‍यांचे डोळे आभाळाकडे लागलेले असतात. शेतीचे देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेतले योगदान १४ टक्के असले तरी, यामुळे देशातल्या १.३ अब्ज लोकांना रोजगार मिळतो. त्यामुळेच पावसाबद्दल व्यक्त करण्यात येणार्‍या अंदाजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आधीच गत तिन चार वर्षापासून कमी अधिक पडणार्‍या पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. याचा विपरित परिणात सर्वच क्षेत्रांवर दिसून येत आहे. महागाईचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. दृष्काळाच्या दृष्टचक्रात शेतकरी व सर्वसामान्या भरडला जात आहे. गेल्यावर्षी सुरुवातीला पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या मात्र नंतर पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजा पुन्हा अडचणीत आला. झालेले नुकसान पुढच्या वर्षी भरुन काढू अशी आशा असतांना यावर्षीही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता ५५ टक्के असेल, असा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. पावसावर अल निनोचा प्रभाव जाणवेल. पॅसिफिक महासागरात सक्रिय असलेल्या अल निनोमुळे ऑस्ट्रेलिया, दक्षिण आशिया, भारताच्या काही भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल, असा धोक्याचा इशारा स्कायमेटने दिला आहे. यापार्श्‍वभूमीवर देशात विशेषत: शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

राजकीय नेते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात

दुष्काळ हा भारतासाठी नवा नाही, त्यातही अल निनो हा शब्द अगदी परिचित झाला आहे कारण हवामान खात्याने केलेल्या संशोधनानूसार, १९५० ते २००० या सालापर्यंत एकूण तेरा वेळा एल निनो होता़ १९५१, १९६५, १९९६६, १९७२, १९७४, १९७९, १९८२, १९८३, १९८६, १९८७, १९९१, १९९२, १९९७ या वेळी एल निनो होता़ त्यात केवळ तीन वेळा म्हणजे १९५१, १९६५ आणि १९७२ मध्ये दुष्काळ पडला होता़ यानंतर २०१५ साली प्रबळ एल निनो होता तर, २०१६ साली मात्र उष्ण वर्ष असून ला निना होता़ विशेष म्हणजे २०१८ मध्ये ऑगस्ट महिन्यानंतर मात्र मध्यम ला निना व नंतर २०१९ मध्ये पुन्हा एल निनो हा उष्ण सागरी प्रवाह निर्माण होण्याची शक्यता वर्तविली आहे़ या पार्श्‍वभूमीवर यंदा देखील एल निनोला गृहित धरुन मॉन्सून खराब होईल असा अंदाज स्कायमेंटने व्यक्त केला आहे़ एल निनोच्या प्रभावामुळे देशात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ८८७ मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना कडक उन्हाळा आणि तीव्र दुष्काळाची चिंता जाणवू लागली आहे. पाण्याची टंचाईमुळे पिके मातीत गेली आहेत. आता पाणी, चारा यांची चिंता सतावू लागली आहे. यावर्षी अतिशय तीव्र दुष्काळाला तोंड द्यावे लागण्याची चाहूल ग्रामीण जनतेला झाली आहे. पाणीसाठे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच संपू लागले आहेत. मोठ्या जनावरांच्या चारा-पाण्याची सोय शेतकरी कशीबशी करत आहेत. परंतु मेंढपाळांना मेंढ्या, शेळ्या यांच्या चारा-पाण्याची सोय करत असताना नाकी नऊ आले आहे. अशा संकटकाळी शेतकर्‍यांना मदतीचा हात देणे अपेक्षित आहे. ग्रामीण भागात तात्पूरत्या स्वरुपात पाणी पुरवठा, चारा छावण्या, कृषी अनुदान आदी उपया योजना राबविण्याची अत्यावश्यकता आहे. मात्र याचे सोयसूतक कोणाला दिसत नाही. राजकीय नेते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अडकले आहे. शासनाने यासाठी ज्या योजना आधीच निश्‍चित केल्या आहेत, त्याची मंजूरी आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली आहे. अनेक ठिकाणी निधी असूनही तो खर्च करण्यात अडचणी येत आहेत. यामुळे राजकारण्यांप्रमाणेच प्रशासकीय यंत्रणाही निवडणुकीच्या तयारीत मग्न झाल्यासारखी वाटते आहे. त्यामुळे या रणधुमाळीत आपले कसे होणार याची चिंता ग्रामीण भागातील जनतेला सतावू लागली आहे. काही ठिकाणी याचे पडसाद उमटत आहेत. 

गंभीर प्रश्नाकडे डोळेझाक

राजकीय नेत्यांनी प्रथम दुष्काळासंबंधीची उत्तरे प्रथम द्यावीत, पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि पाणी याची टंचाई यामधून कसा मार्ग काढावा यावर बोलावे, मग राजकारण करावे, असा संताप आता मतदारांनामध्ये दिसू लागला आहे. चारा छावण्या, चार डेपो, पिण्याच्या पाण्याचे टँकर आदी दुष्काळ निवारण्यासाठीच्या उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याची गरज आहे. दुष्काळाच्या विषयावरुन महिन्यापूर्वीच प्रशासनाला धारेवर धरणारे राजकारणी लोकसभेच्या निवडणुकीत पार गुंतून गेले आहेत. त्यामुळे पाणीटंचाई सोबतच चारा टंचाईच्या गंभीरतेच्या प्रश्नाकडे डोळेझाक होत आहे. सामान्य माणसाला मात्र पाणी हवे आहे. त्याचा प्रकर्षाने विचार करताना कोणी फारसे दिसत नाही. या मुद्यावर राजकारण्यांना सध्या बोलण्यास वेळ नाही. जो तो आपली प्रचार सभा, कॉर्नर बैठकांद्वारे थेट जनसामान्यांशी संवाद साधण्यात व्यस्त आहे. परिणामी लोकसभा निवडणुकीत दुष्काळ हरवल्याचे जाणवत आहे. या संवेदनशिल राजकारण्यांना धडा शिकवणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी जागरुकतेने मतदान करणे आवश्यक आहे, तर चला मग निरपेक्षपणे मुल्यमापन करुन मतदान करुया!

Post a Comment

Designed By Blogger