संघाच्या मुशीत तयार झालेले व भाजपाचे हेवीवेट नेते अशी ओळख असलेले केद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. स्वच्छ प्रतिमा आणि वादग्रस्त वक्तव्यापासून नेहमी लांब राहणार्या गडकरींना अचानक असे काय झाले? हा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. आपल्या म्हणण्याचा विपर्यास करण्याचा कट सुरू आहे, असे गडकरींचे म्हणणे असले तरी पण प्रत्यक्षात तसे शक्य नाही कारण गडकरींसारखा कसलेला खेळाडू वारंवार सेल्फ-गोल करणं संभवत नाही आणि गडकरी म्हणजे ऐरागैरा नेता नव्हे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू किंवा इंदिरा गांधी यांच्याविषयी अपमानास्पद विधाने करत असतांना मध्यंतरी गडकरींनी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्याविषयी गौरवोद्गार काढल्याने संभ्रम अजूनच वाढला. त्यातच दोन दिवसांपूर्वीच युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभेत चक्क बाकं वाजवून गडकरींच्या कामाचे कौतूक केले, याला योगायोग म्हणावा का दुसरे काही? या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देईल.
मराठी माणूस देशाचा पंतप्रधान झाला पाहिजे, अशी महाराष्ट्रातील सुमारे साडे अकरा कोटी लोकांची इच्छा आहे. ४१ वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण यांनी ही संधी चालून आली होती मात्र थोडक्यात ती हुकली आता ती हुकलेली संधी गडकरी साधतील का, हा प्रश्न अनेकांना पडत आहे. गडकरी हे सर्वाधिक धडाडीचे मंत्री, सर्वोत्तम प्रशासक आहेत. कुठलेही काम द्या. ते त्याचे सोने करतात. मोदींच्या पहिल्या पाच वजनदार मंत्र्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. भाजपाला आता आलेल्या अच्छे दिनची सुरुवात ते राष्ट्रीय अध्यक्ष असतांनाच झाली आहे. त्यांनी केलेल्या पक्षबांधणीमुळे भाजपाला २०१४ मध्ये घवघवीत यश मिळाले असल्याने भाजपाचे अनेक बडे नेते खाजगीत बोलतांना मान्य करतात. गडकरी दुसर्यांदा राष्ट्रीय अध्यक्ष झाले असते पण आदल्या दिवशी गडकरींच्या पूर्ती समूहात गुंतवणूक करणार्या कंपन्यांवर आयकर खात्याच्या धाडी पडल्या आणि मोदी युगाचा उदय झाला. घरच्या कटकारस्थानात गडकरी संपलेच होते. पण त्यांनी निवडणूक लढवून जुगार खेळला आणि २०१४ लोकसभा निवडणुकीत मोदींची प्रचार सभा न घेता दोन लाखांहून अधिक मताधिक्य मिळविले. चार वर्ष गडकरींच्या कामाचा धडाका सुरु होता व मोदींच्या नावाचा डंका जोरदार वाजत होता. मात्र पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर मोदी लाट ओसरल्याचे चित्र समोर आले.
याचवेळी मोदींच्या एकाधिकारशाही नाराजी उघडपणे समोर आली. मित्रपक्ष भाजपापासून दुरावले. याचवेळी गडकरींच्या वादग्रस्त विधानांना वाचा फुटली, हा निश्चितच योगायोग नाही! ‘अच्छे दिन आयेगे’ या थिमवर लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर या अच्छे दिनची गडकरी यांनीच मध्यंतरी जोरदार खिल्ली उडवली होती. ‘अच्छे दिन गले की हड्डी बन गयी’ असे ते काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. ‘आम्ही सत्तेवर येऊ की नाही याची खात्रीच नसल्यामुळे आश्वासने देत गेलो’ असे विधान एका वाहिनीच्या कार्यक्रमात केले होते. त्यानंतर नुकतेच त्यांनी जो स्वत:चे घर सांभाळू शकत नाही तो देश काय सांभाळेल, असे सुचक विधान केले होते, जे नरेंद्र मोदींना तंतोतंत लागू पडते. ही सर्व विधाने त्यांच्या मनातील खदखद आहे का त्यांना काही सुचवायचे आहे? गडकरी एकामागून अशी धाडसी विधाने करत आहेत हा संघाच्याच रणणीतीचा भाग असू शकतो, असे राजकारणातील काही चाणक्यांना वाटत आहे. कारण सध्या मोदी हे सर्वात लोकप्रिय असले तरी एनडीएतील काही घटकपक्षांना त्यांचे नेतृत्व मान्य नाही. भाजपाला आगामी लोकसभा निवडणुकीत काठावरचे बहुमत मिळाले, तर पंतप्रधानपदासाठी पर्याय म्हणून नितीन गडकरी यांचे नाव पुढे येऊ शकते. मात्र गडकरी हे पंतप्रधानपदाची दावेदारी लोकसभा निवडणूकीच्या निकालांनंतर पक्षीय बलाबलावर अवलंबून असेल. दुसरे मोदींच्या कार्यशैलीला अनुकूल नसलेल्या आणि भाजपवर नाराज मतदारांना गडकरींच्या रुपाने आकर्षित करण्याचा सुध्दा एक प्रयोग असण्याची शक्यता असण्यास वाव आहे.
अर्थात ह्याला पक्षीय मान्यता मिळाली तरी राजमान्यता ही मतदारांच्या हातात आहे, त्यामुळे गडकरी पंतप्रधान पदाचे दावेदार सिध्द होण्यासाठी तो प्रयोग होणे गरजेचे आहे. गडकरी विरोधी गोटातील अनेकांना चालतात. उद्या कुण्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर पंतप्रधान म्हणून विरोधी तंबूतील अनेक पक्ष गडकरींच्या पाठीशी उभे राहतील, असा संघाचा ‘प्लॅन बी’ राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यामुळे गडकरींची गाडी त्यांच्या एक्स्पे्रसवर सुसाट सुटली आहे. मी पंतप्रधान होण्याचा प्रश्नच नाही. मी ज्या ठिकाणी आहे तेथे आनंदी आहे. खरेतर मीडियात माझ्या पंतप्रधान बनण्याबाबत बातम्या येताच कशा याचे आश्चर्य वाटते. मी ज्या पदावर आहे तेथे खूप काम करायचे आहे, असे त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. मात्र गडकरी व वाद हे समीकरण सुटायला तयार नाही. या सर्व संशयकल्लोळात घडलेली महत्वपूर्ण घटना म्हणजे गुरुवारी लोकसभेत गडकरीच्या खात्यासंबंधीत प्रश्नावर चर्चा सुरु असतांना त्यांनी देशातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी केलेल्या चांगल्या कामाचे कौतूक खुद्द सोनिया गांधी यांनी बाकं वाजवून केले. स्वत: सोनिया बाकं वाजवत असल्याने सर्व काँग्रेस खासदारही गडकरींच्या कौतुक सोहळ्यात सहभागी झाले. यामुळे गडकरींसारखा मुस्सद्दी नेता हूरळून जाणार नाही मात्र मोदी-शहा या जोडीची कार्यपध्दती पाहता गडकरींनी जरा सांभाळून राहिले पाहिजे. २०१३ पासून मोदींना पर्याय म्हणून ज्या-ज्या नेत्याकडे पाहिले गेले त्यास पध्दतशिरपणे बाजूला काढण्यात आले. यास भाजपाचे भिष्मपितामहा मानले जाणारे लालकृष्ण आडवाणीही अपवाद नाहीत. अजून लोकसभा निवडणूकांना तिन ते चार महिने अवकाश आहे. या काळात काय उलाथापालथी घडतात, यावर पुढील राजकीय मोदी व गडकरींचे भवितव्य अवलबूंन आहे. म्हणतात ना, ‘जो जीता वो सिकंदर’ आता भावी पंतप्रधान पदाच्या या शर्यतीत कोण सिकंदर ठरतो, या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देईल, तो पर्यंत गडकरींनी त्यांच्या सुसाट एक्स्प्रेसच्या वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. संपुर्ण महाराष्ट्राला मराठी माणूस पंतप्रधान झाल्याचे बघायचे असेल, यात तिळमात्र शंका नाही!
Post a Comment