महाराष्ट्रात शिवसेनेने घेतलेल्या आक्रमक भुमिकेमुळे युतीच्या विषयावरुन भाजपाची कोंडी झाली आहे. सेना भाजपावर सातत्याने विखारी बाण सोडत असतांना भाजपा अजूनही सेनेला गोंजारत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पाच
राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा जमीनीवर आपटल्यामुळे भाजपाचे मित्रपक्षांवरील प्रेम उफाळून आले आले आहे. यासह खाजगी सर्व्हेमध्ये भाजप विरोधी वातावरण ठळकपणे समोर आल्याने भाजप नेत्यांनकडून शिवसेनेला
मित्रधर्माची आठवण करुन देण्यात येत आहे. युतीसाठी महाराष्ट्रातील भाजपानेते आग्रही असतांना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने धोबीपछाड देत आहेत. यामुळे युतीचा तिढा आता थेट
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जेवणाच्या टेबलवर सोडणविण्याची खेळी भाजपातील चाणक्यांनी आखली आहे.
भाजप आणि शिवसेनेमधील युतीबाबतचा पेच आणि या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर कुरघोड्या करण्यासाठी सुरू असलेले डावपेच, हा पेच आणि डावपेचांचा खेळ अलीकडे जोरात सुरू आहे. सत्तेत एकत्र राहून प्रत्यक्षात दोन्ही पक्ष मात्र
विरोधी पक्षांच्या भूमिकेत वावरत आहेत. या खेळात बघता बघता साडेचार वर्ष निघून गेले. आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास अवघा एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला असतांना भाजप-शिवसेना युती
होणार की नाही? हे अद्याप ठरलेले नाही. शिवसेना आमचा जुना मित्र असल्याने त्यांच्याकडून युतीची अपेक्षा असल्याचे विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले मात्र भाजपा हा लाचार पक्ष नाही, युतीसाठी आम्ही याचना
करणार नाही, अशी भुमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. यास प्रतिउत्तर म्हणून महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ राहणार असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटल्याने युतीची वाट अजूनही खडतर असल्याचे
स्पष्ट झाले आहे.
२०१४च्या निवडणुकीत शिवसेनेने २० जागा लढवल्या होत्या आणि त्यातल्या १८ जिंकल्या होत्या. या वेळी शिवसेना २२ जागांची मागणी करत अडून बसली आहे. तर भाजपने महाराष्ट्रातल्या २४ जागा लढवल्या होत्या.
त्यातल्या २३ जागांवर पक्षाला विजय मिळाला होता. आता भाजप २४ पेक्षा कमी जागांचा विचार करायला तयार नाही आणि त्यामुळे या २ जागांवरूच यंदा युतीचे गणित जुळता जुळत नाही. युती होणार का? या प्रश्नाचे उत्तर
भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे मागितले आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी त्यांनी ३१ जानेवारीपर्यंतची डेडलाईन दिली आहे. यामुळे गेली चार वर्षे मनाच्या कुपीतील बंदिस्त ठेवलेले उत्तर आता मात्र उद्धव ठाकरे
यांना द्यावे लागेल. या उत्तराने महराष्ट्रच्या राजकारणात सर्वांचे लक्ष लागून असलेले कुतूहलही संपुष्टात येईल.
२०१४ मध्ये मोदी लाटेवर स्वार होत देशातील सर्वच राज्यात भाजपाने लोकसभा निवडणुकीत यश संपादन केले होते, मात्र आता ती परिस्थिती राहिलेली नाही. याची जाणीव भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना देखील आहे. त्यामुळे २०१९ साली
देशात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी त्यामुळेच प्रत्येक राज्य भाजपासाठी महत्त्वाचे आहे. यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान ही मोठी राज्य भाजपासाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळेच शिवसेनेने स्वबळाची घोषणा
केली असली तरी किमान लोकसभा निवडणुकीत युतीसाठी भाजपा प्रयत्नशिल आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व एकमेकांशी हातमिळवणी करण्यास तयार आहेत, पण दोघांनाही एकमेकांवर कुरघोडी
करण्याचीही इच्छा असल्याने युतीचा तिढा सुटतांना दिसत नाही. गेल्या चार वर्षात शिवसेना आणि भाजपमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत. सर्व नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली. त्यामुळे युतीचा तिढा सोडवण्याचा विडा थेट पंतप्रधान
मोदींनी उचलला आहे. मोदींनी उद्धव यांना दिल्लीत जेवणाला बोलावण्याची खेळी भाजपातर्फे खेळण्यात येत आहे. युती झाली नाही तर भाजपासोबत सेनेचेही नुकसान आहेत! कारण १९८५ नंतर कोणताच राजकीय पक्ष स्वबळावर सत्तेवर
येऊ शकलेला नाही. त्यामुळे आघाडी, युतीशिवाय पर्यायच नाही हे वास्तव आहे. वास्तविक मतविभाजनाच्या धोक्यामुळे भाजप आणि शिवसेना या दोघांनाही आतून युती हवी आहे. नाहीतर पंढरपूरच्या मेळाव्यात युतीचा निर्णय उद्धव
ठाकरेंनी जनतेच्या कोर्टात टाकलाच नसता. शिवसेना समविचारी असल्याने आमच्यासोबतच येईल. वेगळे लढल्यास दोघांचाही नुकसानीचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला नसता. काँग्रेसविरोधी मतांची बेरीज आणि हिंदुत्व
यावर भाजप-सेना युतीची उभारणी आहे.
युतीच्या विषयावरुन भाजपात एकमत असले तरी शिवसेनेत दोन गट पडले आहेत, यातील एक वरिष्ठ गट युतीसाठी आग्र्रही आहे यात बहुतांश विद्यमान खासदारांचा समावेश आहे मात्र याच
वेळी दुसरा एक गट स्वबळासाठी आग्रही आहे यात लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असलेल्यांचा भरणा जास्त आहे. यामुळे देखील सेनेत अस्वस्थता वाढत आहे. यात युतीसाठी दिल्लीसाठी फडणवीस व दानवेंवर दबाव वाढत आहे.
परिणामी भाजपची महाराष्ट्रातील अवस्था ‘वाकेन पण मोडणार नाही’ अशी झाली आहे. बर्याचवेळा राजकारणात वाकायला लागते. तात्पुरते वाकले तरी समोरच्याला धडा कसा शिकवायचा हे भाजपने नुकत्याच झालेल्या अहमदनगर
महापालिका निवडणुकीत दाखवून दिले आहे. या निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. वास्तविक सर्वाधिक २४ जागा जिंकून शिवसेना मोठा पक्ष बनला होता. भाजपकडे १४ जागा होत्या. भाजप-सेना एकत्र आली असती तर
सत्ता मिळाली असती. पण भाजपने १८ नगरसेवक असणाऱया राष्ट्रवादीला बरोबर घेत आपला महापौर केला. शिवसेनेला सत्तेपासून लांब ठेवले. या शिवाय स्वळावर लढण्याचा निकाल काय येतो याची चाचपणी सेनेने जळगाव, नाशिक
व धुळे महापालिकेसह राज्यातील काही नगरपालिकांमध्ये करुन घेतली आहे. यामुळे युती सेनेच्याही फायद्याची आहे. मात्र गेल्या चार वर्षात भाजपाने केलेल्या कुरघोडीचा वचपा काढतांना सेना दिसत आहे, हे तितकेच खरे आहे. या
कुरघोडीच्या राजकारणात मित्रधर्म किंवा लाचारी यांना फारसे महत्व नसतेच, असते ते फक्त सत्तेचे राजकारण, हे कटूसत्य सर्वसामान्य मतदारांना कधीच पचवता आले नाही किंबहूना ते समजलेच नाही, हे देखील उघड सत्य आहे.
Post a Comment