कर‘नाटक’ : ‘ऑपरेशन लोटस’ पार्ट टू


कर्नाटकात सत्तासंघर्ष पुन्हा एकदा शिगेला पोहचला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या सात महिन्यांत राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. ही पहिली वेळ नसून याआधी दोन वेळा भाजप व काँग्रेसचे हे कर‘नाटक’ देशाने पाहिले आहे. निवडणुकित बहूमत मिळवणार्‍या पक्षाला सहजासहजी सत्तास्थापन करता येत नाही. सत्तेची रस्सीखेच आणि राजकीय अस्थिरता याचा खेळ सुरु राहतो, हा २००८ पासूनचा अनुभव आहे. काँग्रेस व जेडीएसमधील वादात भाजपा स्वत:ची पोळी शेकून घेत कर्नाटकातील काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावण्याचे काम भाजपा करत आहे. संक्रातीच्या मुहुर्तावर कर्नाटकातल्या आघाडी सरकारवर संक्रांत येण्याची शक्यता असून १६ जानेवारीनंतर सत्तापालट होण्याचे संकेत आहेत.


२००८ मध्ये एकूण २२४ जागांपैकी भाजपाने ११० जागा जिंकत सर्वात मोठी पार्टी होण्याचा मान मिळवला मात्र ते बहुमतासाठी लागणार्‍या ११३ च्या जादूई आकड्यापासून केवळ तिन पावले दुर होते. तेंव्हा काँगे्रस ७९ तर जेडीएस २८ जागा जिंकत भाजपासमोरील अडचणी वाढवल्या होत्या. कर्नाटकातील राजकीय नाट्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री येदियुरप्पा यांची खुर्ची धोक्यात आली होती. यावेळी भाजपाने ‘ऑपरेशन लोटस’ राबवले. असे सांगितले जाते की, येदियुरप्पाने धनशक्तीचा वापर करत काँग्रेस व जेडीएसचे आमदार फोडले. २००८ ते २०१३ दरम्यान दोनही विरोधी पक्षाच्या २० आमदारांनी राजीनामे दिल्याने पोटनिवडणूक झाली. यात विजय मिळवत भाजपाने बहुमत हस्तगत केले. यामुळे आमदारांचा घोडेबाजार कर्नाटकसाठी (किंबहूना आपल्या देशासाठीही) नवीन नाही! यंदा २०१८ मध्ये २२४ जागांपैंकी भाजपकडे १०४, काँग्रेस ८०, जेडीएस ३७, बीएसपी १, केपीजेपी १ आणि अपक्षकडे १ जागा आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष असतांना काँग्रेसने जेडीएससोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. मात्र त्याआधी मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. 

भाजपने १०४ आमदारांच्या जोरावर कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदावर दावा केला. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली होती. मात्र बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच येडीयुरप्पा यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली. यानंतर काँग्रेस व जेडीएचा संसार गुण्यागोविदांना चालला असे नाही, गत सात महिन्यांपासून त्यांच्यात सातत्याने कलह होतांना दिसत आहे, अगदी घटस्पोटापर्यंत वाद चिघळले. गत दोन दिवसांपासून त्यांच्या संसाराला भाजपाची पुन्हा एकदा नजर लागली आहे. भाजपाने ‘ऑपरेशन लोटस’ पार्ट २ राबवत जेडीएस-काँग्रेसचे आघाडी सरकार पाडण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. जनता दल आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारला अल्पमतात आणून भाजपचे सरकार सत्तेवर आणण्याची तयारी भाजप नेत्यांनी पूर्ण केल्याचे मुंबईतील घडामोडींवरुन दिसत आहे. या बंडखोरीची पार्श्‍वभूमी पाहिल्यास असे लक्षात येते की, येथे दुसर्‍यांच्या भांडणात भाजपा स्वत:ची राजकीय पोळी शेकून घेण्याचा प्रयत्न करत आहे. कारण मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्यानंतर माजी मंत्री रमेश जारकीहोळी असंतुष्ट आमदारांना संघटित करण्यात गुंतले आहेत. सर्व असंतुष्ट आमदारांचा राजीनामा घेऊन युती सरकार अस्थिर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जारकीहोळी यांनी हाती घेतलेल्या कार्याला भाजपने साथ दिली आहे. हे करत असतांना ‘ऑपरेशन कमळ’च्या बदनामीपासून वाचण्यासाठी भाजप यावेळी सावधगिरीने पावले टाकत आहे. प्रथम काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा द्यावा. त्यातून सरकार अस्थिर होऊन कोसळेल. त्यानंतर असंतुष्ट आमदारांना भाजपात घेऊन त्यांना योग्य स्थान देण्याचे तंत्र यावेळी भाजपने अवलंबिले आहे. 

या असंतोषाची पाळेमुळे काँग्रेसच्या सत्तास्थापनेदरम्यानच रोवली गेली आहेत. अल्पमतात असल्याने सरकार स्थापनेदरम्यान काँग्रेसने थोडी पडती भूमिका घेतली. खातेवाटपातही महत्त्वाची खाती जनता दलाकडे गेली. मंत्रिमंडळाची रचना करताना काँग्रेसने गेल्या मंत्रिमंडळातील काही ज्येष्ठ नेत्यांना संधी दिली नाही आणि तेथेच कटकटी सुरू झाल्या. मंत्रिपद द्या, अन्यथा पक्ष सोडू, अशी उघडउघड धमकी नेत्यांकडून दिली जाऊ लागली. याकाळात थेट राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्यात आले. याचा राजकीय फायदा घेणार नाही तो भाजपा कसा? भाजपने तर काँग्रेस आणि जनता दलातील बंडखोर नेत्यांना पक्षाची द्वारे सताड उघडी ठेवली. या वादाचे मराठी कनेक्शन देखील आहे. मराठी व कानडी वादामुळे महाराष्ट्र विरुध्द कर्नाटक असा सामना नेहमी रंगतो याच्या वेदना आपल्यापेक्षा बेळगावसह सीमावर्ती भागाला जास्त माहिती आहे. मात्र महाराष्ट्राचा व्देष करणार्‍या कर्नाटकच्या नेत्यांच्या बुडाखाली सुरुंग लावण्याचे काम मुबईतूनच होत आहे, याचा कदाचित अभिमान सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांना वाटत असेल. या तोडाफोडीची जबाबदारी मुंबईतील एका भाजपा नेत्यावर काँग्रेस आमदारांची जबाबदारी सोपवण्यात आली असून कर्नाटकातील १० काँग्रेस आमदारांची सोय मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. 

दुसरीकडे कर्नाटकातील कुमारस्वामी सरकारमधील एच. नागेश आणि आर. शंकर या दोन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठींबा काढून घेतला आहे. त्यामुळे सरकारला मोठा हादरा बसला असून दोन दिवसांपासून सुरु असलेल्या सरकार कोसळण्याच्या चर्चेचा हा एक भाग आहे. काँग्रेसचे पाच आमदार मंत्रिपद न मिळाल्याने पक्षावर नाराज आहेत. काँग्रेसच्या वाट्याची ८ मंत्रिपदे काही दिवसांपूर्वी भरण्यात आली. त्यात स्थान न मिळाल्याने तिन आमदार नाराज आहेत. तर दोन जणांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आल्याने ते नाराज आहेत. नाराजांमध्ये बेळगावच्या रमेश जारकीहोळी यांचाही समावेश आहे. या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटकात पुन्हा राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ’काँग्रेसचे असंतुष्ट आमदार भाजपमध्ये जाणार का?’ हा सवाल महत्त्वाचा आहे. लोकसभेच्या तोंडावर होत असलेल्या या राजकीय उलथापालथीला प्रचंड महत्व आहे. कारण कर्नाटकात लोकसभेच्या २८ जागा आहेत. सध्याची मोदी सरकारची वाटचाल पाहता २०१९ मध्ये होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला एक-एक जागा महत्त्वाची आहे. मात्र ही खेळी भाजपाला सावधपणे खेळावी लागणार आहे. कारण ही दुधारी तलवार आहे. यात भाजपा विधानसभा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असली तरी हा बुंमरॅम होवू नये, कारण पैशाच्या जोरावर भाजपा काहीही करु शकते, अशी ओरड काँगे्रेस करु शकते याचा विपरित परिणाम लोकसभा निवडणुकीत झाल्यास त्यामुळे काही जागा कमी होण्याची भीती काही चाणक्यांना सतावत आहे.

Post a Comment

Designed By Blogger