पाकिस्तानातील अण्वस्त्र अतिरेक्यांच्या हाती जाणे शक्य नाही - ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अजित पाटणकर


देशात विजेच्या टंचाईमुळे उद्योगधंदे, कृषी क्षेत्राला अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. भारतातील ऊर्जास्रोत हे मर्यादित स्वरूपात असल्याने वीजनिर्मितीवर अनेक बंधने येत आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे जलविद्युत तसेच मर्यादित कोळसा खाणींमुळे औष्णिक प्रकल्पातून वीजनिर्मितीपुढे अनेक मर्यादा आहेत. आपल्याला विकास साधायचा असेल तर अणुऊर्जेशिवाय पर्याय नाही. यामुळे अणुऊर्जेकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अजित पाटणकर यांनी व्यक्त केले.
येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कार्यक्रमानिमित्त मुंबईच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे सल्लागार डॉ. अजित पाटणकर हे आले होते. या वेळी त्यांनी अणुऊर्जेच्या गरजेसह अमेरिका-उत्तर कोरियामधील संभाव्य अणू युद्ध, पाकिस्तानातील अण्वस्त्रांची सुरक्षितता आदी विषयांवर मते मांडली. कोणत्याही देशाच्या प्रगतीला त्या देशातील पूरक वीजनिर्मिती आवश्यक असते. वीजनिर्मितीसाठी प्रामुख्याने भूगर्भातील कोळसा, वायूंवर भर दिला जातो. आपल्याकडील कोळशाचे भूमिगत साठे, कोळशाच्या खाणी वीजनिर्मितीसाठी आणखी काही वर्षे उपयोगी पडू शकतील. यामुळे आपल्याकडे अणुऊर्जा, सौरऊर्जा हे दोन पर्याय समोर आहेत. सौर ऊर्जेपासून वीजनिर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र ही प्रक्रिया वेळखाऊ अन् खर्चीक आहे. यामुळे अणू ऊर्जेपासून वीजनिर्मिती महत्त्वाची ठरते. अणुऊर्जा ही कमी खर्चात उपलब्ध होते. त्या प्रकल्पाची वीज ही जलविद्युत अथवा औष्णिक प्रकल्पांपेक्षा स्वस्त आहे. जपानमधील फुकुशिमातील अणुभट्टय़ांमधील अपघातानंतर या विषयावर चर्चा सुरु झाली. त्यात महाराष्ट्रातील जैतापूर प्रकल्पाचा वाद सुरू आहेत. मात्र फुकुशिमा दुर्घटनेत किरणोत्साराने अद्याप एकही मृत्यू झालेला नाही. किरणोत्सर्जनाचा काहीअंशी परिणाम लोकांवर झाला आहे. फुकुशिमा दुर्घटना त्सुनामीमुळे घडली. जे मृत्यू झाले, ते भूकंप आणि त्सुनामीमुळे झालेले आहेत. भारतात गेल्या ४० वर्षांपासून २१ अणुऊर्जानिर्मिती केंद्रांमधून वीज निर्माण केली जात आहे. या काळात एकाही अणुऊर्जानिर्मिती प्रकल्पांमध्ये दुर्घटना झालेली नाही. आजपर्यंत एकाही व्यक्तीला या प्रकल्पांमुळे आपला जीव गमवावा लागलेला नाही. या प्रकल्पाचे अन्य फायदेही आहेत. हवामान बदलामुळे होणारे परिणाम विचारात घेतले तरी अणुऊर्जेचा लाभ अधिक आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अणुऊर्जेचा पहिला प्रयोग अत्यंत वाईट झाला असल्याने या ऊर्जेकडे नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. यामुळे अणुऊर्जेचा वापर होणे आवश्यक आहे. अमेरिका-उत्तर कोरियामधील वादाबद्दल त्यांनी दोन्ही देश अण्वस्त्रधारी असले तरी दोघांची आर्थिक, राजकीय, सामाजिक परिस्थिती वेगळी असल्याचे सूचित केले. दोघांमध्ये शक्तिशाली कोण, हे दाखविण्यासाठी युद्धाची भाषा वापरली जात आहे. मात्र, दोन्ही देशांना थेट परमाणू शस्त्रांचा वापर करणे इतके सोपे नाही. यामुळे तिसरे महायुद्ध सुरू होणे शक्य नाही. पाकिस्तानातील अण्वस्त्रांच्या सुरक्षिततेबाबत डॉ. पाटणकर यांनी कोणत्याही अस्थिर देशातील अशी शस्त्रे अतिरेक्यांच्या हाती पूर्णपणे जाणे शक्य नसते, मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. सध्या तरी पाकिस्तानातील परिस्थिती नियंत्रणात असल्याने भारताने भीती बाळगण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी नमूद केले. जपानमधील फुकुशिमातील अणुभट्टय़ांमधील अपघातानंतर या विषयावर चर्चा सुरु झाली. त्यात जैतापूर प्रकल्पाचा वाद सुरू आहेत. मात्र फुकुशिमा दुर्घटनेत किरणोत्साराने अद्याप एकही मृत्यू झालेला नाही. किरणोत्सर्जनाचा काहीअंशी परिणाम लोकांवर झाला आहे. फुकुशिमा दुर्घटना त्सुनामीमुळे घडली. जे मृत्यू झाले, ते भूकंप आणि त्सुनामीमुळे झालेले आहेत.

Post a Comment

Designed By Blogger