जळगाव जिल्हय़ाला सोईच्या राजकारणाची कीड


जळगाव जिल्हय़ाला सोईच्या राजकारणाची कीड लागली आहे. त्यास महापालिका, जिल्हा परिषददेखील अपवाद नाही. जळगाव महापालिकेत मनसे, शिवसेना नेते आणि खान्देश विकास आघाडी एकत्र आहेत. जिल्हा परिषदेत भाजपने सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसची मदत घेतली आहे. बहुतांश नगरपालिका, पंचायत समित्यांमध्येही अशीच परिस्थिती आहे. नुकत्याच पार पडलेल्या पारोळा शेतकी संघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार यांच्या सत्ता केंद्राला सुरुंग लावण्यासाठी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. सतीश पाटील आणि भाजपचे खासदार ए. टी. पाटील एकत्र आले. मात्र सोईच्या राजकारणाला कंटाळलेल्या मतदारांनी त्यांना दणका देत शिवसेनेला कौल दिला. याहून काहीशी वेगळी परिस्थिती वरणगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दिसली.

जळगाव जिल्हय़ात पारोळा आणि भुसावळ तालुका शेतकी संघाच्या निवडणुका झाल्या. त्यासोबत वरणगावच्या नगराध्यक्ष पदाचीही निवडणूक झाली. या तिन्ही निवडणुकांमध्ये पक्ष हितापेक्षा व्यक्तिगत राजकारणाची झालर दिसून आली. पारोळा तालुका शेतकी संघ हा गेल्या २५ वर्षांपासून माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या ताब्यात आहे. यापूर्वी संघाच्या निवडणुका अविरोध झाल्या. आता २५ वर्षांनंतर प्रथमच मतदान झाले. चिमणराव पाटलांच्या सत्ताकेंद्राला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादी-भाजप एकत्र आले. मात्र शिवसेनेने सर्वच्या सर्व १५ जागा जिंकून आपले वर्चस्व कायम ठेवले. यामुळे पारोळा येथे सोईच्या राजकारणाला नाकारण्यात आल्याचे दिसून आले. मात्र येथे एका मतदाराने मतदान पत्रिकेत ‘सर्वच पुढारी चोर आहेत’, असे लिहून आपला संताप व्यक्त केला.

भुसावळमध्ये भाजपचे आमदार संजय सावकरे यांच्या गटाला आठ तर माजी आमदार संतोष चौधरी यांच्या गटाला सात जागा मिळाल्या. येथे पक्षासह व्यक्तिगत हितसंबंधावर केलेला प्रचार चर्चेत राहिला.

खडसे विरुद्ध जैन

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत खडसे गटाला सुरुंग लावत माजीमंत्री सुरेश जैन यांनी सत्ता ताब्यात घेतल्यानंतर, पारोळा शेतकी संघात खडसे गटाचे मानले जाणारे खासदार पाटील पराभूत झाले आणि आता वरणगाव नगरपालिकेतही खडसे गटाचा पराभव झाला आहे. जळगाव जिल्ह्य़ात पक्षापेक्षा स्वत:ला मोठे करण्याच्या नादात काँग्रेसचे अस्तित्व संपले असल्याचे सर्वश्रुत असताना जिल्ह्य़ाचे राजकारण त्याच वाटेवर निघाले आहे. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये सोईच्या राजकारणाची परंपरा कायम राहणार असल्याचे चित्र आहे.

गिरीश महाजन यांची काळे यांना मदत

वरणगाव नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीने नव्या राजकीय समीकरणाला जन्म दिला. येथे भाजप विरुद्ध भाजप अशी लढत झाली. एकेकाळी माजीमंत्री एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे सुनील काळे गेल्या काही दिवसांपासून पक्षापासून दुरावत चालले होते. नेत्यांच्या सोईच्या भूमिकांमुळे निष्ठावान कार्यकर्त्यांना नेहमीच डावलण्यात येते ही त्यांची सल होती. नगराध्यक्ष पदासाठी यंदाही त्यांचे नाव चर्चेत असताना खडसे गटाकडून रोहिणी जावळे यांचे नाव पुढे करण्यात आले. यामुळे दुखावलेल्या काळेंनी बंडाचा झेंडा फडकावला. वरणगाव पालिकेत १८ सदस्य आहेत. त्यात भाजपचे आठ, राष्ट्रवादी काँग्रेस पाच, अपक्ष चार आणि शिवसेना एक असे पक्षीय बलाबल आहे. काळेंच्या नाराजीला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रसद पुरवली. त्यासाठी महाजनांचे कट्टर समर्थक तथा भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी वरणगावात तळ ठोकून होते. भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होऊन राष्ट्रवादीच्या मदतीने काळे यांनी बाजी मारली. काळे यांना ११ तर जावळे यांना सात मते पडली.

Post a Comment

Designed By Blogger