दिवाळीमुळे जळगाववर सुवर्णझळाळी


सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये सराफ बाजारावर आलेली मंदीची मरगळ दूर होत आहे. दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर सोने खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यास दोन लाखापर्यंतच्या सोने खरेदीवर पॅनकार्ड सक्ती हटविल्याचे महत्त्वाचे कारण आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्य़ात केळी व कापसाचे प्रचंड नुकसान झाल्याने सोने खरेदीवर परिणाम झाला. अन्यथा उलाढाल आणखी विस्तारली असती.
जळगावमध्ये एकूण १०८ सुवर्ण पेढय़ा असून या बाजाराची वार्षिक उलाढाल १५० ते २०० कोटींच्या घरात असल्याचा अंदाज आहे. निश्चलनीकरण, जीएसटी, ५० हजार रुपयांच्या सोने खरेदीला पॅनकार्डची सक्ती आदी कारणांमुळे कित्येक महिन्यांपासून सराफ बाजारावर मंदीचे सावट आहे. जळगाव जिल्हय़ात वर्षभरात सराफ बाजारपेठेतील उलाढाल ४० टक्क्यांपर्यंत कमी झाली होती. दागिने घडविण्याचे काम करणारे सुमारे सहा हजार कारागीर करतात तर सोने-चांदी आखणी करणारे दीड हजार कारागीर आहेत. मंदीमुळे अनेक कारागीर बेरोजगार झाले. ५५ वर्षांपूर्वी सोने नियंत्रण कायदा आल्यावर सुवर्णनगरीवर असेच संकट कोसळले होते. त्या कायद्याचा जाच संपुष्टात आल्यानंतर या बाजाराने पुन्हा भरारी घेतल्याचा इतिहास आहे. चालू वर्षांत महिनाभरापासून मंदीची स्थिती काहीशी बदलत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठय़ा प्रमाणात उलाढाल झाल्याने दिवाळीत या व्यवसायाला पुन्हा सोन्याचे दिवस येतील, अशी अपेक्षा व्यावसायिक व्यक्त करीत आहे. त्याचा आतापासून सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. जळगावचे सोने देशभरात प्रसिद्ध आहे यामुळे शुद्ध सोने खरेदीसाठी पुणे, मुंबईसह इंदूर, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड, बंगळूरु आदी शहरांतून ग्राहक मोठय़ा संख्येने येथे येतात. दागिन्यांचे नवीनतम प्रकार, सोने देणे असो वा घेणे चोख व्यवहार हे या बाजारपेठेचे वेगळेपण. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यास सराफ व्यावसायिकांनी लक्ष दिल्यामुळे देशातील सोन्याची महत्त्वाची बाजारपेठ म्हणून जळगाव नावारूपास आले आहे. मंगळवारी धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशी व लक्ष्मीपूजनाला सोने खरेदीला विशेष महत्त्व असते. यासाठी अनेकांनी प्रसिद्ध सोन्याच्या पेढय़ांवर आगाऊ नोंदणी करून ठेवली आहे. वर्षभरापासून मंदीच्या सावटात सापडलेल्या सुवर्णनगरीला झळाळी प्राप्त होत असताना परतीच्या पावसाचे त्यात अडथळे आले. मागील तीन दिवस परतीच्या पावसाने जिल्ह्य़ास झोडपले. त्यात प्रामुख्याने कापूस व केळी उत्पादकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. हे नुकसान झाले नसते तर सुवर्ण बाजाराला आणखी चमक आली असती, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.

Post a Comment

Designed By Blogger