महाजन यांचा खडसेंना पुन्हा शह


माजी मंत्री एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे अध्यक्ष असलेल्या जळगाव जिल्हा बँकेने संत मुक्ताई शुगर अॅण्ड एनर्जी (मुक्ताईनगर) या कारखान्याला ५१ कोटी २५ लाखांचे कर्ज मंजूर केले आहे. विशेष म्हणजे या साखर कारखान्याच्या संचालिकादेखील रोहिणी खडसे याच आहेत. परंतु या कर्जाला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीच विरोध केला आहे. याबाबत त्यांनी बँकेच्या कार्यकारी संचालकांना पत्रदेखील दिले आहे. महाजन यांनी खडसेंच्या विरोधात पुन्हा एकदा उघड भूमिका घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून शांत असलेला खडसे-महाजन वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे. संत मुक्ताई साखर कारखान्याने यंत्रसामग्री आधुनिकीकरण आणि १२ वॅट क्षमतेच्या वीजनिर्मिती प्रकल्पाकरिता मध्यम मुदतीचे ५७.१५ कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी जळगाव जिल्हा बँकेकडे केली. यावर बँक प्रशासनाने नकारात्मक टिप्पणीदिल्यानंतरही ५१ कोटी २५ लाखांचे कर्ज मंजूर करण्यात आले. जिल्हा बँक ही खडसेंच्या ताब्यात आहे तसेच कर्जही त्यांच्याच कन्या असलेल्या साखर कारखान्याला देण्यात आले. यामुळे खडसेंविरोधात एकाही संचालकाने बोलण्याचे धाडस दाखविले नाही. परंतु या विषयात आता गिरीश महाजन यांनी उडी घेतली आहे. जिल्हा बँकेची निर्मिती प्राधान्याने सहकारी संस्थांना पतपुरवठा करण्यासाठी झाली आहे. खासगी अथवा पब्लिक लिमिटेड कारखान्यांना मोठय़ा प्रमाणात बँकेद्वारे कर्जपुरवठा करणे हे शेतकऱ्यांचे व्यापक जनहित लक्षात घेता सयुक्तिक होणार नाही, अशा आशयाचे पत्र त्यांनी जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकांना दिले आहे. या कारखान्यावर आधीच कर्नाटक बँकेचे २५४ लाख आणि युनियन बँकेचे १८५१.२७ लाखांचे कर्ज आहे. यामुळे उत्पादित होणाऱ्या साखरेवर देखील संबंधित बँकेचा ताबा असणार आहे. त्यात आधुनिकीकरणासाठी कर्ज दिल्यास परतफेडीकरिता अडचण येईल, असेही महाजन यांनी पत्रात नमूद करत गेल्या दोन वर्षांत झालेले उसाचे गाळप व सद्य:स्थितीबाबत कारखान्याच्या कारभारावर बोट ठेवले आहे.

जाहिरातीवरून खडसेंचे छायाचित्र गायब

खडसे-महाजन वाद नवीन नाही. मात्र गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी जुळवून घेतल्याचे चित्र होते. दोघांच्या समर्थकांनीही संयमाची भूमिका घेतली होती. मात्र महाजनांच्या या पत्रामुळे पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. याची प्रचीती शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेनंतर आली. जळगाव जिल्हा भाजपने मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्याची जाहिरात प्रकाशित केली. त्यातून खडसेंचे छायाचित्र गायब होते. यामुळे भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या विरोधात समाज माध्यमांत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. परिणामी, खडसे-महाजन समर्थक पुन्हा एकदा भिडले आहेत. त्यात साखर कारखान्याला कर्ज देण्याच्या मुद्दय़ावरून खडसे-महाजन परस्परांविरोधात उभे ठाकल्याने हा वाद पुन्हा ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत. कधीकाळी खडसे हे राज्यात भाजपचे सर्वात वजनदार नेते म्हणून ओळखले जायचे. तेव्हा गिरीश महाजन हे खडसे यांच्या शब्दाबाहेर नव्हते. मुख्यमंत्रिपदावरून डावलले गेल्याने खडसे यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्याकडे अनेक खात्यांची धुरा सोपविली गेली. पुढील काळात वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि मुख्यमंत्र्यांनी महाजन यांना बळ देत खडसे यांचे पद्धतशीरपणे खच्चीकरण चालविल्याची समर्थकांची भावना आहे. या एकंदर स्थितीत चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या खडसेंवर कुरघोडी करण्याची संधी महाजन गटाकडून सोडली जात नाही. त्याची नव्याने प्रचीती जिल्हा बँकेच्या निमित्ताने आली आहे.

हा आणखी एक धक्का

विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत खडसे यांचे कट्टर समर्थक जगवानी यांचा पत्ता कापून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाजन या जोडगोळीने महाजन यांनी पुरस्कृत केलेल्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. हा खडसे यांच्यासाठी मोठा धक्का होता. आता तर खडसे यांच्या कारखान्याला कर्ज देण्यास विरोध दर्शवून महाजन यांनी खडसे यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या खडसे यांच्यासाठी सध्या शांत बसण्याशिवाय पर्यायच नाही. मुख्यमंत्र्यांचे पाठबळ असल्याने महाजन हे खडसे यांच्याबरोबर उघडउघड दोन हात करीत असल्याचे बोलले जाते.

सदर लेख दैनिक लोकसत्ता मध्ये दि.१६ जुने २०१७ रोजी प्रकाशित झाला आहे. http://www.loksatta.com/maharashtra-news/eknath-khadse-girish-mahajan-marathi-articles-1493819/#tie_topcommentlist

Post a Comment

Designed By Blogger