नाथाभाऊ व सुरेशदादांचा राजकिय प्रवास अन् दुर्देवी योगायोग


जळगाव जिल्ह्याचे राजकारण गेल्या २५ ते ३० वर्षांपासून केवळ सुरेशदादा जैन व एकनाथभाऊ खडसे या दोन नावांभोवती फिरत राहिले आहे. या दोन्ही नेत्यांनी जिल्ह्याच्या राजकारणावरुन पकड कधीही ढिली होवू दिली नाही. मात्र दोन्ही नेते सत्तेच्या शिखरापर्यंत पोहचल्यानंतर अडचणीत आले. जळगाव महापालिकेतील घरकुल घोटाळ्यानंंतर सुरेश‘दादापर्व’ पर्व संपले व आता भोसरी जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणानंतर ‘नाथाभाऊ पर्व’ झोकाळत चालले आहे.

जळगाव शहराच्या विकासात सुरेशदादा यांचे महत्वपुर्ण योगदान राहिले. महापालिकेत त्यांचा एकछत्री अंमल होता. दुसरीकडे खडसे यांचीही जिल्हाभरात दबदबा होता. जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बँक, दुध संघांपासून अनेक संस्थावर त्यांनी पकड मिळवली. या सत्तासंघर्षात खडसे व जैन यांच्या राजकिय युध्द सुरुच होते. मात्र डिसेंबर २०१० मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकित खडसे यांचे चिरंजिव निखिल खडसे यांना पराभूत करुन राजकारणातील नवखे उमेदवार मनिष जैन यांना सुरेशदादा जैन यांनी निवडून आणले. यानंतर खडसे-जैन यांच्यात राजकिय संघर्ष उफाळून आला. यानंतर जळगाव महापालिकेतील विविध भ्रष्ट्राचारांच्या आरोपांच्या भोवर्‍यात अडकल्याने सुरेशदादा यांना तब्बल अडीच वर्ष तुरुंगवास घडला. (नाथाभाऊंनी मुलाच्या पराभवाचा हिशोब चुकता केला!, अशी खडसे समर्थकांची भावना आहे)जामीनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर जैन राजकारणापासून चार हाताचे अंतर ठेवून असल्याने दादापर्वाचा अस्त झाल्याचे मानले जात आहे. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकिनंतर राज्यात युतीचे सरकार आल्याने खडसे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आले. परंतू नशिबाने साथ न दिल्याने त्यांना क्रमांक दोनच्या मंत्रीपदावर समाधान मानावे लागले. परंतु जसे बुध्दीबळाच्या खेळात राजापेक्षा वजीराला जास्त महत्व असते तसेच महत्व खडसे यांना होते. त्यांच्याकडे महसूल, कृषीसह तब्बल आठ खात्यांचा कारभार होता. सर्वकाही सुरळीत असतांना कुख्यात डॉन दाऊदशी कथित संभाषण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. यानंतर त्यांच्यामागे शुक्लकाष्ठ लागले. भोसरी येथील जमीन बेकायदेशिररित्या खरेदी केल्याप्रकरणी खडसे चांगलेच अडचणीत आले. भ्रष्ट्राचाराच्या आरोपांमुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला परंतू ते लवकरच मंत्रीमंडळात परततील असे सातत्याने सांगण्यात येत असतांना आता झोटींग समिती व उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेमुळे त्यांचा पाय खोलात गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. खडसेंवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. यामुळे हा तपास एसीबीकडे वर्ग करण्यात आला असल्याने खडसेंेच्या अडचणीत भर पडली आहे. या उलथापालथीच्या राजकारणात खडसे नावाचे वादळ थोडेसे शांत झाले आहे. त्यांच्या सभोवतालची गर्दीही ओसरायला सुरुवात झाली आहे, हे कटूसत्य खडसे यांनीही आता स्विकारले आहे. एकेकाळी खडसेंच्या मागे धावणारेही आता हळूहळू गायब होवू लागले आहे. (तिच परिस्थिती सुरेशदादांच्या ‘७-शिवाजीनगर’ या निवासस्थानीही दिसून येते. एकेकाळी सतत गजबजणार्‍या या वास्तुलाच भयाणं शांततेचा त्रास होत नसेल ना?) यामुळे नाथाभाऊ पर्वाचा प्रवास मावळतीकडे सुरु झाला आहे, असे म्हणणे थोडेसे घाईचे ठरत असले तरी वास्तवतावादी आहे. याबद्दल खडसेंनी वेळोवेळी जाहीर नाराजी व्यक्त केली असल्याने यावर कोणीही आक्षेप घेवू शकणार नाही.

जिल्ह्याच्या विकासाला ब्रेक

खडसे यांनी मंत्रीपदाच्या काळात जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे तर खान्देशातील रखडलेल्या योजनांना गती दिली. आपले वजन वापरुन राज्य व केंद्र शासनाकडून कोट्यवधींच्या योजना मंजूर करुन आणल्या. मात्र खडसेंचे मंत्रीपद जाताच या योजना थंड बस्त्यात पडून आहेत. याच काळात भाजपाचे गिरीष महाजन यांना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताकदीची अतिरिक्त रसद पुरवरत खडसेंना पर्याय म्हणून उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळाल्यामुळे गिरीष महाजन यांना मदत झाली आहे. शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनाही राज्यमंत्रीपद मिळाले आहे. परंतु यामुळे महाजन व पाटील यांना जिल्ह्याचा नेता म्हणणे थोडे घाईचे व धाडसाचे ठरेल. मात्र या दोन्ही नेत्यांनी मतभेद व पक्षभेद दुर ठेवून नाथाभाऊंनी मंजूर केलेल्या कामांना पुर्ण करावे व खान्देशाचा विकासाचा बॅकलॉक भरुन काढावा, कारण सुरेशदादा राजकारणात सक्रिय नसल्यामुळे गेल्या अडीच वर्षात जळगाव शहराची काय अवस्था झाली आहे. हे सर्वांना माहिती आहे. आता नाथाभाऊ सक्रिय राजकारणापासून दुरावल्यास जिल्ह्याची वाताहत होवू नये हीच अपेक्षा!

Post a Comment

Designed By Blogger