भाजपाला मिळालेल्या यशाचे श्रेय खडसेंचे का महाजनांचे?


जिल्हा परिषदेत प्रथमच एक हाती सत्ता मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या जादूई आकड्यापासून भाजपा केवळ एक पाऊल मागे आहे. १५ पंचायत समित्यांपैकी ९ ठिकाणी भाजपाचाच झेंडा फडकणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. भाजपाला मिळालेल्या या नेत्रदिपक यशात रावेर लोकसभा मतदार संघाचा मोठा वाटा आहे. कारण खासदार रक्षा खडसे प्रतिनिधीत्व करत असलेल्या रावेर लोकसभा मतदार संघातून तब्बल २२ गटांमध्ये भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत. मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातून तर शतप्रतिशत भाजपा या सुत्रानुसार सर्व सहाही उमेदवार निवडून आले आहेत. दुसरीकडे खासदार ए.टी.पाटील प्रतिनिधत्व करत असलेल्या जळगाव लोकसभा मतदार संघात केवळ ११ उमेदवार निवडून आले आहेत. यातही त्यांच्या पारोळा तालुक्यातून भाजपाला भोपळाही फोडता आलेला नाही.

पंचायत समित्यांची आकडेवारी पाहता १३४ गणांपैकी ६६ जागा मिळवत भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. यातही रावेर लोकसभा मतदार संघातील जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड, यावल, रावेर, भुसावळ, येथे एकहाती सत्ता मिळवली आहे. चोपडा पं.स.वरही भाजपाचाच झेंडा फडकणार आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात चाळीसगाव पंचायत समितीत भाजपा व राष्ट्रवादीचे संख्याबळ सारखेच आहे. पाचोरा व अंमळनेर पं.स.त भाजपाचा झेंडा फडकला आहे. हा खासदार पाटील यांना दिलासा आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी कॉंग्रेसचे राध्येश्याम चौधरी यांनी जळगावचे खासदार हरवले आहेत, अशी पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल केली होती. याची प्रचिती निवडणूक काळात आली. कारण खासदार रक्षा खडसे संपुर्ण मतदारसंघ पिंजून काढत असतांना खासदार पाटील गायब होते. त्यांचे दर्शन केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हसावदच्या सभेत व्यासपीठावर झाले होते. याचाही फटका भाजपाला बसला आहे.

जिल्ह्यात भाजपाला मिळालेल्या नेत्रदिपक यशाचे श्रेय खडसेंचे का महाजनांचे? यावर आता चर्चा सुरु झाली आहे. खडसेंना भ्रष्ट्राचाराच्या आरोपांमुळे मंत्रीपद गमवावे लागल्याने ते मुळ प्रवाहापासून दुर गेले आहेत. याची सल जेवढी त्यांना आहे त्यापेक्षा जास्त त्यांच्या मतदारसंघात आहे. हा नाथाभाऊंवर अन्याय आहे, अशी अनेकांची भावना आहे. या सहानुभुतीचा फायदाही भाजपाला झालेला आहे, हे नाकारुन चालणार नाही! मुक्ताईनगरात खडसेंचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांचेही वर्चस्व आहे. मात्र तेथेही चारही गटात कमळ फुलले आहे. बोदवडमध्ये राष्ट्रवादीचीही ताकद असतांना तेथेही दोन्ही गटात भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहे. हा खडसेंचाच करिष्मा म्हणावा लागेल. त्या तुलनेत महाजन यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाने गेल्या पंचवार्षिकच्या तुलनेत एक जागा गमावली आहे. परंतू त्याच वेळेस त्यांनी पाचोर्‍यातून दोन जागा प्रथमच निवडणून आणल्या आहेत.

कोण बनेगा अध्यक्ष?

अध्यक्षपद मागासप्रवर्गातील महिलेसाठी राखीव असून या प्रवर्गातून भाजपाच्या ६ उमेदवार विजयी झाल्या आहेत. जि.प.अध्यक्ष पदासाठी जामनेर तालुक्यातील शहापूर-देऊळगाव गटातील कल्पना राजेश पाटील, चोपडा तालुक्यातील वर्डी - गोरगावले गटातील ज्योती पाटील, धरणगाव तालुक्यातील साळवा - बांभोरी बु.गटातील माधुरी अत्तरदे, रावेर तालुक्यातील पाल - केर्‍हाळे गटातील नंदा पाटील आणि ऐनूपर - खिरवड गटातील रंजना पाटील व शहापूर -देऊळगाव गटातील रजनी चव्हाण या दावेदार आहेत. गत तीन पंचवार्षिकचे सुत्रे पाहता ज्या तालुक्यातून जास्त विजयी उमेदवार त्या तालुक्याला अध्यक्षपदाचा मान मिळत आला आहे. या सुत्रानुसार जामनेर तालुक्यातील रजनी चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र गेल्या पंचवार्षिकला जामनेर तालुक्याला अध्यक्षपदाचा मान मिळाला असल्याने यंदा ही संधी दुसर्‍या तालुक्याला मिळण्याची शक्यता आहे. तसा संकेत गिरीश महाजन यांनी विजयी मिरवणूकीत दिला आहे. माधुरी अत्तरदे या धरणगाव तालुक्यातील एकमेव उमेदवार निवडून आल्या असून त्या आ.संजय सावकारे यंाच्या गटातील मानल्या जातात. यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता नाही. दुसरीकडे नाथाभाऊ व खा.रक्षा खडसे यांनी रावेर लोकसभा मतदार संघ पिंजून काढत यंदा तब्बल २२ उमेदवार निवडून आणले आहेत. यामुळे अध्यक्ष पदाच्या शर्यतीत ज्योती पाटील, नंदा पाटील व रंजना पाटील या तीन उमेदवार आहेत. यामध्ये नंदा पाटील या ना.महाजन यांच्या नातेवाईक असून त्यांच्या प्रचारासाठी ना.महाजन हे मुक्कामी देखील राहिले होते. यामुळे त्यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातून सर्व सदस्य निवडून आणणार्‍या आ.खडसे यंाची संमती महत्वाची ठरणार आहे. आ. हरिभाऊ जावळे यांनी ज्योती पाटील यांच्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. रंजना पाटील या नवख्या असल्या तरी त्यांचे नाव अचानक पुढे येण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद पक्षीय बलाबल

भाजपा - ३३

राष्ट्रवादी - १६

शिवसेना - १४

कॉंग्रेस - ४

तालुका निहाय -

चोपडा - भाजपा ३, राष्ट्रवादी १, शिवसेना १, कॉंग्रेस १,

यावल - भाजपा ३, राष्ट्रवादी ०, शिवसेना ०, कॉंग्रेस २,

रावेर - भाजपा ४, राष्ट्रवादी १, शिवसेना ०, कॉंग्रेस १,

मुक्ताईनगर - भाजपा ४, राष्ट्रवादी ०, शिवसेना ०, कॉंग्रेस ०,

बोदवड - भाजपा २, राष्ट्रवादी ०, शिवसेना ०, कॉंग्रेस ०,

भुसावळ - भाजपा १, राष्ट्रवादी १, शिवसेना १, कॉंग्रेस ०,

जळगाव - भाजपा २ , राष्ट्रवादी २, शिवसेना १, कॉंग्रेस ०,

धरणगाव - भाजपा १, राष्ट्रवादी ०, शिवसेना २, कॉंग्रेस ०,

अमळनेर - भाजपा २, राष्ट्रवादी २, शिवसेना ०, कॉंग्रेस ०,

पारोळा - भाजपा ०, राष्ट्रवादी २, शिवसेना २, कॉंग्रेस ०,

एरंडोल - भाजपा १, राष्ट्रवादी ०, शिवसेना २, कॉंग्रेस ०,

जामनेर - भाजपा ५, राष्ट्रवादी २, शिवसेना ०, कॉंग्रेस ०,

पाचोरा - भाजपा २, राष्ट्रवादी ०, शिवसेना ३, कॉंग्रेस ०,

भडगाव - भाजपा ०, राष्ट्रवादी १, शिवसेना २, कॉंग्रेस ०,

चाळीसगाव - भाजपा ३, राष्ट्रवादी ४, शिवसेना ०, कॉंग्रेस ०,

पंचायत समिती पक्षीय बलाबल

भाजपा - ६६

राष्ट्रवादी - ३२

शिवसेना - २६

कॉंग्रेस - ६

अपक्ष - ४

तालुका निहाय -

चोपडा - भाजपा ५, राष्ट्रवादी ५, शिवसेना २, कॉंग्रेस ०,

यावल - भाजपा ५, राष्ट्रवादी ०, शिवसेना ०, कॉंग्रेस ४, अपक्ष १,

रावेर - भाजपा ८, राष्ट्रवादी २, शिवसेना १, कॉंग्रेस १,

मुक्ताईनगर - भाजपा ६, राष्ट्रवादी १, शिवसेना १, कॉंग्रेस ०,

बोदवड - भाजपा ४, राष्ट्रवादी ०, शिवसेना ०, कॉंग्रेस ०,

भुसावळ - भाजपा ४, राष्ट्रवादी १, शिवसेना १, कॉंग्रेस ०,

जळगाव - भाजपा ३, राष्ट्रवादी ०, शिवसेना ५, कॉंग्रेस ०, अपक्ष २,

धरणगाव - भाजपा १, राष्ट्रवादी ०, शिवसेना ५, कॉंग्रेस ०,

अमळनेर - भाजपा ५, राष्ट्रवादी ३, शिवसेना ०, कॉंग्रेस ०,

पारोळा - भाजपा १, राष्ट्रवादी ४, शिवसेना ३, कॉंग्रेस ०,

एरंडोल - भाजपा ०, राष्ट्रवादी १, शिवसेना ४, कॉंग्रेस ०,अपक्ष १,

जामनेर - भाजपा १०, राष्ट्रवादी ४, शिवसेना ०, कॉंग्रेस ०,

पाचोरा - भाजपा ५, राष्ट्रवादी ३, शिवसेना १, कॉंग्रेस १,

भडगाव - भाजपा २, राष्ट्रवादी १, शिवसेना ३, कॉंग्रेस ०,

चाळीसगाव - भाजपा ७, राष्ट्रवादी ७, शिवसेना ०, कॉंग्रेस ०,

Post a Comment

Designed By Blogger