जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा सांभाळणारे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील प्रत्येक प्रचारसभेत बोलतांना नाथाभाऊ आमचे नेते असून ते लवकरच मंत्रीमंडळात परततील. तो पर्यंत मी काळजीवाहू पालकमंत्री असल्याचे सांगत प्रचंड टाळ्या मिळवल्या. मुख्यमंत्री देवेेंद्र फडणीवीस यांच्या जिल्ह्यातील एकमेव सभेत खडसेंचे भाषण होवू न देण्याची खेळी सफाईदारपणे खेळल्यानंतरही मुख्यमंत्र्यांना खडसेंच्या नावाचा वापर करुनच टाळ्या मिळवता आल्या. खडसेंनी मंत्रीपदाच्या काळात घेतलेल्या निर्णयांमुळे जिल्ह्याचा कसा विकास झाला, याचे दाखले मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात दिले. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी त्यांच्या जामनेर वगळता अन्य भाषणात खडसेंच्या नावाचा पुरेपुर वापर करत महाजन-खडसे अशी गटबाजी नसल्याचा दावा केला. यंदा जिल्हा परिषदेत भाजपाची एकहाती सत्ता आल्यास खडसे पुन्हा मंत्रीमंडळात परततील, असा प्रचार देखील भाजपातील एका गटामार्फत सोईस्कररित्या करण्यात येत होता. यामुळे भाजपाला खडसे नको असले तरी त्यांचे नाव ब्रॅण्डनेम म्हणून हवे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे राज्यातील महापालिका व जिल्हा परिषदांच्या धामधुमीनंतर खडसेंची मंत्रीमंडळ वापसी होते का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Post a Comment